शिवरायांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप काय होता ?

युगकर्ते शिवाजी महाराज हे सर्वार्थाने रयतेचे राजे होते. परकीय सत्तांपासून मराठी मातीचे रक्षण तर त्यांनी केलेच पण त्यांचा इतिहास फक्त ढालतलवारीचा नाही. तो औदार्याचा, समतेचा आहे. दूरदृष्टीचा आहे.

महाराज द्रष्टे होते, हजारो वर्षे पुढचं त्यांना दिसत होतं. फक्त जुन्या परंपरांना धरून राहण्यापेक्षा अधिकाधिक आधुनिक होण्याचा त्यांनी त्या काळी प्रयत्न केला होता.

याचं एक उदाहरण म्हणजे त्यांनी रायगडावर स्थापन केलेला लिहिता मंडप म्हणजेच प्रिंटिंग प्रेस.

गोष्ट आहे १६७० सालची. सुरतमध्ये भीमजी पारेख नावाचा एक धनवान व्यापारी होता. पिढीजात सावकारीचा त्याचा धंदा होता. भीमजी पारेख मात्र स्वाभिमानी होता. सुरतवर मुघलांचे राज्य होते.

तेव्हाच मुघल बादशहा औरंगजेब कट्टर धर्मांध होता. त्याने सत्तेत येताच जिझिया सारखा कर लादला. काशी विश्वेश्वरासारखी स्थळे उद्वस्त करण्यापर्यंत त्याची मजल वाढली होती. त्याच्या काळात संपूर्ण देशात धार्मिक अत्याचार वाढला.

व्यापारी असून भीमजी पारेख औरंगजेबाच्या धार्मिक जुलूमाविरुद्ध उभा राहिला.

त्याने महाबलशाली आलमगीर औरंगजेबाच्या विरुद्ध सुरत मध्ये ८०० हिंदू व्यापाऱ्यांना घेऊन बंड केले. सुरतचा व्यापार ठप्प केला. एकप्रकारचा हा संपच होता. औरंगजेब दाद देत नाही हे पाहून भीमजी पारेख या ८०० व्यापाऱ्यांना घेऊन सुरतेच्या बाहेर पडला.

एका व्यापाऱ्याने केलेल्या अहिंसक बंडामुळे अखेर औरंगजेबाला गुडघ्यावर यावे लागले.

त्याने सुरतमधून जाचक नियम अटी मागे घेतल्या. सर्व व्यापारी सुरतमध्ये परतून आले.

या भीमजी पारेखचे ईस्ट इंडिया कंपनीशी चांगले संबंध होते.

त्यांच्यामुळेच तो मुंबईला राहायला आला. इंग्रजांच्या मुंबईत गुजराती लोकांची पहिली वस्ती भीमजी पारेखने स्थापन केली. थेट इंग्लंडशी गुजराती व्यापार दृढ झाला.

याच भीमजी पारेखने लंडनवरून पहिले प्रिंटिंग मशीन मागवले आणि मुंबईत छपाईचा धंदा सुरू केला. ते वर्ष होते १६७४. याच वर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.

तेव्हा मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर होता जीराल्ड अँजिअर. तो मराठ्यांना प्रचंड घाबरायचा.

सुरत प्रमाणे हल्ला होऊन नये म्हणून त्याने मुंबईभोवती कोट उभारण्यास सुरवात केली होती. शिवरायांची कृपादृष्टी राहावी म्हणून त्याने आपला प्रतिनिधी शिवराज्याभिषेकावेळी रायगडावर पाठवला होता.

याच गव्हर्नर अँजिअरने भीमजीला मुंबईला आणले, त्याला लंडनवरून प्रिंटिंग प्रेस विकत आणण्यास मदत केली, तिथले प्रेसवर काम करणारे कामगार देखील उपलब्ध करून दिले.

काही लोकांचा दावा आहे की भारतीयांना प्रिंटिंगची कला कळू नये म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी मुद्दाम आपले कारागीर पारेख याला दिले होते.

इंग्रजांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर या प्रिंटिंग प्रेस बद्दल माहिती आली. त्यांनी पारेख याच्या कडून ही प्रेस खरेदी केली.

महाराजांनी हा छापखाना रायगडावर आणून बसवला देखील. त्याला नाव देण्यात आले होते,

लिहिता मंडप

महाराजांनी मराठीतले अनेक दुर्मिळ ग्रंथ जतन करण्यासाठी हा प्रेस विकत घेतला होता.

त्यांनी त्याकाळी हे द्रष्टेपण दाखवले होते. आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मराठी जनतेपर्यंत पोहचावे ही दूरदृष्टी त्यांच्या जवळ होती.

हौसेने त्यांनी हा लिहिता मंडप रायगडावर बसवला फक्त एकच प्रश्न होता की प्रिंटिंग कसे करायचे?

कारण त्याकाळी अजून या प्रिंटिंग प्रेसवर इंग्रजी सोडून मराठी व इतर भारतीय भाषांमधली छपाई होत नव्हती. मुंबईत भीमजी पारेख देखील गुजराती छपाई करता यावी यासाठी प्रयत्नशील होता. त्याची खटाटोप चालू होती, संशोधन चाललं होतं पण वेळ लागत होता.

मराठ्यांचे देखील प्रयत्न चालू होते.

पुढे महाराज कर्नाटक व इतर मोहिमेत व्यस्त झाले. मराठीत छपाई करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. अखेर रायगडावर धूळ खात पडलेले प्रिंटींग प्रेस भीमजी पारेखला परत करण्यात आले.

या घटनेबद्दल अनेक वर्षे काहीच माहिती नव्हती. मात्र १८८१ साली सर एच. जे. ब्रूस या इंग्रज अधिकाऱ्याने एक लेख प्रसिद्ध केला त्यात ही माहिती छापून आली.

सुप्रसिद्ध लेखक पॉलिटीशीयन कन्हैयालाल मुन्शी यांनी ऑल इंडिया लायब्ररी कॉन्फरसमध्ये हा दावा केला. इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या वार्तापत्रात देखील लिहिता मंडपबद्दल उल्लेख येतो. मालोजी जगदाळे व केतन पुरी हे इतिहास संशोधक याबद्दल अधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अस सांगितलं जातं की इंग्रजांना भारतीय लोक प्रिंटिंगची कला शिकावेत ही इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी मराठी गुजराती या भाषा छपाई करण्याचे तंत्रज्ञान त्याकाळी शोधले नाही.

पुढे पन्नास वर्षांनी विल्यम कॅरी या ख्रिश्चन मिशनऱ्याने ही कला शोधली व भारतभरात प्रसारित केली.

महाराजांच्या हे छपाईचे तंत्रज्ञान अवगत झाले असते तर विचार करा आज इतिहास किती वेगळा असता.

छत्रपतींच्या काळातील प्रत्येक गोष्ट आपल्याला वाचता आली असती, पुढे घडून आलेले सामाजिक प्रबोधन, शिक्षणाची लाट हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखरेखी खाली अधिक परिणामकारकरित्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोरगरीब बहुजन रयतेपर्यंत सहज पोहचलं असतं हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.