शिवरायांनी पुरंदरचा तह केला त्यामागेही शेतकऱ्यांसाठीचा विचार होता.
बळीराजानंतर दुसरा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयत सुखी, राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य रयतेच्या, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. ही त्यांची भावना होती.
याचे एक महत्वाचे उदाहरण म्हणजे पुरंदरचा तह
शाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवंतसिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता. मराठ्यांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे त्याने ओळखले. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा परिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला.
मिर्झा राजे जयसिंग.
ऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन मिर्झाराजे स्वराज्यावर चालून आला. तो शाहिस्तेखानच्या प्रमाणे आततायी नव्हता. त्याने पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरु करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या खिंडार पडले. मोगल फौजेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला.
पुरंदर पडला मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवण्यासाठी एक पाऊल मागे यायचं ठरवल. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत तह केला.
या तहामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. पण महाराजांनी हा निर्णय घेण्यामागे एक कारण होते.
तह झाला तो महिना जुनचा होता. तेव्हा पेरणीचे दिवस होते. आता जर युध्द थांबले नाही तर आपल्या स्वराज्यातील सैन्याला पेरणी करता येणार नाही. आता जर युद्ध झाले तर सैनिकांना युद्धातच अडकावे लागेल. आणि जर पेरणी नाही झाली तर स्वराज्याला भविष्यात अन्नधान्याची कमतरता होईल. स्वराज्यातील सर्वच सैनिक शेतकरीच आहेत.
त्यावेळी स्वराज्यात चार महिने शेतात राबून दसऱ्याच्या नंतर खरिपाचे धान्य घरात आल्यावर मगच युद्धासाठी बाहेर पडण्याची पद्धत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडली होती.
जर तेव्हा जूनमध्ये युद्ध चालूच राहिले तर राज्याची सगळी व्यवस्थाच कोलमडेल अशी स्वराज्यातील शेतकऱ्यांविषयी बारीक जाण छत्रपती शिवाजी महाराजांना होती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर परत कोणी असा राजा झालेला नाही .
म्हणूनच इतिहासकारांनी त्यांचे वर्णन शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा, असे केले आहे.
संदर्भ- शेतकऱ्यांचा राजा शिवाजी, शरद जोशी
हे ही वाच भिडू.
- धर्मकार्य की शेतकऱ्यांचा मालाला योग्य बाजारभाव, शिवरायांनी घेतला होता हा निर्णय..
- शिवरायांमुळे जळगावच्या मातीत केळी पिकवण्यास सुरवात झाली.
- आणि म्हणून महाराजांनी ठरवलं भारतातलं पहिलं सुसज्ज आरमार उभा करायचं !!