दुर्दैवाने स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पाटलांनी ३५ फुटांवरून मारलेली उडी आपणाला माहित नाही

एव्हाना प्रतिसरकारचा पसारा प्रचंड वाढला होता. ब्रिटीश सरकारला पर्यायी सरकार चालवायचे म्हणजे प्रशासन यंत्रणा,न्यायव्यवस्था, पोलीस अशा सर्वच अंगाची गरज होती आणि या सगळ्यासाठी खूप सारा पैसा गरजेचा होता. श्रीमंत जमीनदार आणि सावकारांना लुटून पैसा जमवण्याचा मार्ग क्रां. नाना पाटील यांच्या तत्वात बसत नव्हता.

लुट करायची तर ती ब्रिटीश सरकारची करायची स्वकीयांची नाही याबाबत सर्वांचे एकमत होते.

एकदा क्रांतिकारकांना खबर लागली की १५ एप्रिल १९४४ ला धुळ्याहून नंदुरबारकडे साडे पाच लाखाचा सरकारी खजिना जाणार आहे. बातमी मिळताच जी.डी.बापूंच्या नेतृत्वाखाली सातारच्या आठ क्रांतीकारकांची टीम धुळ्याला रवाना झाली. तिथे त्यांना डॉ. उत्तमराव पाटील आणि रामचंद्र पाटील येवून मिळाले. योजना पक्की झाली.

नंदुरबार जवळच्या चिमठाणे गावाजवळच्या एका चढावावर रस्त्याच्या बरोबरमध्ये दारू पिलेल्या दोन तरुणांची हाणामारी चालली होती. रस्त्याच्याबरोबर मध्ये हे चालू असल्याने रहदारीला अडथला होत होता. कित्येक गाड्या आल्या व गेल्या पण ही हाणामारी थांबत नव्हती.

दुपारी बाराच्या सुमारास एक सर्व्हिस मोटार त्या चढावाजवळ आली. रस्त्याच्या मध्ये चालू असलेल्या या भांडणामुळे गाडीचा वेग कमी झाला. गाडीच्या आत बसलेल्या काही लोकांची या दोघा भांडखोरांबरोबर नजरानजर झाली आणि अचानक काही क्षणात ते दोघे तरूण उठले .त्यांनी गाडी अडवली. गाडीत सरकारी खजिना होता.

ते दोन दारू पिऊन भांडल्याचे नाटक करणारे तरुण होते जी.डी.बापू आणि नागनाथ आण्णा. 

गाडीच्या ड्रायव्हरला याची शंका येताच त्याने वेग वाढवायचा प्रयत्न केला. पण नागनाथ आण्णांनी त्याच्या छातीवर एक गोळी झाडली.  त्याचा ताबा सुटला. त्याचवेळी गाडीत बसलेल्या चार क्रांतिकारकांनी  गाडीच्या आत  खजिन्याच्या सुरक्षिततेसाठी  बसलेल्या पोलिसांवर हल्ला केला व त्यांच्या बंदुका काढून घेतल्या. सर्व प्रवासी थबकले.

मागच्या ट्रक मधून उत्तमराव पाटील आणि शंकरराव माळींनी उड्या टाकल्या. क्रांतिकारकांनी खजिन्याचा ताबा घेतला.

उत्तमराव पाटील, शंकर माळी, धोंडूराम माळी यांना खजिना घेऊन पुढे पाठवले.  नागनाथ अण्णा आणि जी.डी बापू मागे राहिले. तेवढ्यात तिथल्या गर्दीतील  एक लहान मुलगा पळाला आणि त्याने जवळच्या सोनगीर पोलीस स्टेशन ला खबर दिली. पण एव्हाना  सर्वच क्रांतिकारक पसार झाले होते.

खानदेशातले ते उन्हाचे चटके. त्यात प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. रात्र होईपर्यंत पश्चिमेच्या दिशेने पळत राहायचे असा विचार करून सर्व क्रांतिकारक पळत राहिले. पण अखेर घात झालाच. सांयकाळी ६ वाजता पंचवीस तीस बंदुकधारी पोलिसांची एक तुकडी क्रांतिकारक लपलेल्या गावावर चालून आली.

जी.डी बापूनी निर्णय घेतला कि बाकीच्यांनी खजिना घेऊन पुढे निघायचे आणि नागनाथ आण्णा व ते स्वतः असे दोघे पोलिसांबरोबर लढतील.

संध्याकाळ होत होती. पोलिसांचा बेधुंद गोळीबार होत होता. पण जी.डी बापू आणि नागनाथ आण्णा  यांच्याकडे दोन रिव्हॉल्व्हर आणि फक्त वीस गोळ्या !

२५-३० पोलीस, त्यांच्या बरोबर दोनशे तीनशे गाववाल्यांचा बघ्यांचा जमाव विरुद्ध हे दोघे अशी ही विषम लढाई होती.  त्याच वेळी एक गोळी आली आणि जी.डी बापूंच्या पिंढरीतून आरपार झाली. दुसरी गोळी नागनाथ  आण्णांच्या खांद्याला चाटून गेली. तेव्हा मात्र दोघांनी अतिशय त्वेषाने गोळीबार केला. दोन पोलीस जागीच आडवे झाले. अंधारानेही साथ दिली.

पोलीस घाबरले. मागे सरले. तसेच इतर लोकही मागे सरले. आणि नागनाथ आण्णा व बापू त्या सापळ्यातून निसटले.

उत्तमरावनी शंकरराव माळी यांना घेऊन रातोरात चाळीसगाव तालुक्यातील तळोजा गाठले. साडेपाच लाखांपैकी पाच लाख प्रत्यक्ष क्रांतिकारकांच्या हाताला लागले. ज्यापैकी एक लाख रुपये चळवळीसाठी राष्ट्रीय पातळीवर अच्युतराव पटवर्धन यांच्याकरवी सोपवले. उर्वरित रक्कम प्रतीसरकारच्या भविष्यकालीन योजनांसाठी वापरली गेली.

एवढी मोठी लुट झाल्यावर इंग्रज सरकार चिडणे सहाजिक होते. नाना पाटलांच्या प्रतिसरकारबद्दल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. काहीही करून या क्रांतीकारकांना जेरबंद केलं पाहिजे असे आदेश सुटले.

शिकारी कुत्र्याप्रमाणे पोलीसखाते प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांच्या मागावर होते. साताऱ्याहून आलेले नागनाथ अण्णा व इतर क्रांतिकारक सुखरूपपणे परत गेले होते. उत्तमराव पाटील देखील हैद्राबादमार्गे साताऱ्याला निघून गेले. पण धुळ्याला प्रचंड प्रमाणात धरपकड झाली.

यात त्यांचे धाकटे बंधू शिवाजीराव पाटील हे देखील होते. त्यांचा देखील प्रतिसरकारच्या चळवळीमध्ये सहभाग होता. फक्त शिवाजीरावच काय तर उत्तमरावांच्या पत्नी लीलाताईसकट अख्खं कुटुंब क्रांतिकार्यात गुंतल होतं. अठरा वीस वर्षाच्या शिवाजीराव पाटलांना धुळ्याच्या कारावासात ठेवण्यात आलं पण हे क्रांतिसिन्हांचे बच्चे कोठडीत फार काळ टिकणारे नव्हते.

काही दिवसातच शिवाजीराव पाटलांनी जेल फोडला आणि धुळे कारावासाच्या तब्बल पस्तीस फुट उंचीच्या भिंतीवरून उडी मारली.

फरारी झाल्यावर शिवाजीराव पाटील देशभर स्वतःचा जीव वाचवत फिरत होते आणि त्यांच्या मागावर ब्रिटीश पोलीस हात धुऊन लागले होते. पुढे लखनौ मध्ये असताना त्यांना अटक झाली. तीही त्यांच्या पायाला सहा बोटे होती यावरून.

फक्त शिवाजीराव पाटलांनीच नाही तर उत्तमराव पाटलानी पंढरपुरात तर लीलाताई पाटलांनी येरवडा जेलमधून पोलिसांच्या हातात तुरी देऊन स्वतःची सुटका करून घेतली. प्रतिसरकारचे वसंतदादा पाटील असे अनेक क्रांतीकारक जेल फोडून परत भूमिगत व्हायचे आणि प्रतिसरकारच कार्य चालूच ठेवायचे.

पुढे काही वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले. उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील, शिवाजीराव पाटील हे तिघेही नाना पाटलांच्या पाठोपाठ प्रजासमाजवादी पक्षात काम करू लागले. शिवाजीराव पाटील यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहानंतर कॉंग्रेसमध्ये आले. आमदार, मंत्री, राज्यसभा खासदार अशी विविध पदं त्यांनी भूषवली. याच शिवाजीराव पाटलांची धाकटी मुलगी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील.

पण आपल्या उभ्या आयुष्यात कधीही आपण देखील क्रांतिकारक होतो, जेलमधून उडी मारून पलायन केलं होतं याचा राजकीय गवगवा केला नाही. आयुष्यभर समाजवादी विचारांची पाठीराखन केली. 

आजही शिवाजीराव पाटलांनी जेल फोडून उडी मारलेली ती दगडी भिंत धुळ्याच्या एसटी स्टँड समोर ताठ मानेने त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभी आहे .

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.