शिवरायांच्या न्यायाची कृतज्ञता म्हणून त्यांच्या हयातीत साकारलं होत त्यांच पहिलं शिल्प.

साल होत १६७८. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून स्वराज्याकडे येत होते. परतीच्या मार्गावरही येताना वाटेतील छोटे मोठे परगणे आणि बाजारपेठा, कसबे यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ठाणी त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती.

अशा पैकीच एक छोटे ठाणे होते कर्नाटकातील धारवाड जवळचे बेलवडी यादवाड. येसाजी प्रभूदेसाई इथला प्रमुख होता. येसाजीला शिवरायांच्या बद्दल आदर होता. तो महाराजांची कीर्ती ऐकून होता. कोणत्याही लढाईबिना स्वराज्याचे मांडलिकत्व स्वीकारण्यास तो तयार होता.

शिवराय वेगाने पन्हाळ्याकडे मार्गक्रमण करत होते. त्यांनी या छोट्याशा ठाण्याची जबाबदारी आपल्या मेहुण्याला सखुजी गायकवाड यांना दिली. सखुजी गायकवाड हे सकवारबाई राणीसाहेब यांचे बंधू होते. मराठी सैन्याचा तळ यादवाडच्या जवळ पडला. तेव्हा सैन्यातील काही शिलेदार गावात दुध विकत घेण्यासाठी गेले. यावेळी तिथल्या गवळ्यानी त्यांना दुध देण्यास नकार दिला.

शिवरायांचे मराठी सैन्याला सख्त आदेश होते की सामान्य जनतेच्या धान्याच्या एका कणालाही हात लावायचा नाही. दुध घेण्यासाठी आलेले मावळे परत गेले. पण रात्री काही तरी गोंधळ उडाला. गावकऱ्यांचे म्हणणे होते मराठा सैन्यापैकी काही जणांनी गावातल्या गाई ओढून नेल्या.

प्रकरण हातघाईवर आले. दोन्हीकडचे सैन्य आपापसात भिडले. येसाजी प्रभुदेसाई जी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत होता तेच घडले.

युद्धाला तोंड फुटले. या युद्धात बेलवाडीच्या सैन्याचा मोठा पराभव झाला. येसाजी प्रभुदेसाई धारातीर्थी पडला. सखुजीला वाटले यादवाडची गढी हातात आली. पण बेलवडीची राणी मल्लाबाईच्या नेतृत्वाखाली सैन्याने लढा सुरूच ठेवला. मल्लाबाई ही स्वतः कुशल सेनानी होती. तिने स्त्रियांची एक तुकडी उभी केली होती. या तुकडीसोबत ती स्वतः चिलखत तलवार घेऊन रणांगणात तुटून पडली.

हा हल्ला मराठी सेनेसाठी अनपेक्षित होता. इतक्यात कोणीतरी तिच्या घोड्याला जखमी करून पाडले. तिला जेरबंद करण्यात आलं. तिच्या तुकडीतल्या महिला सैनिकांना थपडा लगावण्यात आल्या.

मल्लाबाई देसाईनीला महाराजांसमोर उभे करण्यात आलं. तिला महाराजांचा न्याय ठाऊक होता. तिन आपलं गाऱ्हाण त्यांच्या पुढ मांडल. महाराजांनी सगळ म्हणण पूर्ण ऐकून घेतलं. आपल्या मेहुण्याने केलेल्या गुस्ताखी बद्दल त्यांचा पार चढला. आपल्या सैनिकाकडून होणाऱ्या छोट्याशा गैरव्यवहाराला सुद्धा त्यांनी मोठ्यात मोठ्या शिक्षा सुनावल्या होत्या.

सखुजी गायकवाड यांचे डोळे काढण्याचे आदेश देण्यात आले. सगळा दरबार या निर्णयामुळे अचंबित झाला.

पतीच्या निधनानंतर मोठ्या धीराने मराठी सैन्याशी दोन हात करणाऱ्या राणी मल्लाबाई ला तिचे राज्य मुलांच्या दूध भातासाठी म्हणून महाराजांनी परत दिले. त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मल्लाबाईला आईच्या जागी मानून सावित्री म्हणून गौरवले .

या घटनेचे वर्णन शेषो श्रीनिवास यांनी “शिवाजी मल्लामाजी समरोत्सव” या पुस्तकात  केले आहे. शिवाय जदुनाथ सरकार यांनी भाषांतरीत केलेल्या बखरी मध्येही याची नोंद आढळते. 

शिवरायांच्या न्यायाची आठवण कायम स्वरूपी लक्षात रहावी म्हणून मल्लाबाईने शिवरायांच्या हयातीत हे पहिले शिल्प बनवले. शिवरायांच्या प्रति कृतन्यता म्हणून तिने आपल्या राज्यामध्ये अश्या प्रकारचे शिल्प काळ्या पाषाणात तयार करून ठेवले आहे.आणि हे त्या वेळेचे, शिवाजी महाराज्यांच्या काळातले आहे. जगातले शिवाजी महाराजांचे हे पहिले दगडी शिल्प आहे.

या शिल्पामध्ये शिवाजी महाराज मसनदीवर बसलेले आहेत. एक बाळ त्यांच्या मांडीवर आहे. त्याला महाराज वाटीतून दूध पाजत आहेत. आणि दोन स्रिया दोन्ही बाजूला आहेत. त्यातील एक शिल्प मल्लामाचे असावे कारण तशी वेशभूषा दिसते आहे.

मल्लाबाईला आजही यादवाड मध्ये देवीच्या जागी मानून पूजले जाते. दरवर्षी मल्लाम्मा महोत्सव साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या स्त्रीदाक्षिण्य आणि न्यायाच्या आदर्शाच्या गौरवगाथा गायल्या जातात.

हे ही वाच भिडू.

1 Comment
 1. Santosh raje Gaikwad says

  सेखोजी गायकवाड यांना महिलांना थप्पड लावल्या होत्या म्हणून शिक्षा झाली नव्हती त्याला कारण वेगळे होते
  सेखोजी गायकवाड यांच्या बद्दल जी ही माहिती दिली जाते ती पूर्णपणे चुकीची आहे.
  थोड्याच दिवसात समकालीन पुराव्यानिशी व कागदपत्रांच्या आधारे आम्ही हे सगळ्यांच्या पुढे मांडणार आहोत.
  जो बदफैलीचा आरोप सेखोजी गायकवाड यांच्यावर केला जातो व गायकवाड घराण्याविषयी गैरसमज पसरवले जातात ते पूर्णपणे चुकीचे आहे.
  सेखोजी गायकवाड यांच्यावर जे आरोप आहेत त्याला कोणतेही समकालीन पुरावे व कागदपत्रे उपलब्द नाहीत.
  आपणांस विनंती आहे ही बातमी आपण काढून टाकावी व सेखोजी गायकवाड व आमच्या गायकवाड घराण्याविषयी गैरसमज पसरवू नयेत.

Leave A Reply

Your email address will not be published.