राणे म्हणजे भोक पडलेला फुगा : काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात

काल महाराष्ट्रात राणेंच्या अटकसत्राचं राजकीय महानाट्य रंगलं होत. रात्र होता होता राणेंना जमीन मिळाला. थोडक्यात काय तर एकाबाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्यातलं श्रेष्ठत्वाच्या चढाओढीचं हेच महानाट्य अवघ्या देशाने ‘याची देही याची डोळा’ अनुभवलं.

या महानाट्याचा प्रसंगावरून नजर फिरवली असता, 

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या टीकाटिप्पणी वरून शिवसेनेने मंगळवारी प्रत्युत्तरादाखल राज्यभर आंदोलन केल, मोठमोठाल्या नेत्यांची वक्तव्य आली. पण सेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधूनही सेनेची अधिकृत भूमिका काय असणार याविषयी अवघ्या महाराष्ट्राची उत्कंठा ताणली होती ती आज सकाळी संपलीच.

तर या अग्रलेखातून नारायण राणे यांच्या अब्रूची लख्तर सेनेनं पार वेशीवर टांगली आहेत. नारायण राणे यांचं मोजक्याच  शब्दात वर्णन करण्यात आलंय. शिवाय अग्रलेखातून राणेंच्या आडून भाजपवर शेलक्या शब्दांनी निशाना साधला आहे. काय म्हणतंय मुखपत्र, वाचाच जरा.. 

राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले.

हे झालं राणेंचं थोडक्यात वर्णन, पण भाजपावर कोणत्या शेलक्या शब्दांचा बाण सोडण्यात आला ?

तर फडणवीस-पाटील यांच्या गळय़ात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशा वेळी संस्कारी राजकारणी महाराष्ट्राची माफी मागून मोकळे झाले असते. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे कोणीही मोठे नाही, पण भाजपसाठी महाराष्ट्राची अस्मिता आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा हे गौण विषय आहेत.

अशा उपटसुंभांना भारतीय जनता पक्षाने ‘मांडीवर’ घ्यावे हे त्यांच्या संस्काराचे अधःपतन आहे ! श्री. शरद पवार यांच्यासारख्या लोकमान्य नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणारे लोकही भाजपने उधारीवर घेतले आहेत व हे लोक पवारांवरही ऊठसूट हल्ले करीत आहेत. एका माकडाच्या हाती दारूची बाटली होतीच. आता दुसरे माकडही बाटली घेऊन उडय़ा मारीत आहे. महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे.

भाजपमधील उपरे आणि बाटगे काबूलमधील तालिबानी विकृतीप्रमाणे हाणामारीची भाषा करू लागले.

महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

भारतीय जनता पक्षाला या बेताल बादशाहीची मोठी किंमत मोजावी लागेल. या इशाऱ्यासह अग्रलेखाचा शेवट 

पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे ! पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?

असा करण्यात आला आहे. तूर्तास तरी एवढेच..बाकी नाटकाचा पुढचा अंक पुढच्या वृत्तात वाचायला विसरू नका. 

हे हि वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.