असा साजरा झाला होता रयतेच्या राजाचा ’राज्याभिषेक’

६ जून १६७४ दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.

यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या.

राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते.

दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले होते तर शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेल्या सोयराबाई बसल्या होत्या. दुसऱ्या मंचावर बाल संभाजी थोडेसे मागे बसले होते.

अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते.

त्यानंतर त्या जलकुंभांनी शिवाजीमहाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली.

यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.

बरोब्बर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदाच्या बखरी मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.

शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले.

’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली.

विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या.

मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून घोषणा केली.

इतर पुरोहित मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी पुरोहितांना आणि इतर सर्व जनांना भेटवस्तू दिल्या.

त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले.

समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली.

इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले.

रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला.

शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून पुरोहितांना आमंत्रण देण्यात आले होते.

81SPruX8MrL. SX425

सुमारे ११००० ब्राह्मण, यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. (एकंदर आकडा ५००००). इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते.

चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. ब्राह्मण,सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते.

पुढे अनेक दिवस रयतेमध्ये या महासोहळ्याबद्दलच्या चर्चा कौतुकाने रंगवून सांगितल्या जात होत्या.

गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

या वास्तू गेली कित्येक शतके मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या होत्या. रायगडावर दबलेल्या अवस्थेत ३०० वाडे, घरे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या वास्तू म्हणजे रायगडाच्या इतिहासाच्या खणखणीत साक्षीदार आहेत.

संदर्भ-(SHIVAJI AND HIS TIMES) मूळ लेखक : सर जदुनाथ सरकार.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.