‘भिमथडीचे तट्ट’ नामशेष कशामुळे झाले?

“जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे गौरव गीत आपण लहानपणापासून ऐकतोय, अभिमानाने चालीत गातोय. गाताना आपली छाती अभिमानाने फुलून जाते. पण त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दात मराठे शाहीचा इतिहास लपलाय हे तुम्हाला ठाऊक आहे कां?

याचा एक उदाहरण म्हणजे “भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा”

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अवघा चौदा पंधरा वर्षांचा शिवबा आपल्या सवंगड्यांसोबत बारा मावळ तुडवत हिंडत होता, स्वराज्याचे स्वप्न पहात होता. गड किल्ल्यांना भगव्या जरीपटक्याच्या झेंड्या खाली एक करत होता.

हे स्वराज्य कृष्णा भीमेच्या दरम्यानच्या भागात पसरलेले होते. कृष्णा आणि भीमा या नद्या त्या काळातही महाराष्ट्राच्या जीवनदायिनी होत्या. या नद्या स्वराज्याच्या रक्षणकर्त्या देखील बनल्या.  या भागातील शेतकरी वेळ पडली तेव्हा हातात शस्त्र घेऊन शिवबाच्या पाठीशी उभे राहिले.

या मावळ्यांचे जे घोडे होते त्यांना भीमथडीचे तट्ट असे म्हणत.

पूर्वीच्या काळापासून अरबी घोड्यांना सर्वोत्कृष्ट समजले जाते. भारताशी अरबांचा मुख्य व्यापार हा घोड्यांचाच व्हायचा. युद्धात लागणारे घोडे निजामशहा आदिलशाह मध्यपूर्व आशियातूनच आयात करायचे.

याच मध्यपूर्वेतून आलेल्या अरबी आणि तुर्की दोन जातीच्या घोड्यांचा संकर होऊन एक जात बनली, तेच हे आपले भीमथडीचे तट्ट.

सोळाव्या शतकापासून हे घोडे पुणे जिल्ह्यात दौंड बारामती इंदापूर भागात दिसू लागले होते.

भीमा नीरा कृष्णा नद्यांच पाणी या घोड्यांना चांगलेच मानवले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते काटक होते. प्रचंड वेगात धावायचे, त्यांच्यात भीमकाय ताकद होती. कित्येक तास तग धरण्याची क्षमता होती. शिवाय हे जनावर इमानदार होते.

शिवरायांनी या घोड्यांचे महत्व जाणले. गनिमी काव्याच्या युद्धप्रकारासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जाऊ लागला.

सह्याद्रीच्या दगडखोऱ्यात भीमथडी तट्टांचे टाप घुमू लागले. याच घोड्यांच्या साथीने मराठ्यांनी सुलतानशाही संपवली. आदिलशहावर वचक बसवला. मुघल सेनेला सळो की पळो करून सोडले.

शिवरायांच्या नंतरही शम्भू राजांनी या घोड्यांची पैदास, त्यांची निगा याकडे विशेष लक्ष दिले. आपल्या सैन्याला तसे आदेश दिले.

पुढे मराठा सत्तेचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब बादशाह स्वतः दक्षिणेत आला. त्याने शंभुराजांना अटक केली. त्यांना हालहाल करून मारले. राजाराम महाराजांना दक्षिणेत जावे लागले. बादशहाला वाटले मराठयांचा नामोनिशाण मिटला. पण तसं झालं नाही. संताजी- धनाजी सारखे शूरवीर यांच्या जोरावर स्वराज्य टिकले.

औरंगजेबाच्या महाप्रचंड लवाजम्याच्या सेनेवर रात्रीअपरात्री वायू वेगात हल्ला करून परत गायब होणे हे मराठी मावळ्याना भीमथडी तट्टांमुळे शक्य होत होते.

मुघलांच्यात मराठ्यांना सीवाजीके भूत म्हणून ओळखल जाऊ लागलं. त्यांचे घोडे देखील मराठयांच्या भीतीने चारा पाण्याला तोंड लावत नसत.

पुढे बाजीराव पेशव्याच्या काळात मराठी घोड्यांचे टाप नर्मदा नदी पार करून उत्तरेत पोहचले.

शिंदे, होळकर, नागपुरकर भोसले यांच्यामुळे मराठी सेनेची दहशत सगळीकडे पसरली. भारताच्या शेवटच्या टोकाला अटकेपार पेशावर पर्यंत आपण विजय मिळवला. महादजी शिंदेंनी बादशाहच्या दिल्लीवर वर्चस्व मिळवले.

भीमथडी चे तट्ट यमुनेचे पाणी पितात अस कौतुकाने म्हटलं जाऊ लागलं. कोणत्याही सैन्याच्या विजयात त्यांच्या घोडदळाचा मोठा वाटा असतो अस म्हणतात. मराठयांच्या बाबतीतही हे खरे होते.

अखंड भारतभर मराठ्यांचा सहज सोपा आणि वायूवेगात वावर होता तो याच भीमथडी घोड्यांच्या बळावर.

नंतरच्या काळात मात्र मराठी सत्ता क्षीण होत गेली. 1818 साली दुसऱ्या बाजीरावाचा इंग्रजांनी पराभव केला. खऱ्या अर्थाने भारत पारतंत्र्यात गेला. भीमथडी चा शेवटचा परिणामकारक वापर महाराजा यशवंतराव होळकरांनी केला.

पण पुढच्या काळात हे भीमथडी घोडे गायब होऊ लागले. तुरळक मेंढपाळ धनगरांच्या जवळ हे घोडे होते. मात्र लष्करी घोड्यांना सांभाळण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे त्याची निगा राखली गेली नाही. धूर्त इंग्रजांना या घोड्यांचे महत्व लक्षात आले होते.

सर जॉर्ज वॅट नावाच्या एका इंग्रज अधिकऱ्याने या घोड्यांच्या बद्दल लिहून ठेवले आहे.

1827 साली आळेगाव पागा इथे इंग्रजांनी 1 लाख पौंड खर्च करून भीमथडी घोड्यांच्या पैदाशी साठी स्टड फार्म सुरू केला. पण दुर्दैवाने दुष्काळ व अन्य नैसर्गिक कारणामुळे फटका बसून हे सर्व घोडे मेले.

1850 साली दख्खनी घोडे म्हणून ओळखले जाणारी मराठी शूरवीर भीमथडीचे तट्ट ही जात लुप्त झाली. या 1898 सालच्या अफगाणिस्तान युद्धावेळी इंग्रजांनी या घोड्यांचा खूप शोध घेतला मात्र त्यांना यश आले नाही. 1907 साली एका पाश्चात्य संशोधकांने लिहिले की

छत्रपती शिवाजी राजाचे पराक्रमी भीमथडी जातीचे घोडे पूर्णपणे नष्ट झाले आहेत.

तरीही काही जणांचा दावा आहे की हे घोडे पूर्णपणे नष्ट झाले नाहीत. मेंढपाळ धनगरांनी ही जात जगवली. पण त्यांची संख्या अतिशय कमी आहे.

आजही भीमथडी तट्टाचा आशियातील महत्वाच्या घोड्याच्या जातीत समावेश केला जातो. मध्यंतरी गुजरात सरकारने या घोड्यांना शोधण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याची मोहीम हाती घेतली होती.

महाराष्ट्राच्या सरकारने देखील यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि शिवरायांच्या इतिहासाच्या अभिमानाला जगवले पाहिजे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Sanjay waghchoure says

    Very nice

  2. bhal patankar says

    अप्रतिम माहिती आभारी

  3. सागर देवकर says

    खूप सुंदर प्रेरणा दायी माहिती…..जय शिवराय…..🙏🙏🚩🚩

Leave A Reply

Your email address will not be published.