छ. शिवाजी महाराज किल्ल्यांवर अवाढव्य पैसे खर्च करतात असं त्यांच्या प्रधानांना वाटायचं

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दुर्गात झाला. महाराजांना वैभव प्राप्त झाले तेही सर्व दुर्गांच्यामुळे झाले व त्यांच्या ताब्यातील दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्यांच्याच प्रयत्नाने झाले. त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रुंना धाक होता. त्यांच्या राष्ट्राची ती संवर्धन भूमी होती. त्यांच्या विजयाचा तो पाया होता. 

दुर्ग हेच त्यांचे निवासस्थान आणि तेच त्यांच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्यांनी स्वतः बांधले व जे आधी बांधले होते त्या सर्वांना महाराजांनी बळकटी आणली. 

शिवकाली महाराष्ट्रात ३६१ किल्ले होते, असे चित्रगुप्त श्रीशिवछत्रपतींच्या दुर्गांची संख्या देऊन सांगतो. मल्हार रामराव चिटणीस यांनी शिवछत्रपतींच्या दुर्गांची एकंदर संख्या ३१७ दिली आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी स्वराज्यात एकूण ३६० किल्ले होते. त्यापैकी १४५ महाराजांनी बांधलेले होते. असं सांगितलं जातं.

शिवाजी महाराजांचे १६७१-७२ चे किल्ल्यांच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी केलेले एक अंदाजपत्रक उपलब्ध आहे.

या अंदाज पत्रकात रायगडासाठी ५०,००० होन, सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, विशालगड, प्रतापगड, पुरंधर, राजगड या किल्ल्यांसाठी प्रत्येकी १०,००० होन, प्रचंडगड, प्रसिद्धगड, महिपतगड, सुधागड, लोहगड, सबळगड, श्रीवर्धनगड, मनरंजनगड यांसाठी प्रत्येकी ५,००० होन,कोटीगडासाठी ३,०००, सारसगडासाठी व महिधरगडासाठी २,०००, मनोहरगडासाठी १,००० व किरकोळ दुरुस्ती व बांधकामासाठी ७,००० होन असे खर्च करावयाचे ठरवून दिले आहे. अर्थात ही सर्व रक्कम एकाच वर्षी खर्ची पडली असेल असे नाही. 

पण १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या मुलुखात मोठाली बांधकामे सुरू केली असतील असे मुंबईहून सुरतेच्या वखारदारांना गेलेल्या पत्रांवरून स्पष्ट होते. 

या इमारत बांधकामावरील मजुरांचा रोजगार प्रमाणापेक्षा अधिक वाढवून शिवाजी महाराजांनी येथील त्या मजुरांना मोठ्या प्रमाणात कामे देण्याचा उपक्रम आखला. त्यामुळे देशातील मजुरांना कामे व वाढता रोजगार मिळालाच, पण सुरत व मुंबईकडील वाकबगार समजल्या जाणाऱ्या मजुरांचा ओघ पण शिवरायांच्या बांधकामाकडे जाऊ लागला व सुरत-मुंबईकडे इंग्रजांना मजुरांची चणचण भासू लागली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा गडावर होणारा हा अवाढव्य खर्च त्यांच्या काही मुत्सद्यांना मान्य नव्हता असे म्हणतात. त्यांनी एकदा साहस करून ती गोष्ट महाराजांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी त्यांचे त्यांना योग्य उत्तरही दिले. 

शिवदिग्विजयात ही घटना लिहून ठेवली आहे.

अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पेशवे व निराजीपंत मुजूमदार यांनी असलेला खर्च पाहून महाराजांना विनंती केली की, 

“किल्ल्याचे इमारतीस पैका फार लागतो व लोकांचाही खर्च फार वाढतो. याकरिता विचारें जे करणे असेल ती आज्ञा असावी; म्हणजे ठीक पडेल.” 

हे ऐकून महाराज म्हणाले, “

सध्याचा जो खर्च होतोय तो गरजेचाच आहे. शत्रूला राज्यात घुसू न देता आपणांस धर्मस्थापना करणे व राज्य संपादणे, प्रजेला अन्नपाण्याची सोय करणे हे किल्ल्यामुळे होते. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे; तो आला तरी नवे जुने तीनशे साठ किल्ले हजेरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी, तीनशे साठ वर्षे पाहिजेत. मसलत पडेल तेथे कुमक करून, शत्रूस पाहता दुसरा लाविला असतां शेकडो वर्षानी राज्य जाणार नाही. दोन रुपये कम जास्त खर्च हा प्रपंच नव्हे, आदा पाहून करावा हे राज्यभाराचे विचार अल्पकार्या करता कोट्यवधी रुपये खर्च करून गोष्ट सिद्धीस न्यावी.”

यावरून शिवछत्रपतींचा दुर्गविषयक दृष्टिकोन सुस्पष्ट होतो.

शिवछत्रपतींचा प्रत्येक दुर्ग त्यांच्या प्रत्यक्ष स्वामित्वाखाली म्हणजे मध्यवर्ती सत्तेच्या स्वामित्वाखाली होता. कोणत्याही वतनदार अथवा जहागीरदाराला स्वतंत्र गड बांधणे तर लांबच राहिले पण आपल्या निवासस्थानाभोवती साधी गढी बांधायलाही अनुज्ञा नव्हती. 

प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे व प्रत्येक गडाच्या कारभाराची स्वतंत्र व्यवस्था होती.

शिवकालात महाराजांनी किल्लेबांधणीस व किल्ले रक्षणास फार महत्त्व दिले होते. गडकोटाचे महत्त्व सांगताना अमात्य आपल्या आज्ञापत्रांत लिहितात, 

हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामीनी (शिवाजी महाराजांनी) गडावरून निर्माण केले. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश. परचक्र येतांच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो. देश उध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे? गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजे सुख निद्रागार किंबहूना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण, असे पूर्ण चित्तांत आणून, कोणाचे भरवशावर न रहाता आहे त्याचे संरक्षण व नूतन बांधण्याचा हव्यास स्वताच करावा, कोणाचा विश्वास मानू नये.”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.