एक काळ होता जेव्हा शिवसेनेला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायला लागली होती

भाजप आणि शिवसेना. एकेकाळचे सख्खे मित्र आणि आत्ताचे पक्के राजकीय वैरी. आधी मुख्यमंत्री पदावरुन कुरबूरी मग महाविकास आघाडी, भाजप विरोधी पक्षात जाणं, मग एकनाथ शिंदेंचं बंड, भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणं अशा टप्प्यावर सध्या ही मैत्री उभी आहे. आजच्या घडीला दोन्ही पक्षातुन विस्तव देखील जात नाही अशी परिस्थिती. भाजप एकीकडे सत्ताधीश आहे, तर दुसरीकडे शिवसेना धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याच्या चिंतेत.

मात्र एकवेळ अशी होती की या दोघांच्या घनिष्ट मैत्रीचे दाखले दिले जात असायचे. तुझ्या गळा – माझ्या गळा असं वातावरण होते. असाच एक दाखला म्हणजे

शिवसेनेचे दोन वाघ कमळ चिन्हावर अर्थात भाजपकडून निवडणूक लढवायला उभे राहिले.

गोष्ट आहे १९८४ सालची. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्र आले होते. मात्र त्यामागे देखील बरीच उलथापालथ झाली होती. त्यावर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यात भिवंडीमध्ये जातीय दंगल उसळली. यात बरीच हानी झाली होती.

मात्र या दंगलीत शिवसेनेचा हात असल्याचे आरोप करण्यात आले. शिवसैनिकांनी बंद ठेवल्यानेच ही दंगल उसळली अशी टीका सुरु झाली. वास्तविक इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सेनेशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र याला त्यांच्याच पक्षातून फार मोठा विरोध झाला.

भाजपमधील अनेकांचा “सेनेसारख्या वादग्रस्त संघटनेपासून चार हात लांब राहिलेले उत्तम” असाच सुर होता.

हा विरोध इतका तीव्र होता, की जनता पक्षाकडून भाजपसोबत यायला नकार मिळाल्यानंतरच भाजपनं शिवसेनेशी बोलणी करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतरच दोघे एकत्र आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील ४ जागा भाजपने लढवाव्यात आणि २ जागा शिवसेनेनं लढवाव्यात असा समझोता झाला. त्या बदल्यात उर्वरित महाराष्ट्रात भाजपला सेनेनं पाठिंबा दिला होता.

त्यानुसार भाजपनं शिवसेनेला मुंबईत दोन जागा दिल्या. त्यातील एक होती मध्य दक्षिण-मुंबई आणि दुसरी होती उत्तर-मध्य मुंबई. बाकी चार जागांवर भाजप स्वत: लढली.

शिवसेनेकडे त्यावेळी स्वतःचे अधिकृत असे निवडणूक चिन्ह नव्हते. प्रत्येक निवडणुकीत कधी उगवता सूर्य, कोणाला नारळ, कोणाला ढाल-तलवार  तर कधी रेल्वे इंजिन अशा चिन्हावर सेनेचे उमेदवार निवडणूक लढवत असायचे. हा गोंधळ टाळण्यासाठी सेनेचे दोन्ही उमेदवार बाळासाहेबांनी भाजपच्या चिन्हावर रिंगणात उतरवायचे ठरवले. 

त्यानुसार मुंबईतील उत्तर-मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मनोहर जोशी काँग्रेसच्या शरद दिघे यांच्या विरोधात मैदानात उतरले, तर मध्य दक्षिण मुंबई तर वामनराव महाडिक हे डॉ. दत्ता सामंत यांच्या विरोधात रिंगणात उतरले. 

दोन्ही पक्षांनी मिळून सगळ्या जागा जिंकायचा चंग बांधला. त्या दृष्टीने दोन्ही मतदारसंघात कमालीच्या आक्रमक पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली. भाजपची बाजू घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसवर निशाणा धरण्यास सुरुवात केली. इंदिरा गांधीच्या ठिकाणी राजीव गांधीना पंतप्रधान पदाची सूत्र सोपवली होती. यावर जाहीर सभेत बाळासाहेबांनी प्रश्न केला होता,

“पंतप्रधान पद आहे की, पान-पट्टीचे दुकान? म्हणजे घरातला एक माणूस गेला की, दुसरा गल्यावर बसतो, तसं?”

पण या आक्रमक प्रचाराचा उपयोग झाला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या
सहानुभूतीच्या महालाटेत या भगव्या युतीचा टिकाव लागला नाही. मुंबईतील सर्व जागा युतीनं मोठ्या फरकानं गमावल्या होत्या. शरद दिघे, दत्ता सामंत निवडून आले होते. संपूर्ण देशभरात काँग्रेस अभूतपूर्व यश मिळवत ५१४ पैकी ४०४ जागांवर निवडून आली.

shivsena 1984

shivsena 1984 2

महाराष्ट्रात अनेकांनी भाजपच्या अपयशाचं खापर सेनेच्या डोक्यावर फोडले. निवडणुकीनंतरच्या “आत्मचिंतन बैठकीत” भाजपनं अपयशाचा सगळा भार सेनेच्याच डोक्यावर दिला आणि युती तोडण्याचा निर्णय घेतेला. परिणामतः दोन्ही पक्षांनी १९८५ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढली. यात भाजपनं शरद पवारांशी युती केली होती.

पुढे १९८८ मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून सर्व राजकीय पक्षांची नव्यानं नोंदणी आणि प्रत्येकाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक वेळी होणार गोंधळ टाळण्यासाठी ‘धनुष्यबाण’ हे एकच चिन्ह मिळालं तर फार बरं होईल, असं सांगितलं.

त्यानुसार शिवसेनेचे तत्कालीन सरचिटणीस सुभाष देसाई, ऍड. बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी असे पदाधिकारी दिल्लीला गेले आणि त्यांनी पक्ष नोंदणीसोबतच पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवले. आता त्याच चिन्हावरुन पेटलेला वाद सारा महाराष्ट्र पाहतोय…

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.