अशी ही गोष्ट.. शिवरायांच्या ‘शिवराई’ ची..

६ जून शिवराज्याभिषेक सोहळा..

मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन होण्याचा दिवस. आपलं हक्काचं स्वराज्य निर्माण होत असतांना याच प्रवासात आणखी एक गोष्ट रुप घेऊ लागली होती आणि ते म्हणजे स्वराज्याचे प्रतिनीधीत्व करणारे स्वचलन!

ही काही साधारण घटना नव्हती. एकछत्री अंमलाप्रमाणे दिल्लीचा राजा हा एकच राजा मानला जात होता पण अशा परिस्थितीत एक मराठा राजा छत्रपती झाला होता, ज्याप्रमाणे महाराजांची प्रत्येक कृती अदभूत व असामान्य होती तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची ‘नाणी’ ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.

आता महाराज नाण्यांस्वरूपात प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार होते, आता स्वराज्याला आपले प्रतिनिधित्व करणारे चलन लाभले होते !

राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील १९ वे महत्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी.

मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच दि. २७ मे १६७४ ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो,

‘and especially against that wherein it inserted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby’.

यावरुन महाराजांचा दुरदृष्टिकोन पुन्हा आपल्या नजरेस पडतो. आणि महाराज स्वतःचीच टांकसाळ काढुन स्वतःचेच नाणे चालवणार असल्याने आपल्याला परवानगी मिळणार नाही असे हेन्री ऑक्झिंडेन पत्रात सांगतो.

स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे नाणे “शिवराई” स्वराज्याला मिळाले. त्याकाळची परिस्थिती पाहता मुघलांच्या नाण्यांचा प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणावर होता आणि पर्यायाने त्यांचीच नाणी सर्वत्र चलनात होती आणि बॉम्बे प्रेसिडेंसि चे पैसेही काही प्रमाणात चलनात होते अशा वेळी एका नव्या राजाने सुरु केलेले चलन बाजारात टिकेल का ? ते मुघलांच्या नाण्यांची बरोबरी करू शकेल का ?

हे प्रश्न पडले असावेत, पण पडलेल्या प्रश्नांप्रमाणे काहीही झाले नाही.

शिवराई नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले आणि १६७४ पासून तब्बल १९ व्या शतकापर्यंत शिवराई नाणे चलनात राहिले, अर्थात महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी अशीच नाणी पडून चलनात आणली. खरं तर १९ व्या शतकात शिवराई बंद करण्यासाठी इंग्रजांना फार प्रयत्न करावे लागले असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ला टांकसाळीत केलेले “शिवराई” हे नाणे तांब्याचे होते. शिवराई हे तांब्याचे नाणे शिवाजी महाराजांनी प्रथम पाडल्याचे दिसते, कारण १६८३ च्या एका पत्रात शिवराई चा उल्लेख आलेला आहे.

या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदुमय वर्तुळामध्ये ‘श्री/राजा/शिव’ असे तीन ओळीत तर मागील बाजूस ‘छत्र/पती’ असा दोन ओळीत मजकूर असतो, या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून अत्यंत सुबक अक्षरात या नाण्यांवर मजकूर असतो.

ही नाणी ११-१३ ग्रॅम वजनात आढळतात. या शिवराईची त्याकाळात किंमत १ पैसा होती आणि अशा ६४ शिवराई मिळुन १ रुपया होत असे.

शिवाजी महाराजांच्या अर्धी आणि पाव शिवराई दुर्मिळ आहेत.

या शिवराईं व्यतिरिक्त शिवराईचे विविध प्रकार आहेत तसेच शिवराईवर विविध चिन्ह ही आढळतात, ते टांकसाळींचे चिन्ह असावे असे अभ्यासकांचे मत आहे. श्री/राजा/शिव ,छत्र/पति मजकुरा व्यतिरीक्त पुढील बाजुनी ‘श्री /राजा /शीव’, ‘श्री /राजा /सिव’, ‘श्री /राजा/ सीव’ असलेल्या शिवराई ही उपलब्ध असुन काही शिवरायांवर मागील बाजुनी असलेल्या ‘छत्र/ पति’ मधील “ति” या अक्षराचा र्हस्व, दिर्घ प्रकार पहायला मिळतो.

शिवराई ही १७, १८, १९ अशी तीन शतके टिकून राहिली, त्यात योग्य ते बदल होत ती पुढे येत राहिली. शिवकाळानंतरच्या शिवराईत आपल्याला बदल आढळतो, संभाजी, राजाराम आणि शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांसारखी नाणी पाडली आणि नंतरच्या राज्यकर्त्यांनीं दुदाण्डी प्रकारातील शिवराई चालवली नंतरच्या या शिवराई नाण्यांचे वजनही कमी होते, हि शिवराई सरासरी १० ग्रॅम ची होती.

छत्रपति शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोण्याच्या नाण्यास ‘शिवराई होन’ म्हणतात , वर शिवाजी महाराजांच्या शिवराई होन या नाण्यावर बिंदुमय वर्तुळात पुढील बाजुनी तिन ओळित “श्री/राजा/शिव” तर मागील बाजुनी दोन ओळित “छत्र/पति” असे अंकीत केलेले असुन या नाण्याचा आकार वाटोळा असतो, नाण्याचे वजन २ मासे ७ गुंजा म्हणजेच २.७ ग्रामच्या आसपास आढळते. नाण्याचा व्यास १.३२ से.मी असुन त्यात सोण्याचा कस हा ९७.४५ असतो .

राजधानी रायगडावरील टांकसाळीत फक्त “शिवराई हॊण” पाडण्यात येत असुन रुका, तिरुका, सापिका आणि ससगणी ही नाणी इतरत्र पाडण्यात येत.

हा शिवराई हॊन आज फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि या उपलब्ध संख्येवरुन हा होण दुर्मिळ का झाला असा प्रश्न आहे, यावर वेगवेगळी मते आहे. काहींच्या मते शिवराई होण हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता पण त्याची चोरी होउन नंतर तो आटवला गेला आणि त्यामुळे आज कमी होण उपलब्ध आहेत, तर काही जणांच्या मते मोगली चलनाच्या असलेल्या वर्चस्वामुळे शिवराई होण हा जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहचु शकला नाही, आणि तशी साक्ष आपल्याला एका पत्रातुन मिळतेही, आणि त्यामुळे शिवराई होण हा अल्प वेळातच दिसेनासा झाला पण शिवराई मात्र टिकुन राहिली होती.

अशी ही गोष्ट.. शिवरायांच्या ‘शिवराई’ ची..

  • लेखक : आशुतोष सुनील पाटील, (नाणी अभ्यासक)  औरंगाबाद

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.