मराठा मोर्चा, आरक्षण ते संभाजीराजे : यामुळे सेनेवर मराठा विरोधी असण्याचा आरोप होतोय

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय आमच्याकडून संपला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं.

“संभाजीराजे शिवसेनेत जाणार, शिवसेना राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना पाठींबा देणार”, या सर्व चर्चांना ब्रेक लागला. अनेक तर्क-वितर्क लावले गेले मात्र सेनेने काय शेवट्पर्यंत संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही.. 

या सर्व घडामोडींमुळे “शिवसेना मराठा विरोधी” आहे असा प्रचार मात्र सुरू झाला. 

“मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजेंना जाणूनबुजून उमेदवारी दिली नाही याचा अर्थ शिवसेना मराठा विरोधी आहे”, असा आरोप छावा संघटनेमार्फत करण्यात आला आहे. बर ही काही पहिली वेळ नाही जेव्हा शिवसेनेवर मराठा विरोधी म्हणून आरोप झालेले आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेवर मराठा विरोधी असल्याचे आरोप झालेले आहेत. 

आजवर झालेले हेच आरोप पाहणं गरजेचं आहे.. 

शिवसेनेवर होणारा आरोप क्र १.

 शिवसेना मराठा मोर्च्याच्या विरोधात होती, अशी टीका सातत्याने सेनेवर होत आली आहे.

मराठा मोर्च्याच्या दरम्यान औरंगाबाद येथे अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलनात घुसून मराठा तरुणांना मारहाण केली होती तेंव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठीशी घातलं होतं. 

तर मराठा मोर्चकऱ्यांनी  सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुंबईत तर औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांना पळवून लावले होते. शिवसेनेचा सुरुवातीपासून मराठा आरक्षणाला विरोध होता मात्र इतर राजकीय पक्षांनी मोर्चाला पाठिंबा दिला तेंव्हा शिवसेनेला देखील पाठिंबा द्यावा लागला,असा आरोप केला जातो.

मराठा मोर्चात न उतरणारी शिवसेना लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवू नये म्हणून आंदोलन करत होती.  

शासनाने समिती नेमून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे  गुरू नव्हते, हे सिद्ध केले होते. तेव्हा पुणे मनपाने बहुमताने जिजाऊ शिवरायांच्या शेजारील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दादोजींचा पुतळा काढू नये म्हणून शिवसेना, मनसे आणि भाजपने लाल महालाबाहेर तीन दिवस ठिय्या मांडून विरोध केला होता. तसेच मराठा आरक्षणासंबधित शिवसेनेमार्फत ठाम भूमिका आजवर घेतलेली नाही, असा आरोप शिवसेनेवर मराठा संघटनांकडून होतो. 

आरोप क्र २.

सामानातील एक व्यंगचित्र या आरोपासाठी कारणीभूत ठरलं. 

सप्टेंबर २०१६ ची घटना आहे. शिवसेनेच्या मराठा विरोधी भूमिकेत शिवसेनेच्या ‘सामना’ मध्ये प्रकाशित झालेले एक व्यंगचित्राची भर पडली होती. व्यंगचित्रात “मूक मोर्चा” या शब्दांना “मूका मोर्चा” अशी टिका करण्यात आली होती. 

यामुळे झालं असं कि, मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्या पुरुष आणि  महिलांच्या हेतूवरच सेनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत का? असा प्रश्न विचारला जावू लागला.  

या व्यंगचित्रानंतर वातावरण एवढं तापलं की, सामना चे संपादक संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर FIR दाखल झालेली. 

तर सेनेचे काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. सेनेचे खासदार प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर आणि शशिकांत खेडकर या सेनेच्या नेत्यांनी राजीनामे दिले होते. तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतील ‘सामना’च्या ऑफिसवर दगडफेकही केली होती. कांग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंना माफी मागण्यास भाग पाडलं होतं. आणि उद्धव ठाकरे यांनी अखेर राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली होती. 

आरोप क्र ३.

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्यास शिवसेनेने विरोध करून मराठा दलित  दूही निर्माण करण्यात शिवसेना होती.

जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मात्र जातपात न मानणाऱ्या बाळासाहेबांनी याला विरोध केला. ६ डिसेंबर १९९४ रोजी नांदेडमध्ये झालेल्या  जाहीर सभेत बाळासाहेबांनी ‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही त्यांना विद्यापीठ कशाला हवंय?’ मराठवाड्याचे नाव पुसून आंबेडकरांचे नाव कशासाठी” असा प्रश्न विचारून वादाला तोंड फोडलं.

वातावरण तापवलं गेलं आणि त्यावरून संघर्षाची ठिणगी पडली. याचमुळे मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या. थोडक्यात शिवसेनेने मराठा – दलित दंगली घडवल्या, यातून दोन्ही समाजाचे नुकसान झालं अशी टीका आजही होत असते. 

आरोप क्र ४. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेत आलेल्या शिवसेनेने शिवरायांचाच अपमान करणाऱ्या जेम्स लेन आणि पुरंदरेंना मदत केली होती अशी टीका सेनेवर होत असते…

‘शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात जेम्स लेनने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत बदनामीकारक लिखाण केलं होतं.  

या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्र पेटून उठला होता. 

यातूनच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला. तर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या पुस्तकावर बंदी घातली होती आणि याच जेम्स लेनच्या पुस्तकाचे कौतुक करणा-या अनंत देशपांडे यांचा लेख सामनात ७ सप्टेंबर २००३ रोजी प्रकाशित केला. लेनचा सहलेखक बहुलकर याला राज ठाकरेंनी मदत केली. असा दावा मराठा संघटनांकडून केला जातो.    

याशिवाय जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध झाला होता, तेव्हा शिवसेनेने आम्ही पुरस्कार देणारच अशी भूमिका घेतली होती.  

थोडक्यात बाबासाहेब पुरंदरेंना पाठबळ देऊन सेनेने जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी केली अशी टीका होते.  

शिवाय तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करत असताना तिथीला शिवजयंती साजरी करुन शिवसेनेने शिवजन्मोत्सवात फूट पाडली असाही आरोप होतो… 

तर हे होते शिवसेनेवरचे ४ गंभीर आरोप. त्यात मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यामुळे त्या यादीत आता आणखी एका आरोपाची भर पडलीय..या झाल्या टीका-टिप्पण्या आणि आरोपांच्या चर्चा. 

मात्र तुम्हाला काय वाटतं? शिवसेना ही खरंच मराठा विरोधी भूमिका घेत आलीय का ? 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.