नेते पैसे खाऊन तळ्याच नामांतर रोखत होते. अत्रेंनी अख्ख्या भागाचं नाव शिवाजीनगर केलं

पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं शिवाजीनगर म्हणजे सगळ्यात गजबलेला भाग. जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोडचा झगमगाट, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन बस स्टॅन्डवर गोर गरिबांचा राबता, शिमला ऑफिस जवळ असलेली कायमची गर्दी ! महानगरपालिका, ऍग्री कॉलेज, पोलीस ग्राऊंड, आकाशवाणी, कोर्ट, संचेती हॉस्पिटल, सीओईपी सारख्या महत्वाच्या वास्तू आसपास असलेल हे पुण्याचं हृदय स्थान म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.   

हजारो वर्षे पूर्वीचे पाताळेश्वर मंदिर देखील इथेच आहे आणि नव्यानेच उभे राहत असलेले मेट्रो स्टेशन देखील. जुन्या इराणी कॅफे पासून ते नव्या स्टारबक्स, सोशल पर्यंत सगळे इथं आहे.

नव्या जुन्याच संगम असलेल्या शिवाजीनगरचा इतिहास मात्र पुरातन आहे.

८ व्या शतकात पाताळेश्वर लेणी उभारल्या गेल्या. याचाच अर्थ तेव्हापासून या भागात वस्ती आहे असं मानलं जातं. मराठेशाहीत या गावाचं नाव भांबवडे असं होतं. मुठा नदीपलीकडे पुणे आणि अलीकडे हे भांबवडे.

आजच्या जंगली महाराज रोडवर त्याकाळी निबिड जंगल होते. पाताळेश्वर मंदिरात येणाऱ्या साधू व बैराग्यांचा इथे वावर असायचा.

तुरळक चिकू पेरू व सीताफळाच्या बागा होत्या. भांबवडे गावात फक्त पन्नास घरे होती.

छ. शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालात लपलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला केला तेव्हा त्यांच्या मावळ्यांचे घोडे इथल्या रोकडोबा मंदिरासमोर बांधून ठेवले होते. मुघलांवर चालून आलेल्या मराठ्यांचा गोपनीय तळ भांबावडे गावात उभा होता.

तेव्हा या गावातील शिरोळे घराण्याने महाराजांच्या सैन्याची चोख व्यवस्था राखली. शाहिस्तेखानाच्या मोहिमेत सहभाग घेतला. पावन खिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांच्याबरोबर प्राणाची आहुती देणाऱ्यांमध्ये शिरोळेदेखील होते.

या पराक्रमामुळे खुश होऊन शिवरायांनी भांबवडे गावची पाटीलकी शिरोळे कुटुंबाला दिली होती.

या घराण्यातील वीर पुरुषांनी पानिपतच्या लढाईमध्ये देखील आपली तलवार गाजवली. या लढाईत भांबावडे गावचे ७ जण कामी आले. माधवराव पेशव्यानी त्यांच्या त्यागाची जण ठेवून शिरोळेंना पिंपळे गुरव येथील जमीन इनाम दिले.

पेशवाई मध्ये इथली वस्ती वाढली. या भागातला गुरांचा बाजार तेव्हा सर्वदूर प्रसिद्ध होता. सध्याची मनपा इमारत आणि परिसरात पूर्वी बुधवार आणि रविवारी, गुरांचा बाजार भरे. गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढय़ा अशी विपुल जनावरे येथे आणली जात. या व्यवसायाला पूरक म्हणून गवत, चारा, पशुखाद्य, लाकूडफाटा याची साठवण याच परिसरात होत असे. गवताच्या वीस, पंचवीस फूट उंचीच्या गंजीचे ढीग, सध्याचे काँग्रेस भवन, बालगंधर्व या परिसरात त्या काळी होते.

पुढे इंग्रजांच्या काळात इथे अनेक इमारती उभ्या राहिल्या.

मुंबई पुणे महामार्ग उभारताना या रमणीय गावाचं महत्व त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनीच या भागात इंजिनियरिंग कॉलेज उभे केले. पेशव्याच्या काळात मुळा मुठा संगमावर मॅलेटचा बंगला उभारला होताच. पण पुढे जाऊन गणेशखिंड जवळ इंग्रज गव्हर्नरचा बंगला उभा केला ज्याच रूपांतर नंतर पुणे विद्यापीठात करण्यात आले.

इंग्रजांना भांबवडे म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी या गावाचा अपभ्रन्श भांबुर्डा असे केले.

त्यांनीच १८३५ साली कुंभारवेस बंधाऱ्याची दुरुस्ती केली. लॉर्ड वेलस्लीसारखे  नवे पूल उभारले. या पुलांमुळे पुणे भांबुर्डे एकमेकांशी जोडले गेले. १८६८ साली मुंबई पुणे रेल्वे सुरु झाली. काही वर्षांनी भांबुर्डे येथे देखील स्टेशन उभारण्यात आले.

इंग्रजांमुळे या भागातील पुणेकरांचाही वावर वाढला. टिळक, आगरकर, गोखले या शिक्षणप्रेमी सुधारणावाद्यांनी या भागात नव्या शिक्षण संस्था सुरू केल्या.

त्यांच्या वाढीसाठी, भरपूर जागेची आवश्यकता असताना शिरोळे पाटीलांनी नाममात्र भाडे तत्त्वावर १८८५ साली मोठी जमीन उपलब्ध करून दिली. याच जागी आज आपण पाहतो ते फर्ग्युसन महाविद्यालय उभे राहिले. १९०५ मध्ये सव्‍‌र्हण्ट्स ऑफ इंडियाची इमारत उभी राहिली. या संस्थांच्या निमित्ताने नव्या वाटा पडून एक मोठा रस्ता उभा राहिला. याचेच नाव जंगली महाराज रस्ता असे झाले.

भांबुर्ड्याची वस्ती देखील पर्यायाने वाढली. लकडी पूल ते फर्ग्युसन महाविद्यालय या भागात डेक्कन जिमखाना नावाची उच्च्भ्रू मंडळींची ऐटबाज वसाहत उभी राहिली. प्रशस्त असा लॉईड ब्रिज उभारला गेला.

आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले तेव्हा त्यांनी या भागात अनेक कामे केली. त्यांचे पुण्याच्या मातीवर प्रचंड प्रेम होते. या गावाला दख्खनची राणी बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच गावाला सुशोभित करण्याचा पन त्यांनी उचलला.

१९२८ साली शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा या भागात उभा राहिला होता. पण शिवरायांच्या इतिहासाचे जतन पुण्यात होताना दिसत नव्हते. अत्रेंना या गोष्टीचे प्रचंड वैषम्य वाटायचे.

स्थायी समितीचे अध्यक्ष झाल्यावर आचार्य अत्रेंनी सर्वप्रथम भांबुर्डा या गावाचे नामांतर करून शिवाजीनगर असे केले.

यामागे एक प्रसंग सांगितला जातो. आचार्य अत्रे तेव्हा काँग्रेस पक्षात होते. पुण्याच्या नगरपालिकेत पूर्वी हिंदू महासभेचे वर्चस्व होते. काँग्रेस तेव्हा अल्पमतात होती. नगरपालिकेसमोरच एक सुंदर तलाव होता. या तलावाचे नामांतर शिवाजी तलाव करावे या विषयावर काँग्रेसने वाचा फोडली. अत्रेंनी जोरदार प्रचार केला व काँग्रेसची सत्ता नगरपालिकेत आली.

अत्रेंच्या मुळे काँग्रेसचे ३५ नगरसेवक निवडून आले. सत्ता आल्यावर अत्रेंनी नामकरणाचा विषय लावून धरला.

पण दुर्दैवाने करपे यांनी  काँग्रेसला पाच हजाराची देणगी दिली. काकासाहेब गाडगीळ व शंकरराव देव हे काँग्रेसश्रेष्ठी करपे तलावाचे नाव शिवाजी तलाव करण्याच्या विरोधात गेले. आचार्य अत्रे मात्र बधले नाहीत. त्यांनी ठराव मांडला, यावरून काँग्रेस फुटली. करपे तलावाचे नामकरण बारगळले. आचार्य अत्रेंच्या मनाला ही गोष्ट प्रचंड लागली.

याच भागात त्यांनी अनेक विकासकामे केली. आपल्या हाताने खड्डे काढून झाडे लावली व संभाजी पार्कची निर्मिती केली. आज आपण महानगरपालिकेजवळ पीएमटी बस स्टॅन्ड पाहतो तिथे करपे तलाव होता आणि त्याच्या शेजारी हा शिवाजी पार्क होता जो पानशेतच्या पुरात वाहून गेला. त्याची निर्मिती देखील अत्रेंनी केली होती. याच्या जवळच शिवाजी आखाडा निर्माण करून पुण्याच्या कुस्तीशौकीनाना पर्वणी उपलब्ध करून दिली.

 

आचार्य अत्रेंनी शिवाजीनगर भागात विकासाचा धडाका लावून दिलाच शिवाय  शिवरायांच्या इतिहासाची आठवण पुण्याला कायमची लक्षात राहावी याची व्यवस्था केली.

पुढे जंगली महाराज रोडचे डांबरीकरण झाले तेव्हा ते पाहायला अख्ख पुणे शिवाजीनगरला गोळा झाले होते. आजही पुण्यातला सर्वात आलिशान रस्ता म्हणून जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन महाविद्यालय रोडला ओळखले जाते.

आता तर इथे मेट्रो येत आहे. आधुनिकतेच्या सगळ्या खुणा अंगावर घेऊन शिवाजीनगर उभे आहे. पुण्याचा दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपनगराला उभे करण्यात शिरोळे पाटलांच्या पासून ते आचार्य अत्रेंच्या पर्यंत अनेकांचा सहभाग आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. मुरलीधर पाटील says

    इंग्रज हुशार होते समाज आणि धर्म दोन्ही वेगले विषय असल्यामुळे त्यांनी विकास काम पाहून मनसे काम केले होते नंतर राजकीय लोकांनी आपली संस्कृती मुळे खाते वाटप आणि कामं आपापसात वाटून घेतले समाज् मात्र सुधारला नाही कारण समाज कल्याण खाते कधीच योग्य माणसाला दिले नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.