सगळ्या गडावर एकच जल्लोष झाला, रयतेचं राजं शिवराय जन्माला आले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र, एक अतूट अस नात. याच नात्याच्या उत्सवाचा आज दिवस तो म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिवनेरी गडावर आजच्या दिवशी १६३० साली एक तेजस्वी पुत्र जिजाबाईंच्या पोटी जन्माला आला.

ज्या राजाचा आवाज सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमत होता. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच ज्या मुघलांचा थरकाप उडत होता, त्या छत्रपती शिवाजी महराजांना जसे अनेक वर्ष संघर्ष करून स्वराज्य स्थापन करावे लागले तसाच संघर्ष जिजाबाईंनी देखील शिवाजी महाराजांच्या जन्मा आधी केला आहे.

शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर गाव, याच जुन्नर पासून थोड्याच अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजी राजे यांचे घोडदळ थांबले होते. शहाजीराजांचे पुत्र संभाजी देखील शहाजीराजांच्या सोबत थांबले होते. वेळ निघून जात होता तसे शहाजीराजे अस्वस्थ होत होते. इतक्यात लांबून येणारे जिजाबाईंचे घोडदळ त्यांच्या नजरेत पडले. सततच्या प्रवासाने थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावरचा थकवा राजांना पाहताच नाहीसा झाला होता.

याच वेळी जिजाबाईंचे वडील लखोजिराव जाधव शहाजीराजांचा पाठलाग करत होते. जिजाबाई तेव्हा गरोदर होत्या, जिजाबाई आणि संभाजीची भेट होताच. पुढचा प्रवास झेपणार नसल्याचे जिजाबाईंनी शहाजीराजांना सांगितले आणि जवळच असणऱ्या शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराव यांच्याकडे थांबता येईल असे सुचवले.

तातडीने जुन्नरला असलेले शाजीराजांचे व्याही विजयराव विश्वासराव यांना शहाजी राजे आणि जिजाबाई येत असल्याचा निरोप पाठवला गेला. स्वत विश्वासराव शहाजीराजांच्या सामोरे गेले. त्यानंतर तिथे थांबणे धोक्याचे असल्याने निरोप घेत शहाजीराजांनी विश्वासू असणाऱ्या बाळकृष्ण हनुमंत, संक्रोजी निळकंठ, सोनाजीपंत कोरडे यासारखी विश्वासू माणसे जिजाबाईंच्या सोबत ठेवली आणि ते स्वत: पुढील प्रवासाठी निघाले.

जिजाबाईंनी गहिवरल्या डोळ्यांनी संभाजी आणि शहाजीराजांचा निरोप घेतला.

काही वेळातच जुन्नरला लाखोजीराव जाधवांचा वेढा पडला, त्यांनी तेथून थेट विश्वासराव यांच्या घरात प्रवेश केला. पण आपली गरोदर मुलगी समोर पाहुन त्यांनी काहीच केले नाही.

परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी स्वत जिजाबाईंना शिवनेरीवर पोहचवले.

शिवनेरी किल्ल्यावर अत्यंत चिंतेत जिजाबाईंचे दिवस पुढे जात होते. इतक्यातच शहाजीराजांची जहागीर असणाऱ्या पुण्याची मुरार जगदेवने राख केली, लोकांच्या कत्तली केल्या. हि बातमी जिजाबाईंना कळाली हे ऐकून त्यांना प्रचंड वेदना झाल्या,

पण थोरले संभाजीराजे आणि शहाजी महाराज सुखरूप असल्याचे कळल्याने त्या समाधानी होत्या.

एवढ्यात निजामाने जिजाबाईंचे वडील लखोजीराव जाधव आणि त्यांच्या तिन्ही मुलांचा दरबारात खून केल्याचे जिजाबाईंच्या कानावर आले. आपल्या वडिलांच्या खुनाची बातमी ऐकून त्या प्रचंड खचल्या,

गरोदर असतांना झालेल्या या यातनांनी त्यांचे मन ग्रस्त होते. याच दुखात त्यांचे ९ महिने संपले.

अखेर तो सोनेरी दिवस उजाडला, शिवनेरीवर कित्येक दिवसांनी आनंदाची लहर आली होती. सगळीकडे धावपळ सुरु होती. वैद्यराज, विश्वासराव आणि इतर मंडळी सदरेत बसली होती. इतक्यात एक दासी पळतच आली, आणि तिने मुलगा झाल्याची बातमी दिली. सगळ्या गडावर एकच जल्लोष झाला, आनंदाला उधाण आले आणि

रयतेच राज्य निर्माण करणारा एक तेजस्वी पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला.   

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.