आदर्श पिता म्हणून, पती म्हणून, बंधू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच महान होते…

छत्रपती शिवराय म्हंटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड-राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण शिवरायांचे कुटुंब, त्यांच्या अर्धांगिनी, त्यांचे महापराक्रमी पुत्र आणि राजकन्या यांची फार कमी माहिती आज आपल्याला माहीत आहे.

आदर्श पिता म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तेवढेच महान होते. अशा या वात्सल्यपूर्ण व्यक्तिमत्वाच्या कुटुंबाची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न..

छत्रपती शिवरायांना आठ पत्नी होत्या.

यात निंबाळकर घराण्यातील सईबाई राणीसाहेब, मोहित्यांच्या घराण्यातील सोयराबाई राणीसाहेब, गायकवाड घराण्यातील सकवारबाई राणीसाहेब, जाधवराव घराण्यातील काशीबाई राणीसाहेब, पालकरांच्या परिवारातील पुतळाबाई राणीसाहेब, शिर्के घराण्यातील सगुणाबाई राणीसाहेब, लक्ष्मीबाई राणीसाहेब आणि गुणवंताबाई राणीसाहेब अशा आठ महाराण्यांचा उल्लेख आपल्याला सभासद बखर, शिवभारत, शेडगावकर भोसले यांनी बखर तसेच तंजावर येथील शिलालेखातून मिळतो. यातील पुतळाबाई राणीसाहेब या २७ जून १६८० रोजी रायगडावर सती गेल्या.

सईबाई राणीसाहेबांच्या पोटी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा १४ मे १६५७ रोजी जन्म झाला. सईबाईंच्या पोटी सखवारबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई अशा तीन मुलींचा जन्म झाल्याची नोंद आपल्याला ऐतिहासिक साधनांमध्ये वाचायला मिळते.

यापैकी सखवारबाई उर्फ सखुबाई यांचा विवाह फलटणच्या बजाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या मुलाशी, महादजी निंबाळकरांशी झाला. अंबिकाबाई यांचा विवाह महाडिक राजघराण्यातील हरजीराजे यांच्याशी झाला. हरजीराजे यांच्याकडे जिंजी प्रांताची जबाबदारी होती.

सोयराबाई राणीसाहेबांच्या पोटी स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला. त्यांच्या जन्मविषयी दिलेली हकीकत अतिशय रोचक आहे.

सभासद म्हणतो,

“मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती. तीस पुत्र जाहला. तो पालथा उपजला. राजियास वर्तमान सांगितले. राजे म्हणू लागले की, ‘दिल्लीची पातशाही पालथी घालील.’ असे बोलिले. मग ज्योतिषी म्हणो लागले, ‘थोर राजा होईल, शिवाजीराजियाहून विशेष कीर्ती होईल.’ असे भविष्य केले.

मग राजियानी राजाराम म्हणोन नाव ठेविले.”

सोयराबाईंना दादूबाई नावाची एक मुलगी असल्याचा उल्लेख तंजावरच्या शिलालेखात आला आहे. पण, शेडगावकर बखरीत सोयराबाईंना दिपाबाई नावाची एक मुलगी असल्याचा व तिचे विसाजीराव नामक मराठा सरदारशी लग्न लावल्याचा उल्लेख आहे. दादूबाई आणि दिपाबाई या दोन्ही एकच असाव्यात, असे वाटते.

सकवारबाई राणीसाहेबांच्या पोटी एका मुलीच्या जन्माची नोंद शिवापूरच्या बखरीत आढळून येते. शेडगावकर बखरीत सकवारबाईंची मुलगी कमळाबाई यांचा विवाह पालकर कुटुंबात झाल्याची नोंद आढळते. तसेच, मल्हार रामराव चिटणीस बखरीत संभाजी महाराजांचा मेव्हणा म्हणून एका पालकर कुटुंबातील व्यक्तीचा उल्लेख आला आहे. सगुणाबाई यांच्या पोटी राजकुंवर बाईसाहेबांचा जन्म झाला. काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाऊ यांना पुत्र असल्याची नोंद कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही.

शिवरायांच्या एकूण पुत्रांची विविध साधनामधून मिळणारी माहिती अशी,

संभाजी राजे आणि राजाराम महाराज हे पुत्र.

तर ६ कन्या होत्या. यात सखुबाई (सईबाई  राणीसाहेबांची मुलगी, महादजी निंबाळकर यांच्याशी विवाह), राणूबाई (सईबाई राणीसाहेबांची मुलगी, बहुतेक जाधवराव घराण्यात विवाह), अंबिकाबाई (सईबाई राणीसाहेबांची मुलगी, हरजीराजे महाडिक यांच्याशी विवाह)

दिपाबाई किंवा दादूबाई (सोयराबाई राणीसाहेबांची मुलगी, विसाजीराव या मराठा सरदारशी लग्न), कमलाबाई (सकवारबाईंची मुलगी, पालकर कुटुंबात लग्न) राजकुंवर बाई (सगुणाबाईंची मुलगी, दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्याशी लग्न)

अशी ही एकूण शिवरायांच्या कुटुंबाची, त्यांच्या भल्यामोठ्या राजपरिवाराची माहिती.. शिवरायांच्या दोन्ही पुत्रांनी तसेच त्यांच्या जावयांनीसुद्धा इतिहासात पराक्रम गाजवला होता. भोसले घराण्यातील महान पुरुष म्हणवल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांसोबत ज्या राजघराण्यांना सोयरीक करण्याचे भाग्य लाभले त्यांचे नशीब थोर म्हणावे लागेल.

एकूणच काय, तर स्वराज्याचे छत्रपती असणारे शिवाजी महाराज कुटुंबवत्सल व्यक्ती होते, हेच इतिहासातील अनेक घटनांवरून आपल्याला समजते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.