आग्र्याहून निसटलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात कसे परतले?

भारताचा सर्वशक्तिशाली सम्राट बादशाह आलमगीर औरंगजेब. लाखोंचं सैन्य बाळगत होता. मात्र महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा राज्याचा राजा त्याचा भर दरबारात अपमान करतो काय आणि त्याच्या बंदिवासातून अचानक निसटून जातो काय. संपूर्ण देशाला हे आक्रीत कधी उलगडलं नाही.

औरंगजेबाच्या मगरमिठीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले पण त्याहून ही ते बादशाही मुलखातून सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले कसे हा प्रश्न अनेकांना पडला. 

तो दिवस होता १७ ऑगस्ट १६६६. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्याची बातमी औरंगजेबास समजताच त्याला धक्का बसला, आश्चर्य वाटले. त्याने तिथल्या सर्व सुरक्षा रक्षकांची झडती घेतली. पण कडक पहारा असताना शिवाजी एकाएकी जमिनीत घुसला की आसमानात जाऊन नाहीसा झाला हे आम्हास समजले नाही असे ते पहारेकरी म्हणत राहिले.  

मराठ्यांचा हा राजा अनेक रूपे घेतो असे बादशहाने ऐकले होते. तेच खरे असे त्याला वाटू लागले. त्याने आपल्या फौजांना हुकूम करून चारही दिशांना शिवाजी महाराजांना शोधावयास रवाना केले व त्यांना सांगितले की, 

“शिवाजी हुन्नरवंत आहे. एखादा वेष धरून जात असेल. तरी तुम्ही जंगम, जोगी, संन्यासी, तापसी, बैरागी, नानकपंथी, गोरखपंथी फकीर, ब्राह्मण, कंगाल ब्रह्मचारी, परमहंशी, वेडे नानापरींची सोंगे शोध करून, राजा ओळखून कैद करून आणावे.” 

खरंच महाराजांनी आपला वेष बदलला होता. त्यांनी दाढी काढून भरदार मिशा ठेवल्या होत्या. डोक्यावरचा जिरेटोप काढून ठेवला होता आणि सरदारांची पगडी परिधान केली होती.

बादशहा महाशंकेखोर. त्याच्या मनात शंका आली की शिवाजीराजा शहरात कोठे दडून राहून रात्री आपणास दगा करील म्हणून तजवीज करून चौकी पहारा ठेवून स्वतः बादशहा पलंगावर बसून राहिला. 

मथुरेत शिवाजी महाराजांचे तीर्थगुरू मकरंद भट व गोवर्धन राहत होते. शिवाय स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे कृष्णाजी त्रिमल मथुरेस होते. पूर्व योजनेनुसार महाराजांनी युवराज संभाजीराजेंना कृष्णजी त्रिमल यांच्याजवळ मथुरेस ठेवले. हा कृष्णाजी यात्रेचा माहीतगार होता. त्याला महाराजांनी प्रवासासाठी सोबत घेतले. कृष्णजींचे बंधू काशीपंत व विसाजीपंत यांनी संभाजी महाराजांचा सांभाळ केला. 

शिवरायांच्या संरक्षणार्थ त्यांच्या आगेमागे शंभर-शंभर घोडेस्वार मावळे प्रवास करीत होते. आपल्या साथीदारांसह महाराजांनी मथुरेहून नरवरच्या दिशेने तुफानी घोडदौड सुरू केली.

तत्कालीन इटालियन इतिहासकार मनुची म्हणतो, 

“शिवाजी राजा व त्याचे साथीदार फारच प्रचंड वेगाने पळत होते. एरवी जेवढे अंतर तोडण्यास ७२ तास लागत होते, तेवढे अंतर तो व त्याचे साथीदार एका रात्रीत १२ तासात कापत होते. “

संपूर्ण देशभरात नाकेबंदी करण्यात आली होती. ठिकठिकाणी प्रवाशांची चौकशी होत होती. मुघलक शासनात प्रवासासाठी परवाने लागायचे. शिवाजी महाराजांच्या जवळ मीरबक्षी मुहम्मद अमीन खानाच्या परवान्यांचा योग्य दस्तक होता. तसेच महाराजांच्या मावळ्यांना परतीच्या प्रवासाचे दस्तक औरंगजेब बादशहाच्या परवानगीनेच देण्यात आले होते. त्यामुळे परवाने नाहीत म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती. 

शिवाजी महाराज २० ऑगस्टला नरवर घाटी येथे पोचले. औरंगजेबाच्या दरबारात रोज संध्याकाळी डायरी लिहिली जात असे. त्यास अखबार म्हणत.

२० ऑगस्टचा अखबार लेखक लिहितो, 

नरवरच्या फौजदार अबादुल्लाह खानाने कळविले की, संध्याकाळी नमाजाच्यावेळी शिवा व त्याचे साथीदार सरदार चंबळा नदी ओलांडून पुढे गेले. त्यांनी मुहम्मद अमीन खानाच्या सहीचा व शिक्क्याचा दस्तक सादर केला.

दिनांक २८ ऑगस्ट १६६६ चा अखबार लेखक लिहितो की, शिवा नर्मदेवर पोहचल्याची खबर मिळाली. परंतु तो कोणाला दिसला नाही. (अखबार खंड ६, लेख १८. )

अखबारातील या दोन्ही नोंदीवरून असे समजण्यास हरकत नाही की शिवाजी महाराज मथुरेहून निघून नरवरला आले. नरवरला लागून बुंदीलखंडात तेथे मोगल विरोधी सत्ता नांदत होती. त्याला लागून असलेल्या गोंडवनात लहान-लहान राजे मोगलांच्या विरोधात होते.महाराजांना हे ठावूक होते. या प्रदेशाची दुर्गम भौगोलिक रचना येथील मोगल विरोध, हे राजेना माहीत असल्यामुले त्यांनी अखबारात नोंदल्याप्रमाणे हिरापूर गावी २६ ऑगस्टच्या सुमारास नर्मदा नदी पार केली असावी. 

हिरापूरजवळ नर्मदा नदी पार केल्यानंतर शिवाजीराजे आपल्या साथीदारांसह एलिचपूर, माहूरमार्गे, सिंदखेडकडे वळले असावेत. सिंदखेड हे राजांचे आजोळ. मांसाहेब जिजाबाईंचे हे माहेर. 

मात्र महाराजांनी कुठेही जास्त वेळ दवडला नाही. लगोलग सिंदखेड सोडल्यावर शिवराय श्रीगोंद्यावरून पुण्यास राजगडावर आले. दिनांक १२ सप्टेंबर १६६६ रोजी बैराग्याच्या वेषात येऊन मातोश्रीचे पाय धरले. 

संदर्भ- शिवकाल मराठयांचा इतिहास लेखक डॉ.वि.गो.खोबरेकर  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.