छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, शेतकऱ्याचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे

शिवरायांची कार्यपद्धती कशी होती हे जाणायचे असेल तर एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

शिवपूर्वकाळापासून चिंचवड हे मोठे तीर्थक्षेत्र मानले जायचे.

मोरया गोसावींनां दृष्टांत होऊन सापडलेल्या गणेश मूर्तीची तिथे प्रतिष्ठापना केली गेली होती. थोड्याच काळात  या चिंचवड देवस्थानची प्रसिद्धी सर्वत्र पसरली. मोरया गोसावींच्या नंतर त्यांच्या उत्तराधिकारी पिढीला देवमहाराज असं संबोधले जाऊ लागले.

आजही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात तिथे यात्रा भरते. मोरया गोसावींच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा भंडारा घातला जातो.

आदिलशाह,दिल्लीचा मुघल बादशाह याच्यापर्यंत चिंचवड देवस्थानची किर्ती पोहचली होती. स्वतः शहाजीराजे गणरायाचे भक्त होते. असं म्हणतात दुसरा मुघल बादशाह हुमायून याचा जीव वाचवण्यास मोरया गोसावींनी मदत केली होती. यामुळेच फक्त हिंदू राज्यकर्त्यानीच नाही तर मुघल बादशाह,आदिलशाह, निजामशहा अशा मुस्लीम शासकांनी देखील चिंचवड देवस्थानाला देणग्या दिल्या होत्या.

चिंचवडच्या यात्रेसाठी धान्य, तूप, गुळ, नारळ अशा साहित्याची गरज असायची.या धर्मादाय कार्यासाठी मुघल सुभेदारांनी व सरदारांनी पूर्वीपासूनच खर्चाची सालाना तरतूद करून ठेवली होती.

याच तरतुदीमध्ये उल्लेख होता की,

कोकणातील पेण, पनवेल, नागोठने आदी भागातून या धर्मादाय कार्याकरिता लागणारा सर्व माल तेथील शेतकरी व व्यापाऱ्याकडून अगदी नाममात्र भावात खरेदी करण्याचा हक्क चिंचवडकर देवांना मिळाला होता.

यामुळे बाजारात भाव कितीही असो पडत्या भावाने असंख्य पोती माल बैलगाड्या भरून चिंचवडला आणला जाई.

दरवर्षीप्रमाणे चिंचवडकर देवांची कारकून मंडळी माल खरेदी करायला कोकणात उतरली, त्यांच्याबरोबर नोकरचाकर, बैलांचा तांडा, गाड्या असा ताफा होता. हा ताफा स्वराज्याच्या चौकी अधिकाऱ्यांनी अडवला. कारकुनाने कारण विचारले. तेव्हा उत्तर आलं,

की यावर्षी पासून शेतकऱ्याकडून माल बाजारभावातच खरेदी करायचा.   

चिंचवडकर कारकून चक्रावला. इतकी वर्षे आपण पडत्या भावाने माल खरेदी केला आहे, तशा सनदा आपल्या जवळ आहेत. शिवाय शिवाजी महाराज हे देव महाराजांचे परमभक्त आहेत. मग ही अडवणूक का? तो कारकून चौकीदाराला म्हणाला,

“आमच्या देव महाराजांनी जर तुमच्या विरुद्ध महाराजांकडे तक्रार केली तर महाराज तुम्हाला खडी फोडायला लावतील. तेव्हा ऐका आम्हाला आमचे काम करू दया, तुम्ही तुमची चाकरी सांभाळा.”

चौकीदार म्हणजे स्वराज्याचा मावळा होता. त्याने सुद्धा त्या कारकुनाला उत्तर दिल,

“जो पर्यंत महाराजांच आज्ञापत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला पडत्या भावाने माल मिळणार नाही. तुमचे सारे हक्क शिवाजी महाराजांनी जप्त केले आहेत. तो रयतेचा राजा आहे. तवा आता गुमान माग फिरा.”

चिंचवडकर कारकून आणि त्याचा ताफा चडफडत तिथून निघाला. तरी जाता जाता तो म्हणालाचं

“वा! काय न्याय आहे! काय धर्मपालन आहे ! शिवाजीच राज्य ! देवाधर्माच राज्य! अन देवकार्याला विरोध?? खासा न्याय!! खास धर्मपालन!!”

चिंचवडला गेल्या गेल्या सारा वृत्तांत देव महाराजांच्या कानावर घातला. त्यांना देखील धक्का बसला. काही तरी गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा म्हणून ताबोडतोब काही माणस राजगडावर शिवरायांना भेटायला पाठवली

राजगडावर महाराजांना देव महाराजांचं तक्रारीचं पत्र वाचून दाखवण्यात आलं. त्यात विनंती केली होती की पूर्वापार चालत आलेल्या रिवाजानुसार कोकणातून पडत्या भावाने माल खरेदी करण्याची परवानगी मिळावी.

शिवाजी महाराजांनी सार काही ऐकून घेतलं. त्याच्या सार काही लक्षात आलं. मनाशी काहीतरी निग्रह करून महाराज म्हणाले,

“पंत, श्री देव महाराजांना सरकारी आज्ञापत्र पाठवा की तुमचा पडत्या भावाने माल खरेदी करण्याचा हक्क जप्त करण्यात आला आहे! गरीब शेतकऱ्याचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे.”

देवमहाराजांना महाराजांनी लिहिलेलं पत्र मिळालं.

“श्रीच्या उत्सवासाठी व अन्न संतपर्नासाठी जो माल लागेल तितका स्वराज्याच्या सरकारी अंबरखाण्यातून विनामुल्य चिंचवडास पोच होईल. पडत्या भावाने माल खरेदी करून गोरगरीब जनतेस तोशीस लागु देवू नये. बहुत काय लिहिणे! आशीर्वाद असो द्यावा! ”

देव महाराज उद्गारले, हा राजा वेगळाचं आहे.

“ज्याच्या उपभोगाच्या अर्थालाच विरक्तीचा संग ज्याच्या वैभवाच्या ध्वजाला वैराग्याचा रंग”

शिवरायांनी धर्मकार्य की शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव हा प्रश्न उभा राहिल्यावर हा निर्णय घेतला. सध्याच्या लोकशाहीत सत्ता कोणाचिही असो, राज्य कोणाचेही असो पण असा निर्णय घेणं कोणाकडूनही शक्य नाही हे देखील तितकच खरं..

हे ही वाचा. 

1 Comment
  1. DATTA BHOSALE says

    Khup Chan….. jai shivray 🚩🚩🙏

Leave A Reply

Your email address will not be published.