समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांना जवळ करुन डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी तपोवन उभारलं

कोरोना काळात कोरोना झालेल्या रुग्णांना उपचारासाठी काही कालावधी साठी वेगळे ठेवायला लागले आणि माणसाला समाजात, कुटुंबात राहण्याची किंमत समजली. पण कोरोना येण्यापुर्वी आणखी एक आजार अस्तित्वात आहे जो झाला तर कायमचचं वेगळे उपचार दिले जातात.

असा आजार म्हणजे कुष्ठरोग.

एकदा झाला तर फक्त घर, कुटुंब नाही, तर समाज त्यांना नाकारतो. वाळीत टाकतो. गावकुसाबाहेर आयुष्य काढावे लागते. जखमांनी भरलेले अंग, त्यातुन येणारी दुर्गंधी, हात – पायाची झडलेली बोट… सर्व सामन्यांच्या डोळ्यांना दृश्य पाहवत ही नाही.

पण याच घृणा, तिरस्कार, भिती असलेल्या रुग्णांना मायेने जवळ घेवून त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याची जिद्द निर्माण करण्याचे कार्य मागील ७४ वर्षापासून अमरावतीच्या तपोवन संस्थेनेमध्ये चालू आहे. कुष्ठरोग्यांसाठी हे आपुलकीचे घर आहे.

जेष्ठ समाजसेवक आणि स्वातंत्र्यसैनिक कै. डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी हे भव्य कार्य उभारले आहे. भारतात ज्या काही समाजसेवकांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले अशांमध्ये त्यांचे नाव कायमच अग्रभागी घ्यावे लागेल. त्यांच्या या कार्याला बोल भिडूने थोडक्यात शब्दबद्ध केले आहे.

डॉ. पटवर्धन मुळचे कर्नाटक जिल्ह्यातील जमखंडी या संस्थानातील आसंगी या छोट्याश्या गावाचे. त्यांचा जन्म ही तिथलाच. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपल्यामुळे मोठी बहीण बहीणाक्का जोशी यांनी त्यांचे संगोपन केले. हुशार व तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या शिवाजीरावांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यात झाले.

शालेय जीवनात टिळकांच्या भाषणांनी त्यांच्यावर संस्कार केले. पुढे कलकत्यावरुन त्यांनी वैद्यकशास्त्रातील पदवी मिळवली. कलकत्यात असताना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले होते. विवेकानंदांच्या विचारांचे प्रतिक म्हणुन त्यांनी भगवा फेटा बांधायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत तो फेटा त्यांच्या डोक्यावर होता. काही काळ अलहाबादच्या रामकृष्ण मिशनमध्ये त्यांनी सेवा दिली.

नंतरच्या काळात वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने ते अमरावतीला आले आणि याच परिसरात त्यांचे कार्य उभे राहिले. दादासाहेब खापर्डे यांच्या मध्यस्तीने थिऑसाफिस्ट अप्पासाहेब मराठे यांच्या कन्या पार्वतीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि अमरावतीवासीयांसाठी ते दाजीसाहेब झाले.

शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचे जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंड होते. १९१८ साली अमरावती शहरात प्लेगने थैमान घातले, आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेचा श्रीगणेशा झाला. या काळात या दांपत्याने कोणतेही शुल्क न आकारता, औषधाचाही खर्च न घेता घरोघरी फिरून रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. या कार्यामुळे ते संपुर्ण लोकप्रिय झाले.

स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यात सहभागी…

तो काळ टिळक युगाच्या समाप्तीचा आणि गांधी युगाच्या उदयाचा होता. गांधी विचाराने भारावून जात ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते केवळ सक्रीय झाले. दारुच्या मक्त्याला जाहिर विरोध, परदेशी कपड्यांवर बहिष्कार अशा कार्याने त्यांनी आपला ठसा उमटवला. १९२१ साली महात्मा गांधी अमरावतीला आले असताना डॉ. पटवर्धनांकडेच थांबले होते. यावेळी गांधीजींनी दिलेल्या हिंदी भाषणाचे पार्वतीबाईंनी ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केले होते.

देशबंधू चित्तरंजनदास, वीर वामनराव जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचा विषेश स्नेह. सुभाषचंद्र बोस ज्यावेळी गुप्तवेशात बर्लीनला निघाले, त्या अगोदर नेताजींनी पटवर्धनांना स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र पाठवून स्वतःसोबत चालण्याचे आमंत्रण दिले होते. हे पत्र पटवर्धनांना खुप उशिरा मिळाले.

१९३० ते १९४७ या काळात स्वातंत्र आंदोलनात सहभाग नोंदवल्याबद्दल डॉ शिवाजीराव पटवर्धन आणि पार्वतीबाई यांना वेळोवेळी अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवले गेले. पटवर्धन दांपत्त तुरुंगवासात असताना त्यांची मुलगी गंभीर आजारी पडली, पटवर्धनांना ब्रिटिशांनी अट घातली की ‘सत्याग्रहात भाग घेणार नाही असे लिहून द्या, तुम्हाला सोडण्यात येईल.’ पण दाजीसाहेबांनी ठणकावून सांगितले की ‘देशापेक्षा माझी मुलगी मोठी नाही.’ पुढच्या काही दिवसात मुलीचे निधन झाले.

अशी झाली कुष्ठरोगाच्या रुग्णाच्या सेवेची सुरुवात…

याच तुरुंगवासात असताना त्यांचे लक्ष कुष्ठरोग झालेल्या एका कैद्याकडे गेले. पुढे होवुन कोणीही शिवण्याचे धाडस करत नव्हते. अन्न – पाणी देखील लांबुनच दिले जाई. त्याच्या वेदना पाहून डॉ. पटवर्धन कळवळले, त्यांनी त्या क्षणापासून त्या रोग्याची सेवा करायला सुरुवात केली.

पुढे एकदा शहरातील जवाहर गेट जवळ एक कुष्ठरोगी त्यांना रस्त्यावर बसून भीक मागत असलेला आढळून आला. अंगावर जखमा, हातापायांची बोटे झडलेली, विद्रुप चेहरा अशा अवतारात तो भीक मागत होता. त्याच दिवशी त्यांना असे कळले की त्या भिकार्‍याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

विहिरीतून वास येऊ लागला, पण मृतदेह बाहेर काढण्यास कुणीही तयार नव्हते. लोकांनी मागणी करून ती विहीर नगरपालिकेला बुजवायला लावली. याचा शिवाजीरावांच्या मनावर खोल परिणाम होऊन त्यांनी उर्वरित आयुष्यात कुष्ठसेवा हेच आपले ध्येय ठरविले.

नंतरच्या काळात डॉ. भोजराज यांच्यासोबत दौऱ्यावर असताना रस्त्यात बेवारस मरुन पडलेल्या कुष्ठरोग्याचे हाल त्यांनी पाहिले. कुत्रे त्याच्या प्रेताचे लचके तोडत होते आणि लोक निर्विकारपणे त्याकडे पहात होते.

या सगळ्या घटनांचा डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी कुष्ठ निर्मुलनाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

शिवनी जबलपूर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, दाजी साहेबांनी महात्मा गांधीची भेट घेतली. असता गांधीजी म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य निश्चित आहे. पण देशाला भूक, निवारण, स्वयंरोजगार, कुष्ठरोग निर्मुलन अशा भीषण समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. गांधीजींशी बोलल्यानंतर दाजीसाहेबांच्या कार्याची दिशा पक्की झाली. 

पण सर्वात मोठा प्रश्‍न होता तो म्हणजे कुष्ठधाम उभारण्यासाठी आवश्यक जागेचा. अमरावती शहराच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात झाली. शहराच्या पूर्वेला ५ कि.मी.वर मोकळी व पडीक जमीन त्यांच्या नजरेस पडली. जुगल किशोर जयस्वाल हे या जमिनीचे मालक होते.

शिवाजीरावांनी जयस्वाल यांच्या मुलाला एका दुर्धर आजारातून औषधोपचार करून वाचविले असल्यामुळे दानशूर जुगल किशोर यांनी आपली ८० एकर पडीक जमीन कुष्ठधामासाठी दिली. दाजीसाहेबांच्या जागेची नड लक्षात घेता प्रेमलवार व लाला शामलाल यांनीही आपली जमीन दाजीसाहेबांना देणगी म्हणून दिली.

तपोवनचा मुहूर्त… आणि स्थापना.

२६ सप्टेंबर १९४६ रोजी या घटस्थापनेच्या दिवशी ‘श्री जगदंबा कुष्ठनिवास, तपोवन’ या संस्थेची आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. त्यादिवशी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ‘तपोवन’मध्ये भजन झाले. पहाता पहाता पटवर्धनांचे कार्य आणि पसारा वाढत गेला. (आज अमरावती विद्यापीठाच्या समोरील भागात हा परिसर आहे)

१ जुलै १९५० रोजी संस्थेचे रीतसर उद्घाटन होऊन ती ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळ’ या नावाने पुढे नावारूपास आली.

गाडगेबाबांनी १९५४ साली ‘तपोवन’मध्ये येऊन साफसफाई केली. राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यापासून अनेकांचे पाय या भुमीला सतत लागत राहिले.

डॉ. पटवर्धन केवळ उपचार करुन बरे करत होतै असे नाही तर रोगमुक्त झाल्यावर सर्वच रुग्ण घरी जाऊन राहणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या पुनर्वसनाचा विचार करुन त्यांनी बरे झालेल्या रोग्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावयास सुरुवात केली.

त्यासाठी श्रम प्रतिष्ठानची निर्मिती करुन श्रमाची भाकरी दिली. हातमाग, सुतारकाम, लोहारकाम, मुद्रणकला, सतरंजी विभाग, शिवणकला, चर्मकला असे सात विभाग ‘तपोवनात’ सुरु केले. ते आजही अस्तित्वात आहेत. स्वावलंबी जीवनाचा आदर्श परिपाठ म्हणुन या विभागांकडे पाहले जाते.

डॉ. पटवर्धन यांचे काम आणि सेवाभावी वृत्तीशी डॉ. राजेंद्रप्रसाद परिचयाचे होते. त्यामुळे या कामाचा सन्मान म्हणून १९५९ साली आग्रह करुन पटवर्धन यांना पद्मश्री हा सन्मान स्विकारायला लावला.

वय झाल्यानंतर वयोवृद्ध शिवाजीराव पटवर्धन महारोगविषयक कामाची नोकरशाही गुंत्यात गोची झाली की ते चिडून दंडा आपटीत सचिवालयात जात. त्यावेळी विदर्भातीलच वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांचे आगमन आपल्या खोलीपुढे होताच वसंतराव खोलीबाहेर येऊन त्यांच्या पायांवर मस्तक ठेवत आणि त्यांचा अर्धा राग जिरवून टाकत.

पण पुढे महाराष्ट्र शासनाशी डॉ. पटवर्धनांचे मतभेद झाले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना अपमानास्पद शब्द सुनावले ‘पटवर्धन हे मालक नाहीत’ अशी टिपण्णी केली. तसेच कुष्ठरोग्यांना सापत्न वागणूक दिली गेली तेव्हा आयुष्य वेचून उभ्या केलेल्या ‘तपोवना’तून डॉ शिवाजीराव पटवर्धन नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडले.

ते म्हणाले ‘मला विसरा, कार्य मी केले हेही विसरा पण कार्याला विसरु नका’

डॉ. पटवर्धन पुन्हा ‘तपोवन’मध्ये परतले नाहीत. त्यांनी आपले आयुष्य आणि सगळी संपत्ती तपोवनला दान दिली. आणि अखेरीस तपोवनवरचा हक्कही सोडला. वयाच्या ९४ व्या वर्षी चांदूर रेल्वे या विदर्भातील गावात त्यांची जीवनज्योत मालवली.

आजही ‘तपोवन’च्या कार्यकारणीवर त्यांच्या घरातील कोणी नाही. त्यांच्या पुढच्या पिढीने आपले कार्य इतर क्षेत्रात उभे केले.

‘तपोवन’ पाहून बाहेर पडताना पार्वतीबाईंचे एक वाक्य नजरेस पडते आणि पुन्हा पुन्हा आठवत राहते.

आयुष्यभर फक्त एकच केले, स्नेह सहकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली, आता देणं घेणं सारं संपलं आहे, मागणं एकच आहे – अनाथ अपंगांकरिता थोडा उजेड ठेवा.’

आज त्या नंदनवनात असंख्ये कुष्ठरोगी उपाचार घेऊन बरे होत आहे. या कार्यात डॉक्टर भोजराज यांची मोलाची साथ मिळत होती.  डॉ. पटवर्धनांसारखी माणसे असतात म्हणुनच तर पणत्या तेवत असतात, फुले फुलत असतात. नाही का?

आज मूर्तीजापुर, अंजनगावबारी, शेंदूरजना, गव्हा, शिवनी, दारव्हा, भिलेश्वर अशा ठिकाणीही तपोवनस्थित ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळाचा’ विस्तार आहे. संस्थेकडे आज बाराशे ते तेराशे एकर जमीन आहे.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन आणि पर्वतीबाई यांच्या त्यागातून हे कार्य उभे राहिले. या कार्यासाठी अनेक सन्मान त्यांच्याकडे चालत आले आणि पटवर्धनांनी ते नम्रपणे नाकारले. विद्यापीठाची डिलीट स्विकारली नाही. पुण्याचा टिळक पुरस्कार स्विकारला नाही. सगळ्या पुरस्कारांपलिकडे ते होते. कुष्ठरुग्णाच्या चेहर्यावर उमटलेले हास्य जागातील सगळ्या पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे असे ते म्हणत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.