धर्मवीर आनंद दिघे यांच्या अफाट लोकप्रियतेचं काय कारण होतं?

आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचीही भाषणं झाली. दोघांनीही भाषणात एकमेकांना लक्ष्य केलं, टीका केल्या. पण दोघांच्या भाषणात एक समान धागा होता तो म्हणजे आनंद दिघे.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात उल्लेख केला की, “आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले, ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही.”

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आनंद दिघे यांचा जयजयकार केला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत म्हणलं की, ‘आनंद दिघे गेल्यावर आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तुम्ही मला विचारलंत, दिघेंची प्रॉपर्टी किती आणि कुठे आहे ? कुणाच्या नावावर आहे ?’

उद्धव ठाकरेंच्या भाषणात, तर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात स्टेजवर, उपरण्यावर आणि भाषणांमध्येही आनंद दिघे यांचा उल्लेख झाला.

पण आनंद दिघे यांच्या अफाट लोकप्रियतेमागचं नेमकं कारण काय होतं ?

आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या अवघ्या वीस-पंचवीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात सतत प्रचंड चर्चेत, विविध वादात राहिलेला आणि प्रचंड जनसमर्थन लाभलेला शिवसेनाप्रमुखांव्यतिरिक्त शिवसेनेतील एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे.

त्यांच्याइतकी लोकप्रियता ना त्यांच्या आधी शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला लाभली..

ना त्यांच्या नंतर…!

नेमकं काय कारण होतं त्यांच्या अफाट लोकप्रियतेचं ?

आज मागे वळून पाहताना लक्षात येतं कि अतिशय नियोजनपूर्वक आनंद दिघेंनीं सुरुवातीपासून आपली वाटचाल ठेवली. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक आंदोलन आदी सगळं नियोजनपूर्वक होतं. शिवसेना आणि हिंदुत्व या दोन्हींचेही ते प्रथमपासूनच कडवे समर्थक होते.

शिवसेनेचे संस्कार त्यांच्यावर बाळासाहेबांच्या प्रखर भाषणांनी झाले. मात्र कडवट हिंदुत्वाचे संस्कार त्यांच्यावर कधी व कसे झाले, हे कोडंच आहे. त्यांची रोजची प्रदीर्घ पूजाअर्चा, उपासतापास, व्रतवैकल्ये, साधुसंतांचा मानसन्मान हे सगळं अकृत्रिम आणि निस्सीम श्रद्धा भावनेने ओथंबून केलेलं असायचं. दिखाऊ अभिनिवेश त्यात कुठेही नसायचा. या सर्व धार्मिक बाबी करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत असायचं.

शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय वाटचाल सुरु करताना प्रथमपासूनच त्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारलेली होती. ठाण्यातील जनतेच्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडवायला सुरुवात केल्यावर बघतो, नंतर पाहू. अशी राजकीय नेत्यांची ठरलेली भाषा त्यांच्या तोंडी कधीच दिसली नाही.

कोणीही नागरिक आपली समस्या घेऊन आला कि ती ऐकायची, त्यातील सत्यता धारदार नजरेने जाणायची आणि ती खरी वाटली कि लगेच ते निघायचे ते थेट समस्येचं उत्तर असणाऱ्याकडे..!

मग तो कधी रेशनिंग ऑफिसर, कधी पोलीस अधिकारी तर कधी महापालिकेचा अधिकारी असायचा. आधी नीटपणे त्याला सांगायचे कि, बाबारे, का या माणसाचं काम अडवून ठेवलंय ? करून टाक पाहू..

त्याने बऱ्या बोलाने ऐकले तर ठीक, अन्यथा मग दिघेंचा रुद्रावतार त्याला सहन करायला लागायचा.

अनेक अधिकाऱ्यांनी त्या सुरुवातीच्या काळात दिघेंच्या ‘हातच्या’ प्रसादाची चव चाखली होती!

पण त्यांची जरब आणि धाक इतका निर्माण होऊ लागला होता कि कोणीही त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार वगैरे करायच्या भानगडीत पडलं नव्हतं.

समस्याग्रस्त नागरिकांना झटपट न्याय देण्याच्या या प्रकारामुळे साहजिकच दिवसेंदिवस त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढू लागली आणि त्या सोडवताना दिघेंचा धाकही त्याच पटीत वाढू लागला.लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष जाण्याची गरज राहिली नव्हती.

तेव्हा ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या टेंभीनाक्यावर त्यांचा आनंद दरबार सुरु झाला होता आणि समस्येचं उत्तर असणारे लोक दिघेंच्या एका फोनच्या आदेशाने त्या दरबारात स्वतःहून येऊ लागले होते !

मो.दा.जोशी, साबीर शेख, सतीश प्रधान, गणेश नाईक अशी मातब्बर मंडळी ठाण्यातील शिवसेनेचं त्याकाळी नेतृत्व करीत होते. परंतु दिघेंचा दरारा,नावलौकिक इतक्या वेगाने ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पसरू लागला कि त्यापुढे हे मातब्बर नेते झाकोळून जाऊ लागले !

टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवाला त्यांनी प्रचंड भव्य आणि नेत्रदीपक स्वरूप दिलं. नवसाला पावणारी देवी म्हणून त्या देवीचा लौकिक झाला आणि त्यामुळे नवरात्राचे नऊ दिवस तिथे लक्षावधी भाविकांची यात्राच भरू लागली.

कल्याणजवळील हाजीमलंग गड हे मुस्लिमांचे नव्हे तर हिंदूंच्या नवनाथांचे स्थान असल्याचा त्यांचा दावा होता. तो सिद्ध करण्यासाठी तिथे हिंदूंची वहिवाट मोठ्या प्रमाणात सुरु होणे गरजेचे होते.म्हणून त्यांनी माघी उत्सव त्या गडावर सुरु केला.

हाजीमलंग ऐवजी मलंगगड हा शब्द रूढ केला ! या उत्सवालाही प्रचंड प्रतिसाद लाभला.

दहीहंडी उत्सवाला राज्यात सर्वात पहिले भव्य स्वरूप आनंद दिघेंनींच प्रथम ठाण्यात टेंभीनाक्यावर दिले. लक्षावधी रुपयांची बक्षिसे आणि मुंबईच्या नामवंत गोविंदा पथकांचे त्यानिमित्ताने ठाण्यात आगमन हे टेंभीनाक्यावरच प्रथम घडले.

शिवसेनेच्या वतीने त्यांनी ठाणे जिल्हा पातळीवर भव्य गणेश दर्शन स्पर्धा सुरु केली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच भव्यदिव्य असायचा. त्या स्पर्धेलाही प्रचंड प्रतिसाद लाभला. बाबासाहेब पुरंदरेंच्या ‘जाणता राजा’ चे त्यांनी ठाण्यात स्टेडियमवर सलग अनेक प्रयोग आयोजित केले. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या महानाट्याचे अनेक प्रयोग केले.

या सगळ्या धार्मिक, सांस्कृतिक आयोजनांसोबतच त्यांनी काही चांगले सामाजिक उपक्रमही भव्य प्रमाणात राबवणे सुरु केले. त्यात जिल्हा पातळीवर बोर्डाच्या धर्तीवर दहावी सराव परीक्षांचे आयोजन विशेष उल्लेखनीय आहे.

दरवर्षी शाळा सुरु होण्याच्या काळात लाखोंच्या संख्येने मोफत वह्या वाटप, मुलांच्या मैदानी क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा साहित्याचे वर्षभर मोफत वाटप आदी अनेक बाबींचा त्यात समावेश करता येईल.

या सगळ्याच्या जोडीने शिवसेनेची आंदोलने, मातोश्री-सेनाभवनातून घोषित होणारी आंदोलने-उपक्रम ठाणे जिल्ह्यात राबवण्यातही दिघे आघाडीवर असायचे.एक व्यक्ती हे सगळं करू शकते,यावर विश्वास ठेवणं कठीण व्हावं असा सगळा त्यांच्या कार्याचा धडाका होता.

ठाणे कोर्टातील काही न्यायाधीशांचा भ्रष्टाचार एकदा मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.अनेक वकीलही त्या न्यायाधीशांच्या गैर निर्णय प्रक्रियेने त्रस्त होते. तो विषय आनंद दिघेंकडे आला. त्यांनी काय करावे. त्यांनी थेट न्यायालयाबाहेर मोक्याच्या ठिकाणी मोठा फलक लावला.

त्यावर लिहिले होते,इथे न्याय विकत मिळतो! आणि त्याखाली खून करून सुटण्यासाठी किती रक्कम, बलात्कार करून सुटण्यासाठी किती रक्कम तें सगळं लिहिलं होतं !

आनंद दिघे असे होते.

या सगळ्यामुळे साहजिकच आधी शिवसेनेचं उपजिल्हाप्रमुख पद आणि मग काही वर्षात जिल्हाप्रमुखपद त्यांच्याकडे चालत आलं.परंतु खरं म्हणजे आनंद दिघे केव्हाच या पदांपेक्षा मोठे झाले होते !

ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट झाले होते.

जिल्ह्याच्या संघटनेवर त्यांची हुकूमत प्रस्थापित झाली होती. आणि राजकारणात तें म्हणतील ती पूर्व दिशा ठरू लागली होती.कोणी त्यांना धर्मवीर संबोधू लागले होते,कुणी रॉबिनहूड मानत होते तर कुणी धर्मात्मा. प्रचंड मोठं वलय त्यांच्याभोवती निर्माण झालं होतं. ठाणे शहराच्या राजकारणात त्यांचे काही पक्षांतर्गत विरोधक होते. नाही असं नाही..परंतु त्यांना दिघेंच्या या वलयापुढे काहीही करता येणं अशक्य होतं.

ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड प्रस्थापित केल्यावर आनंद दिघेंनीं तोपर्यंत भाजपचा पारंपरिक गड बनलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघावर शिवसेनेच्या वतीने दावा सांगितला आणि एकच हल्लकल्लोळ झाला. रामभाऊ म्हाळगी,राम कापसे अशा दिग्गजांनी खासदारकी भूषवलेला हा मतदारसंघ शिवसेना मागतेय म्हणजे काय, कदापिही आम्ही तो सोडणार नाही, अशी ताठर भूमिका भाजपने घेतली.

परंतु दिघेंच्या ताकदीपुढे अखेर भाजपला नमावेच लागले.

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. त्यानंतर दिघेंनीं आणखी एक धाडशी कृती केली आणि ती म्हणजे तेव्हा ठाणे महापालिकेत फक्त नगरसेवक असलेल्या प्रकाश परांजपेंना त्यांनी थेट ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली.

भाजप नाराज होतं. अशा परिस्थितीत पराभव झाला असता तर दिघेंना प्रचंड बॅकफूटवर यावं लागलं असतं. परंतु त्यांची सगळी गणितं बरोबर ठरली आणि प्रकाश परांजपे मोठ्या मताधिक्याने ठाण्यातून शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले. आनंद दिघेंच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले. त्यांचे वलय आणखी प्रचंड वाढले.

त्याआधी काही काळापूर्वी ठाणे महापालिकेच्या महापौर निवडणुकीत एक महाभारत घडले होते.

शिवसेनेचे उमेदवार असलेल्या प्रकाश परांजपेंना काही शिवसेना नगरसेवकांच्या दगाफ़टक्यामुळे पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव साहजिकच आनंद दिघेंच्या जिव्हारी लागला होता. गद्दारांना क्षमा नाही, असे जाहीर उद्गार त्यांनी त्या पराभवानंतर काढले होते. आणि त्यानंतर काही काळातच शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांची लुईसवाडी भागात दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाली.

दिघेंचे उद्गार आणि या हत्येचा संबंध जोडला जाणे साहजिकच होते. तसा तो जोडला गेला आणि आनंद दिघे व आणखी काही जणांना खोपकर हत्येप्रकरणी अटक झाली. त्यांना टाडा लावण्यात आला.ठाण्यात प्रचंड गोंधळ झाला.दिघेंना अटक झाल्यावर सलग तीन दिवस ठाणे बंद होते. अखेर दिघेंनींच कारागृहातून बंद मागे घेण्याचे आवाहन केल्यावर ठाणे सुरु झाले.

परंतु मग त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी विविध मोर्चे सुरु झाले. शिवसैनिकांनी प्रचंड मोर्चा तर काढलाच परंतु फक्त महिलांचा, फक्त विद्यार्थ्यांचा, मुलांचा असे मोर्चेही निघाले. साखळदंडांनी हात बांधलेल्या दिघेंचे भले मोठे बॅनर ठाण्याच्या प्रमुख चौकांमध्ये झळकले. त्याखाली मोठ्या अक्षरांत लिहिले होते,

ये जंजीर अब जनताही तोडेंगी !

काही महिन्यांनी दिघेंना जामीन मंजूर झाला आणि तें ठाण्यात आले तें अधिक प्रभावशाली. अधिक वलयांकित बनूनच!

त्यांच्या लोकप्रियतेने आता सारे रेकॉर्ड तोडले होते.

आनंद दिघे म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे समीकरण बनले होते.आणि त्यांची ही अफाट लोकप्रियता व काम करण्याची काहीशी आत्मकेंद्री पद्धतच मातोश्रीला खटकू लागल्याचे वृत्त अधूनमधून ठाण्यात धडकू लागले होते.

ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी.चंद्रशेखर यांच्या धडाकेबाज रस्ते रुंदीकरण मोहिमेत आंनद दिघे अनेक ठिकाणी आडवे येत होते. गोरगरिबांची वर्षानुवर्षांची घरे,दुकाने पाडण्यास विरोध करीत होते. त्यांच्याविरोधात सभागृहात अविश्वास ठराव आणला जात होता.

चाणाक्ष आयुक्तांनी थेट मातोश्रीला गाऱ्हाणे घातले. बाळासाहेबांनी तो मोका साधत आनंद दिघेंना खडसावले. चंद्रशेखर यांच्या मार्गात न येण्यास सांगितले. हा साराच प्रकार ठाणेकरांना काहीसा आश्चर्यचकित करणारा होता.आनंद दिघे आणि मातोश्रीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आले होते.

दिघेंचे राज ठाकरे यांच्याशी विशेष सख्य होते.आणि मातोश्रीवर-शिवसेनेत मात्र उद्धव ठाकरेंचे प्रस्थ वाढू लागले होते. एकुणात काही समीकरणं बिघडत चालली होती. दिघेंचा दैनंदिन कारभार नेहमीप्रमाणे सुरूच होता परंतु अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला होता.

आणि अशात २००१ मध्ये गणेशोत्सवात ‘तो’ अपघात घडला.

अपघाताचे आणि दिघेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरले. सिंघानिया रुग्णालयात दिघेंना पाहण्यासाठी लोकांचे रीघ लागली. लोकांना काचेच्या दरवाजाबाहेरून का होईना तें दिसावेत अशा पद्धतीने त्यांचा बेड ठेवण्यात आला होता. लोक येत होते.हात जोडत होते. साहेब लवकर बरे व्हा म्हणून प्रार्थना करीत होते. दिघेंही अधूनमधून हात वर करत सर्व काही ठीक आहे,काळजी करू नका असे दाखवून देत होते.

शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते त्यांना पाहायला, प्रकृतीची विचारपूस करायला येत होते. राज ठाकरेही आले. त्यांच्यात आणि दिघेंमध्ये काही हितगुज झाले. नेमके काय तें आता केवळ राज ठाकरे यांनाच माहित.परंतु त्यावेळी दोघांचेही चेहरे प्रचंड गंभीर असल्याचे उपस्थित अनेकांनी स्पष्टपणे पाहिलं. त्यानंतर राज ठाकरे रुग्णालयातून बाहेर पडून काही अंतरच गेले असतील आणि इकडे दिघेंची प्रकृती अचानक खालावली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना काही मिनिटांच्या अंतराने लागोपाठ दोन हार्ट अटॅक आले आणि त्यातच दिघेंची प्राणज्योत मालवली !

हजारभर शिवसैनिक तर त्यावेळी रुग्णालयातच होते.हे वृत्त कळताच मोठ्या संख्येने आणखी शिवसैनिक रुग्णालयात दाखल झाले.डॉक्टरांनीच हलगर्जीपणा केल्यामुळे आपले साहेब गेले, असे वक्तव्य कोणी तरी केले आणि शिवसैनिक बिथरले. त्यांनी रुग्णालयावर हल्लाबोल केला. आनंद दिघेंचे पार्थिव शरीर टेंभीनाक्यावर नेण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात कसेबसे प्रशासनाला यश आले आणि मग ती वास्तू शिवसैनिकांच्या रागात खाक झाली.

नंतर कोणी म्हटलं कि,दिघेंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला तें कधीच उघडकीला येऊ नये आणि कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून तें रुग्णालय बेचिराख करण्यात आलं. कोणी आणखी काही म्हटलं. कोणी आणखी काही. अनेक तोंडं. अनेक बाता. नेमकं खरं काय तें अजूनही काळाच्या पडद्याआडच आहे आणि बहुदा तें तसंच राहील..!

आनंद दिघेंच्या वाढदिवशी टेंभीनाक्यावर मोठी जत्राच असायची. हजारो लोक. त्यात गरिबांपासून तें श्रीमंतांपर्यंत सारेच दिघेंना शुभेच्छा द्यायला रांगेत उभे असायचे. वर्षातला हा एकच दिवस असा असायचा कि दिघेंही सुहास्य वदनाने आणि प्रसन्नपणे सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करायचे..कुणाला ओरडायचे नाहीत कि रागवायचे नाहीत…

त्यांच्यावर निरातिशय प्रेम करणारे आजही त्या आनंदाश्रमासमोर जातील..त्यांच्या स्मृतींनी काही क्षण गहिवरतील..आणि पुढे निघतील..

काळ कोणासाठीही थांबत नसतो..!

  • रविंद्र पोखरकर 

 

3 Comments
  1. Rajesh says

    Nice info, great leader Dighe saheb

  2. हर्षल चौधरी says

    तो अपघात मातोश्रीच्या संमतीनेच/आदेशावरूनच घडवण्यात आला, असे म्हणनात. हे खर आहे का??

  3. Sharad says

    Salaam 🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.