एकवचनी कर्णाला न्याय देण्याचं काम शिवाजी सावंतांनी केलं

कर्ण, राजकारण हा तुझा विष‍यच नव्हे! राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं तोडीत बसेल! पण… पण माझ्यासारखा एका ठिणगीतच त्याची वासलात लावील !

शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयामधली अशी भेदक वाक्य अंगावर शहारे आणि मनात काहूर माजवतात.

भारताच्या साहित्यविश्वात एकदम डिटेलमध्ये महाभारतातला कर्ण मांडण्याचं श्रेय जातं ते म्हणजे मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या लेखणीला.

पण या महाकादंबरीची निर्मिती कशी झाली आणि शिवाजी सावंत यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं याबद्दल आपण जाणून घेऊया.

शिवाजी सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० रोजी कोल्हापूरच्या आजरा मधला. शेतकरी कुटुंब असल्याने सगळे सण उत्सव जोमात साजरे व्हायचे. आईच्या तोंडून पूर्ण कथांचे संदर्भ ऐकायला मिळायचे. शिवाजी सावंतांच्या मनात तेव्हाच या गोष्टींबद्दल कुतूहल जागं झालं होतं. पुढे शाळेत या कुतूहलाच वेडात रूपांतर झालं.

शाळेत कर्णावर नाटक होतं. लोकांच्या टाळ्या श्रीकृष्णाच्या वाक्यांवर पडत होत्या पण शिवाजी सावंत यांचं बालमन कर्णाच्या वाक्यांनी व्यथित होतं होतं, हीच काय ती बीजरोवणी झाली त्यांच्या मनात. इथून त्यांना कर्णाबद्दल जवळीक वाटू लागली.

१९५८ साली शिवाजी सावंतांनी मॅट्रिकची परीक्षा दिली व प्रथम वर्गात ते उत्तीर्ण झाले. कोल्हापुरातून १९६० साली टंकलेखन व शॉर्टहॅण्डचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. त्यामुळे त्यांना लगेचच कोल्हापूरच्या वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी मिळाली.

कोर्ट कचेरीच्या कामात त्यांचं मन रमेना कारण त्यांना कर्ण खुणावत होता. त्यांनी न्यायालयाची नोकरी सोडली आणि शिक्षक म्हणून काम सुरु केलं. १९६२ साली राजाराम हायस्कुलमध्ये ते नोकरी करू लागले आणि याच काळात त्यांनी कर्णाविषयी जितकं काही मिळेल ते वाचायला सुरुवात केली. कर्ण, महाभारत आणि त्यांचे संदर्भग्रंथ अश्या प्रकारचं तगडं वाचन त्यांनी केलं.

हिंदीतील प्रख्यात कवी प्रभात ऊर्फ केदारनाथ मिश्र यांनी लिहिलेलं कर्ण हे खंडकाव्य शिवाजी सावंतांच्या हाती पडलं आणि त्यांच्या डोक्यात कर्णाबद्दल लिहिण्याचं मत तयार झालं. १९६३ मध्ये शिवाजीरावांनी प्रदीर्घ चिंतन, मनन, वाचन केल्यानंतर मृत्युंजय ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. त्यावेळी ते कोल्हापुरात पोलीस क्वार्टर्समध्ये थोरले बंधू विश्वासराव यांच्यासोबत चाळीत राहत होते. ते काय लिहीत होते हे त्यांच्या भावाखेरीज कुणालाच माहीत नव्हतं.

एके दिवशी शिवाजी सावंतांनी त्यांचे सहशिक्षक आर.के.कुलकर्णी यांना आपली संकल्पना आणि त्याबद्दल लिहलेलं लिखाण वाचून दाखवलं. हे लिखाण वाचून दाखवत असताना आर.के.कुलकर्णी पुन्हा पुन्हा सावंतांना वाचायला लावत होते. कारण त्यातले प्रत्येक संवाद हे कमालीच्या ताकदीचे होते. आर.के. कुलकर्णी यांनी हस्तिनापुरात जाऊन प्रत्यक्ष तिथली तेव्हाची वर्णन कशी असेल याचा आढावा घेण्यासाठी त्यांना उत्तर भारतात जाण्याचा सल्ला दिला.

आता तिकडं जायचं म्हणल्यावर पैशाची गरज होती. तेव्हा शिवाजी सावंतांना तुटपुंजा पगार होता. बरीच जमाजमव केली तरी पुरेशी रक्कम जमा झाली नाही तेव्हा दिग्दर्शक भालजी पेंढारकरांनी भक्कम रकमेचा चेक शिवाजी सावंतांना देऊ केला. तिथे जाऊन दोन महिने शिवाजी सावंत अभ्यास करत होते. अनेक भेटीगाठी झाल्या आणि कर्ण साकारला गेला.

१९६७ साली गणेशोत्सवात शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय प्रकाशित झाली. या कादंबरीने अनेक रेकॉर्ड मोडले. अनेक भाषेत तिचे अनुवादही झाले. पहिल्यांदाच इतक्या सखोलपणे कर्ण मांडला म्हणून शिवाजी सावंतांचं बरंच कौतुक झालं. हे वादळ आजही मराठी आणि भारतीय साहित्यविश्वात रोरावत आहे. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय व्यतिरिक्त छावा, युगंधर, कवडसे नावाच्या दर्जेदार कादंबऱ्या लिहिल्या.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.