छ. शिवाजी महाराज नसते तर आज इराणची भाषा सगळ्या भारताची राजभाषा राहिली असती.

भाषेवरून अनेक वाद सुरु असतात. देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे कि नाही यावरून अनेकदा चर्चा होते. तामिळ मल्याळम या दाक्षिणात्य लोकांचा या भाषेला विरोध असतो. भाषा हे संपर्काचे साधन असावे पण बऱ्याचदा भांडणाचे कारण ठरते. एक गोष्ट मात्र नक्की की  ठिकाणचे व्यवहार स्थानिक भाषेतून झाले पाहिजेत. बहुसंख्य लोकांना समजेल याच भाषेत कारभार चालला पाहिजे.

हा विचार करणारे दूरदृष्टीचे राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

महाराजांच्या काळापर्यंत मुघलांचे राज्य देशभरात पसरले होते. त्यावेळचा राज्यकारभार फार्सी भाषेत चालायचा. मध्य आशियातून आलेल्या मुघलांनी तो रूढ केला होता मात्र आधी बाराव्या शतकापासून परकीय आक्रमणे भारतावर होत होती तेव्हा पासून अरबी तुर्की फार्सी या भाषांची भारतीय भाषांवर कुरघोडी सुरु झाली.

परकीय राज्यकर्ते त्यांच्या मातृभाषेत राज्यकारभार चालवू लागले. याचा परिणाम सर्वसामान्य जनता प्रशासनापासून तुटू लागली. अशिक्षितपणा वाढला. गरिबी वाढली.

फक्त भाषाच नाही तर भारतीय संस्कृतीवर हे आक्रमण होत होते.

विशेषतः महाराष्ट्रात मराठीचे रक्षणकर्ते यादवराजांचा नाश झाला तेव्हा भाषेचा कोणी वाली उरला नव्हता. आदिलशाही निजामशाही हे सुलतान राज्यात धुमाकूळ घालत होते.या जुलुमाला रयत कंटाळली होती. अशातच अंधःकारमय कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने सूर्य उगवला.

महाराजांनी बारा मावळातील सवंगडी गोळा करून किल्ले ताब्यात घेण्यास सुरवात केली. आधी सुलतानांना हे जहागीरदाराचे बंड वाटले होते मात्र त्यांना ठाऊक नव्हते ही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना होती.

महाराजांनी स्वतःची राजमुद्रा बनवून घेतली तीही संस्कृत भाषेत. ही नव्या युगाची नांदी होती.

अफझल खान, शाहिस्तेखान, मिर्झाराजे दिलेरखान, सिद्दी अशा अनेक आक्रमणांना महाराजांना सामना करावा लागला. वेळ प्रसंगी एक पाऊल मागे घेतले मात्र स्वराज्याशी तडजोड  केली नाही. मुघलांच्या पासून ते इंग्रजापर्यंत सर्व शत्रुंवर वचक राखण्यासाठी राज्याभिषेक घडवून आणला.

शिवछञपतींना केवळ राज्य स्थापन करायचे नव्हते तर रामचंद्र पंत अमात्य म्हणतात त्याप्रमाणे नूतन सृष्टी निर्माण करायची होती. शेकडो वर्षे राजभाषा फार्सी असल्यामुळे राजव्यवहारातच नाही तर बोली भाषेत देखील अरेबिक शब्द घुसडले गेले होते.

मराठी भाषा संस्कृती याला अवकळा आली होती. संस्कृत भाषा सर्वसामान्यांना समजेनाशी झाली होती.

हे मरगळ आलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विविध प्रकारच्या योजना पुन्हा कार्यावहित करायचे ठरवले. परकीय संस्कृतीचे सावट दूर करण्यासाठी आणि फारसी भाषेचा प्रभाव दूर करण्यासाठी रघुनाथ पंडित याना राज्यव्यवहारकोश बनवण्याचा आदेश दिला.

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थं यवनवचनैर्लुप्तसरणिम् |
नृपव्याहार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्
नियोक्तोभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ||

हाच तो आदेश. यात उल्लेख आलेले रघुनाथ पंडित म्हणजे तंजावर प्रांतातून आलेले रघुनाथपंत हणमंते हेच असावेत असा अनेकांचा अंदाज आहे.

रघुनाथ हनुमंते यांनी एका विद्वान माणसाला बोलवून घेतले त्यांचे नाव ‘धुंडीराज व्यास’ . या दोघांनी मिळून ‘राज्य व्यवहार कोश’ तयार केला त्यामध्ये संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्व दिले गेले. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत.

वजीरच्या जागी प्रधान, दिवाणच्या जागी सचिव असे संस्कृत शब्द उपयोजण्यास सांगितले. सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी

फक्त भाषाशुद्धी करून ते थांबले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राजकीय पत्रव्यव्हार म्हणजेच ’लेखनपद्धती’ मध्ये मराठी भाषा जास्तीतजास्त वापरली जावी यासाठी प्रयत्न केले. याकामी बाळाजी आवजी चिटणीस यांची नेमणूक केली होती. बाळाजी आवजी यांनी तयार अनेक प्रकारचे  तर्जुमे तयार केले. या बरोबरच महाराजांनी ‘’मेस्तके’’ व अधिका-यांच्या कामासंबंधातील नियम ‘’कानुजावते’’ तयार करवून घेतली. 

शिवकालातील या स्वभाषाभिमान परंपरेतूनच पुढील काळात कार्यालयीन पत्रव्यवहाराच्या पद्धती सांगणारा ‘’लेखनकल्पतरू’’ हा ग्रंथ निर्माण झाला. 

मराठी, संस्कृत या भारतीय भाषांना राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराजांनी केलेले प्रयत्न वाया गेले नाहीत. शिवरायांनी घातलेला पायंडा पुढच्या पिढ्यानी सांभाळला.

इतिहासकार वि. का. राजवाड्यांच्या मते सन १६२८ मध्ये मराठी(+फ़ार्सी) पत्रलेखनात मराठी शब्दांचे प्रमाण शेकडा १४.४ टक्के होते, ते १६७७ सालामध्ये ६२.७ एवढे आणि १७२८ सालामध्ये ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले.

सध्याच्या लाखभर शब्दसंख्या असलेल्या मराठीतही तुर्की-अरबी-फ़ार्सी शब्द आहेत. दरवाजा, कुलूप,किल्ली,दिवाण असे अनेक शब्द फार्सी आहेत मात्र  प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. मराठीचे अनुकरण हिंदी, गुजराती,राजस्थानी बंगाली या इतर देवनागरी भाषांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान गवसला. नाही तर आजही भारतात राजभाषा एकतर इंग्रजी नाही तर फार्सी राहिली असती.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. सागर म्हात्रे says

    तुम्ही मराठी भाषेबद्दल व महाराजांबद्दल खूपच छान माहिती दिली आहे … धन्यवाद .

Leave A Reply

Your email address will not be published.