छ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली होती

छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. महाराष्ट्राच्या मातीचे शत्रू फक्त मुघल बादशाह, आदिलशाह, जंजिऱ्याचा सिद्दी हे होते अस नाही तर टोपीवाले इंग्रज आणि पोर्तुगीज हे देखील तितकेच धोकादायक आहेत हे त्यांनी आधीच ओळखलं होतं.

पोर्तुगीज हे धूर्त राज्यकर्ते होते. आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून मराठयांशी सलोख्याच धोरण स्वीकारलं होतं.

जेव्हा महाराजांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा पोर्तुगीज व्हॉईसरॉयने आपल्या राजाला पाठवलेल्या पत्रात छ.शिवाजी महाराजांची तुलना जगजेत्या सिकंदराशी केली होती.

मात्र महाराजांना पोर्तुगीजांचा स्वभाव ठाऊक होता.

एक हातात तागडी व एका हातात बंदूक घेऊन आलेले हे परकीय व्यापारी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. संधी मिळताच ते आपल्या देशात पाय रोवून बसतील याचा त्यांना अंदाज होता.

गोव्यातल्या जनतेवर पोर्तुगीज करत असलेला अत्याचार छत्रपतींच्या कानावर येत होता मात्र इतर मोहिमा सुरू असल्यामुळे त्यांचे हात जखडलेले होते. शिवाय त्यांना चुचकारून त्यांची मदत घेण्याचं धोरण देखील त्यांनी राबवलेलं होतं.

तरीही सिद्दीबरोबर पोर्तुगीजांवरही वचक रहावा म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती.

गोव्याच्या बारदेशमध्ये पोर्तुगीजांनी बळजबरीने धर्मांतर घडवून आणले आहे ही बातमी जेव्हा शिवरायांना समजली तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहचली. नोव्हेंबर १६६७ रोजी ते स्वतः जातीने गोव्यात उतरले. मराठ्यांनी बारदेशवर हल्ला करून पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवला.

पोर्तुगीज व्हाईसरॉयला स्वतःचा पराभव मान्य करत मराठयांशी तह देखील केला होता.

डिचोली येथे महाराजांनी आपला तळ उभारला होता. पोर्तुगीजांनी पराभव मान्य केल्यावर शिवराय परत राजगडावर येण्यासाठी निघाले मात्र जाताना त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी एक गुप्त व धाडसी योजना आखली.

पोर्तुगीजांपासून गोवा स्वतंत्र करण्याची योजना.

आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सर्जिकल स्ट्राईक. गोवा म्हणजे पोर्तुगिजांचा बालेकिल्ला होता. जवळपास दिडदोनशे वर्षे त्यांचं इथे राज्य होतं. त्यांना सहज हरवणे शक्य नव्हते. त्यासाठी गनिमीकावाच करावा लागणार होता.

या योजनेनुसार हमाल, गवंडी, फेरीवाला वगैरेंच्या वेशांत मराठा मावळे ओल्ड गोव्यात घुसवण्यात आले.

सुरवातीला चारशे ते पाचशे सैनिक गेले होते, नंतर ही संख्या दुप्पट करायची होती. एकदा पुरेशी तयारी झाली की, अचानक रात्री हल्ला करून ओल्ड गोव्यात शिरणारा रस्ता ताब्यात घ्यायचा.

एकदा रस्ता ताब्यात आला की बाहेर सज्ज असलेल्या मुख्य सेनेने हल्ला करून बेसावध पोर्तुगीजांच्या हातून गोवा काढून घ्यायचा अशी ही महत्वाकांक्षी योजना होती.

पण दुर्दैवाने फितुरी झाली. पोर्तुगीजांच्या गुप्तहेरांना या योजनेचा सुगावा लागला. गोव्यात वेषांतर करून घुसलेल्या सर्व मराठा सैन्याला पकडण्यात आले. त्यावेळी भडकलेल्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने मराठ्यांच्या वकिलाचा भर दरबारात अपमान केला.

हे सर्व घडलं तेव्हा महाराज वेंगुर्ल्याच्या इथे गोव्यावर हल्ला करण्याच्या प्रतीक्षेत होते. पण सगळा कट उधळला गेला. महाराज निराश झाले, ते डिचोली येथे परत आले.

डिचोली येथे असताना जवळच नार्वे गावात सप्‍तकोटीश्‍वराचे मंदिर असल्‍याचे त्‍यांना समजले. ते ताबडतोब देवदर्शनासाठी आले. त्‍यांनी पाहिले की, एका मोठ्या कोनाड्यात श्रीसप्‍तकोटीश्‍वराचे शिवलिंग स्‍थापन करून जवळच दगडी पणती तेवत ठेवली होती.

नारळाच्‍या वाळलेल्‍या झावळ्यांचा सभामंडप तयार केला होता. समोर आवार मोकळ होत.

या चंद्रमौळी शिवालयासमोर शिवाजी महाराज आपल्‍या अधिका-यांबरोबर उभे होते. मंदिराची दुरावस्‍था पाहून महाराजांनी त्‍याचा जीर्णोद्धार करण्‍याची ठरविले. महाराजांनी मंदिराच्‍या पूजा-यांना सांगितले की,

‘आता इथे आपले राज्‍य आले. यापुढे श्रीसप्‍तकोटीश्‍वर असा उन्‍हापावसात राहणार नाही.

शिवाजी महाराजांनी आपले ११००० घोडदळ डिचोलीहून नार्वे येथे आणविले आणि तेथे आपली लष्‍करी छावणी उभारली. श्रीसप्‍तकोटीश्‍वर महादेवाच्‍या शिवालयाच्‍या जीर्णोद्धाराला सुरूवात झाली.

गोव्याला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सफल झाला नसला तरी श्रीसप्‍तकोटीश्‍वराच्‍या मंदिराचे बांधकाम मात्र ठरल्‍याप्रमाणे सुरू होते. 

शके १५९० कार्तिक वद्य पंचमी, शुक्रवारी म्‍हणजे दिनांक १३ नोव्‍हेंबर १६६८ रोजी, सुमुहूर्तावर महाराजांनी श्रीं च्‍या मंदिराच्‍या बांधकामाला सुरूवात केली.

या शुभकार्यासंबंधीचा शिलालेख मंदिराच्‍या महाद्वारावर लावण्‍यात आलेला आहे.

पोर्तुगीजांना आपल्या शक्तीची जाणीव कायम राहावी म्हणून महाराजांनी गोव्यात त्यांच्या छाताडावर या मंदिराची निर्मिती केली.

स्वराज्याच्या धामधुमीमुळे शिवरायांना परत राजगडावर परतावे लागले. जर त्यावेळची छ. शिवरायांची महत्वाकांक्षी योजना सफल झाली असती तर फक्त गोव्याचा नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास वेगळा असता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.