आपल्या व्याख्यानातून १-१ रुपया गोळा करून विवेकानंदांच्या स्मारकाला ७० लाख जमा केले….
महाराष्ट्राला लाभलेल्या फर्ड्या वक्त्यांपैकी एक नाव म्हणजे
प्राचार्य शिवाजीराव भोसले.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, मराठी संत, भारतीय समाजसुधारक, साहित्य अशा विषयांवर व्याख्यानं देण्यात त्यांचा हातखंडा होता. वक्तृत्वाबरोबरच लेखक आणि विचारवंत म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील कलेढोण या गावी १५ जुलै १९२७ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील अनंतराव हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई अनुसयाबाई या गृहिणी होत्या. वडिलांकडून शिवाजीरावांना वक्तृत्वाची देणगी लाभली होती. मुलांना जास्तीत जास्त शिकवणे यावर शिवाजीरावांचे वडील अनंतराव यांचा भर होता. अनंतररावांनी त्यांच्या पाचही मुलांना उच्चशिक्षण दिले.
शिवाजीरावांनी कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेण्यास सुरवात केली. आयएलएस कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. साताऱ्यात त्यांनी बराच काळ वकीलीसुद्धा केली. फलटण मधल्या मुधोजी महाविद्यालयात ते रुजू झाले तिथे तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून ते तब्बल २५ वर्ष राहिले. या २५ वर्षाच्या काळात त्यांनी साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली.
शिवाजीरावांचे मोठे बंधू बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे काही काळ मुख्यमंत्री होते. १९८८ ते १९९१ दरम्यान औरंगाबादमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते कुलगुरू पदावर राहिले. विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय प्राध्यापक असा त्यांचा गौरव केला जात असे.
फलटण मधल्या कॉलेजात ते नोकरीला असताना त्यांनी कामात व्यत्यय न आणता आपल्या वक्तृत्वाने महाराष्ट्रभर जनजागृती केली. आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी वसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी व्याख्यानमाला, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला अशा सगळ्या ठिकाणी हजेरी लावली आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.
कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद शीला स्मारक समितीच्या वतीने भारतभर त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते. अत्यंत विनोदी आणि खुमासदार शैलीतील व्याख्यानांसाठी लोकं तासन्तास प्रवेशिका मिळवण्यासाठी रांगेत उभे राहत असे. अध्यात्म ते विज्ञान, राजकारण ते साहित्य या क्षेत्रांमधल्या सगळ्या नावाजलेल्या व्यक्तींवर त्यांनी व्याख्यानं दिली. तीस वर्षांपर्यंत त्यांनी हि व्याख्यानमाला चालवली.
स्वामी विवेकानंद जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी जी व्याख्यानं दिली त्या ठिकाणी त्यांनी १ व्याख्याता १ रुपया प्रमाणे ७० ते ८० लाख रुपये गोळा करून कन्याकुमारीच्या शीला स्मारकासाठी पाठवले होते.
महाराष्ट्रभर व्याख्यानं देत असतानाच शिवाजीरावांनी दीपस्तंभ, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न अशी दर्जेदार साहित्य निर्मिती केली.
तत्त्वज्ञान ही केवळ बौद्धिक चळवळ नाही किंवा चर्चेचा विषय नाही; तर प्रत्यक्ष जीवन जगताना अडीअडचणींवर मात करण्याचा व जीवनाला-आयुष्याला एक अर्थपूर्ण आयाम देणारा विषय आहे, अशी त्यांची भूमिका होती. प्रत्येक व्याख्यानांमध्ये ते त्यांचं तत्वज्ञान सांगत असे.
शिवाजीरावांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील मराठी साहित्य संमेलन आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या द्वैवार्षिक स्नेहसंमेलनासाठी अनुक्रमे १९९१ व १९९५ साली दोन वेळा अमेरिकेला भेटी दिल्या. त्या वेळी न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, लॉस अँजेल्स, न्यूयॉर्क येथे त्यांनी व्याख्याने झाली. स्वामी समर्थांच्या पादुका नेणाऱ्या समितीसोबत ते १९९८ ला सिंगापूरला गेले. त्या निमित्ताने त्यांनी रामदासांवर तिथेही व्याख्यान दिले.
भारतीय संतांनी ज्याप्रमाणे आपल्या आचार-विचार आणि उपदेश-उच्चार यांत एकवाक्यता ठेवली, त्याप्रमाणेच शिवाजीरावांनी आपल्या जीवनात आणि सामाजिक व्यवहारात तसेच लेखन आणि भाषण यांत ठेवली.
पंढरपूरला वारीतून जाताना वारकर्याने शरीराची काळजी म्हणून विज्ञानाचा आधार घ्यावा, तर मनाच्या पोषणासाठी विठ्ठलाचे स्मरण करावे. दोन्हींची माणसाला गरज आहे, असे ते सांगत.
प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना अनेक पुरस्कार मिळाले. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, सातारा भूषण, फलटण भूषण, जीवनसाधना गौरव पुरस्कार असे प्रतिष्ठित पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाले. पुण्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती दरवर्षी १५ जुलै रोजी त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार प्रदान करते.
२९ जून २०१० रोजी शिवाजीराव भोसलेंचं निधन झालं. महाराष्ट्रात अत्युच्च आणि मानाच्या लोकांमध्ये शिवाजीरावांचं नाव अगत्याने घेतलं जात.
हे हि वाच भिडू :
- पंजाबातील हिंदू शिखांमध्ये चाललेली आंदोलने सरसंघचालकांनी पंजाबात जाऊन शमवली होती
- वेळप्रसंगी बहुजन समाजासाठी मोठ्या नेत्यांशी लढण्याची परंपरा हा माने घराण्याचा इतिहास आहे.
- निवडणूक लढायला निधी नाही म्हणून गडकरींनी एकदा थेट डिझेल चोरून आणलं होतं..
- आजवर नेहरू मोदींसारखे नेते टाईम मासिकावर झळकले होते, आता या शेतकरी महिला चमकत आहेत.