शिवाजी महाराज आग्र्यामधून निसटल्यानंतर औरंगजेब नमाज पढायला देखील घाबरू लागला होता

शिवाजी महाराजांना जादू येत होती, हे नक्की. औरंगजेबाचा भर दरबारात अपमान केल्यावर ‘बेमुवर्तखोर वर्तन करणाऱ्या शिवाला मारा’ अशी तुतारी सतत औरंगजेबाच्या कानात वाजवणारे बेगम जहानआरा, जाफरखान, मुहम्मद अमीन खान पुढच्या 20-22 दिवसांमध्येच महाराजांचे गोडवे गाऊ लागले होते.

एकदा का दरबारात बादशाहने प्रवेश केला, तो गादीवर बसला की समोर उभ्या असणाऱ्या सरदारांनी आपापल्या नजरा जमिनीकडे वळवायच्या. उभे आहात त्या जागेवर हालचाल करण्याचीही परवानगी नव्हती. दरबारातून निघून जाणे, ही तर दूरची गोष्ट.

बादशहाला ‘सजदा’ करावा लागत असे.

त्याची ‘चाहर तस्लिम’ आणि ‘जमीनबोसी’ (जमिनीचे चुंबन घेणे) करावी लागत असे. काही बोलायचे असल्यास बादशहाची परवानगी घ्यायची, तोंडासमोर रुमाल धरून एकदम हळू आवाजात बोलायचे. छोटीशी चूक झाली, दरबाराचे रीतीरिवाज पाळले गेले नाहीत तर त्याची नोंद घेण्यास माणसे ठेवलेली असत. जागेवर शिक्षा घडत असे.

अशा या मुघलांच्या दरबारात, खुद्द बादशहाच्या 50 व्या वाढदिवसाला ‘मै पातशाहकी हजुरी नहीं चलता’ अशी गर्जना करत औरंगजेबाला पाठ दाखवून मराठ्यांचा सिंह दरबारातून बाहेर पडला होता. 

हा केवळ औरंगजेबाचा अपमान नव्हता, तर काबूलपासून बंगालपावेतो आणि काश्मीर ते दख्खनपर्यंत पसरलेल्या अवाढव्य मुघल साम्राज्याला दिलेला जबरदस्त तडाखा होता. या एका गर्जनेने पुढच्या 50 वर्षांतच मराठे दिल्लीवर अधिपत्य गाजवू लागले. या मातीत एकच शिवछत्रपती जन्मला.. पण भारताचा इतिहास बदलला!

रामकृष्ण ब्राम्हण, जीवा जोशी, श्रीकृष्ण उपाध्याय, बलराम पुरोहित यांसारख्या सरदारांचे पहारे, त्याबाहेर बंदूकचिंचे पहारे, त्याबाहेर फौलादखानच्या हाताखाली असणारी शाही तुकडी आणि फिरते गस्त पथक.. 

या हजार-दीड हजारांच्या लवाजम्याला अक्षरशः येड्यात काढत शिवराय आग्र्याच्या कैदेतून निसटले, ती तारीख होती ’17 ऑगस्ट 1666′..

“सवाराही सेवोजी अठास्यो भागो” या एका वाक्याने मुघल साम्राज मुळापासून उखडायला सुरुवात झाली. शिवाजी महाराज 10-15 फूट उंच उडी मारू शकतात, ते गायब होऊन कुठेही प्रकट होऊ शकतात अशी चर्चा साऱ्या आग्रा शहरात होत होती. याचा शिकार झाला खुद्द औरंगजेब. मशिदीत नमाज पडायला जाताना अभूतपूर्व असे सैन्य घेऊन तो निघत असे. मशिदीच्या प्रत्येक पायरीवर एक एक सैनिक संरक्षणासाठी उभा करी.

महाराज निसटून गेल्यानंतर, 18 तारखेच्या रात्री खुद्द औरंगजेब एवढा प्रचंड दहशतीखाली होता, की त्याला झोप आली नाहीच, उलट त्याने स्वतःच्या शयनकक्षात आणि बाहेर सुद्धा ‘चिलखतधारी सशस्त्र अंगरक्षक’ पहाऱ्यासाठी उभे केले.

स्वतःच्याच राजधानीत, आपल्या अतिशय कडव्या शिपायांच्या नजरकैदेत 99 दिवस ठेवलेल्या एका माणसाने बादशहाला सुखासुखी नमाजसुद्धा पडू दिला नाही.. ‘शिवाजी’ या नावातच प्रचंड दहशत.

महाराजांच्या पलायन वार्तेचे पडसाद साऱ्या भारतभर उमटत राहीले. आसामचा वीर योद्धा लचित बरफुकन आणि कूचबिहारच्या राजामध्ये जो पत्रव्यवहार झाला, त्यामध्ये “औरंगजेबाच्या कैदेतून जिवंत निसटून जाणारे शिवाजी महाराज हे महानायक झाले आहेत” असे गौरवोद्गार वाचायला मिळतात. त्यांच्याच महान प्रेरणेने आहोम सैन्याला रामसिंगाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली.

मुत्सद्दी, राजकारणी म्हणून औरंगजेब नेहमी महाराजांसमोर थिटा राहीला. दक्षिणेची राजकारणे त्याच्या अनिश्चित धोरणांमुळे नासली. लष्करी डावपेचांमध्येही महाराजांनी त्याच्यावर मात केली. अखेरीस, याच दख्खनेत वणवण फिरत त्याने आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत केला. “नशिबाने कधीही त्याला साथ दिली नाही”..

मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या तिघांचा पुनर्जन्म झालेली ऐतिहासिक घटना.. आग्र्याहून सुटका.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.