शिंदे गटाचा आता ‘शिवसेना भवनावर’ दावा मात्र शिवसेना भवनची मालकी कुणाकडे ???

एकनाथ शिंदेंनी बंड केलं. या शिंदे गटात आमदार सामील झाले. नंतर खासदार सामील झाले. इतकंच नाही तर शिंदे गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी देखील नव्याने जाहीर केलीय. 

आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत आधी शिवसेनेवर दावा केला. मग पक्षाच्या चिन्हावर दावा केला. पक्षाचे कार्यालये आणि नेमणुकांचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत.

इतकंच नाही तर शिंदे गटाचं पुढचं टार्गेट आहे ‘शिवसेना भवन’ वर ताबा मिळवणे.. 

होय अशा बातम्या येतायेत की शिवसेनेचे मुख्यालय असणारं दादरचं शिवसेना भवन देखील आमचंच आहे असा दावा शिंदे गट करत आहे.  

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या या शिवसेना भवनचा इतिहास काय आहे ?

१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. पण पक्षासाठी मोठं ऑफिस उभारणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे शिवसेना भवन होण्याआधी शिवसेनेचे कामकाज मुंबईतल्या पर्ल सेंटरच्या २ खोल्यांमध्ये चालत असत. तसेच शिवसेनाप्रमुखांचं घरही ऑफिस म्हणूनच वापरलं जायचं. 

शेवटी १९ जून १९७७ रोजी शिवाजी पार्कच्या नाक्यावर अधिकृत  शिवसेना भवन उभं राहिलं.या शिवसेना भवनाची दगडी इमारत आर्किटेक्ट गोरे यांच्या संकल्पनेतून बांधली गेली.  

१९ जून रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या हस्ते या शिवसेना भवनचे उद्धाटन झाले.  उद्घाटनाचे प्रमुख भाषण करताना बाळासाहेब म्हणालेले, “शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावणार आहे”.  

आणि तेंव्हापासून हे शिवसेना भवन स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे. 

१९९३ मध्ये एक घटना घडली आणि या शिवसेना भवनला तडे गेलेले. 

१९९२-९३ मध्ये मुंबईत १३ बॉम्बस्फोट झाले होते. त्यातला एक बॉम्बस्फोट शिवसेना भवनजवळच्या पेट्रोल पंपावर करण्यात आला होता..शिवसेना भवन उद्ध्वस्त करण्यासाठीच हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता अशी माहिती समोर आलेली. या बॉम्बस्फोटात शिवसेना भवनचे बरेच नुकसान झाले. शिवसेनाप्रमुखांच्या चेंबरमध्येही मोठ्या भेगा पडल्या होत्या. काही वर्षे तशीच गेली. 

शिवसेना भवन पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला इमारत पडलेल्या भेगांमुळे कधीही पडू शकते का याचं परीक्षण केलं आणि नवीन इमारतीचा आराखडा बीएमसीला सादर करण्यात आला आहे. तो आराखडा पास झाल्यानंतर बांधकाम सुरू झालं. 

द टाइम्स ऑफ इंडियाच्या २००४ च्या एका बातमीनुसार, नवीन शिवसेना भवनच्या बांधकामाची आणि डिझाइनची जबाबदारी आर्किटेक्ट शशी प्रभू यांना देण्यात आलेली तेंव्हा त्यांनी सांगितलेलं की, “या प्रकल्पासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील शिवाई ट्रस्टकडून हा निधी मिळाला आणि अशाप्रकारे हे बांधकाम पूर्ण झालं.

या नवीन शिवसेना भवनचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशीच्या दिवशी म्हणजेच २७ जुलै २००६ रोजी झाले.  

या नवीन शिवसेना भवनच्या उद्घाटनाच्या वेळेस बाळासाहेबांनी भाषण केलं, भाषणात ते म्हणालेले की, “शिवसेना भवनाची ही नवी वास्तू शिवसेनेला चांगले दिवस आणेल. शिवसेना संपवून टाकणारा कोणी अजून जन्माला आलेला नाही. यापुढे येणारही नाही. शिवसेना संपवायला निघालेले संपले. पण सेना अबाधित आहे. उद्धवला कार्याध्यक्ष तुम्हीच केलेले आहे. मी घराणेशाही करणार नाही. शिवसेनेला पुढे नेण्याची जबाबदारी तुमचीच आहे. पण उद्धवलाही पक्ष चालवताना काही पथ्यपाणी पाळावीच लागतील. मी जशी शिवसेना चालवली, तशीच चालवायला हवी”, असे शब्द बाळासाहेबांचे होते.

शिवसेना भवन तर उभारलं गेलं पण या शिवसेना भवनची मालकी नेमकी कुणाकडे आहे ?

लेखक योगेंद्र ठाकूर यांनी मार्मिकमध्ये “शिवसैनिकांचे मंदिर, रंजल्यागांजल्यांसाठी न्याय मंदिर” नावाचा एक लेख लिहिलाय. 

त्यात दिलेल्या संदर्भानुसार शिवाजी पार्कच्या नाक्यावर ऐन मोक्याच्या जागेवर उमरभाई या मुस्लिम व्यक्तीची जमीन होती. व्यवहार करून ही जागा शिवाई ट्रस्टला देण्यात आली.  

या जमिनीवर शिवसेना भवन उभं राहिलं. या आधी तिथे काही दुकानांचे गाळे होते. त्या सर्वांना पुढे सेनाभवनात जागाही मिळाली.  

पण शिवसेना भवन उभारण्यासाठी शिवसेनेकडे तेवढे पैसे देखील नव्हते.

त्यासाठी हर एक शिवसैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. देणगीदारांकडून देणगी मिळवली. तर कुणी फारशी बसवून दिली तर कुणी फर्निचरची जबाबदारी घेतली. अखेर वर्गणीच्या माध्यमातून शिवसेना भवन उभं राहिले.

योगेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यानुसार शिवसेना भवनासाठी जागा मिळवण्यापासून ते या भवनाच्या उभारणीच्या कामापर्यंत दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतलेला. तर शिवसेना भवनात शिवाजी महाराजांचा पुतळा स्वतः शिवसेनाप्रमुखांच्या देखरेखीखाली बसवला गेला. 

अलीकडेच खासदार संजय राऊतांनी सांगितल्यानुसार, शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे.

या शिवाई सेवा ट्रस्ट चे ट्रस्टी शिवसेनेचे पहिले महापौर बनलेले हेमचंद्र गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम जयंत देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हि सर्व मंडळी शिवाई ट्रस्टचे जुने ट्रस्टी होते. या शिवाई ट्रस्टची आणि त्याच्या ट्रस्टीजची नोंद जागेच्या मालमत्ता पत्रकावर करण्यात आली होती अशी माहिती मिळतेय.  

या सगळ्या ट्रस्टीज पैकी शाम जयंत देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई यांनी राजीनामा दिला तर हेमचंद्र गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक या ट्रस्टीज् चं निधन झालेलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाई ट्रस्टचे सद्याचे ट्रस्टीज् म्हणून रविंद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर यातल्या एका ट्रस्टीने  बोल भिडूला बोलताना अशी माहिती दिलीय की, शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टचीच मालकी आहे. मात्र या ट्रस्टीज मध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आहे कि नाही याबद्दल त्यांनी माहिती देण्याचं टाळलं. 

या सगळ्या मध्ये एक प्रश्न उरतोच की, शिवसेना भवनची किंमत काय असेल ? 

ज्या शिवसेना भवनावर ताबा मिळवण्याची लढाई इथून पुढे सुरु होणार आहे त्या शिवसेना भवनच्या जमिनीची मार्केट वैल्यू दुर्लक्षित करून चालणार नाही.  

ज्या जागेवर हे शिवसेना भवन उभं आहे ती जागा दादर स्टेशनच्या जवळ आणि शिवाजी पार्कपासून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे यावरून तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या किंमतीची कल्पना करू शकता. 

बरं…या शिवसेना भवनवर शिंदे गटाने जरी दावा करायला सुरुवात केली तरी,

पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे पक्षाचे आणि पक्षाच्या मुख्यालयाचे सर्वाधिकार ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे शिवसेना भवन इतकं सहजासहजी शिंदे गटाला मिळेल कि नाही येणाऱ्या काळात कळेलच. 

बाकी बाळासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्यानुसार ‘शिवसेना भवनाची वास्तूवर प्रत्येक शिवसैनिकाचा हक्क आहे. आणि शिवसेना भवन उभारण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने घेतलेले प्रयत्न बघितले तर शिवसेना भवन कुना एकाची मालकी नाहीये तर शिवसेनेतल्या प्रत्येक शिवसैनिकांचा त्यावर हक्क आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.