मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही…

शिवाजीराजे यांनी चार पातशाही दाबविल्या आणि पाऊण लाख घोडा, लष्कर, गड, कोट असें असता त्यांस तख्त नाही. याकरिता मऱ्हाटा राजा छत्रपती व्हावा असें चित्तांत आणिलें. अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांसे मनास आले की तक्ती बसावें.”

शिवरायांच्या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी समजाऊन सांगताना कृष्णाजी अनंत सभासदाने काढलेले उद्गार..

कसा झाला शिवरायांचा राज्याभिषेक? कसा घडला तो मंगळ सोहळा?

खरेतर, शिवराज्याभिषेकाचे विधी पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरू झाल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. पहाटेच्या समयी शिवाजी महाराजांनी गंगेच्या पाण्याने स्नान केले. स्नान केल्यावर कुलदैवत महादेव आणि भवानीदेवीचे दर्शन घेतले.

त्यानंतर त्यांच्यावर अभिषेक करण्यासाठी एक खास सुवर्ण आसनाचे प्रयोजन करण्यात आले होते. त्यावर महाराज विराजमान झाले. संपूर्ण देशभरातून आणलेल्या अनेक नद्यांच्या पवित्र जलांनी भरलेले कलश महाराजांच्या समोर ओळीने रचून ठेवलेले होते. स्वतंत्र राज्याची निर्मिती करताना शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची सुद्धा स्थापना केलं होती.

अनेक पुरोहित, अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांनी हे सर्व पवित्र जलकुंभ महाराजांच्या शिरावर रिते केले. महाराजांनी सर्वांना सन्मानित करताना सुवर्णकमळे, नानाविध सुवर्णपुष्पे दिली, मानाची वस्त्रे दिली. जमलेल्या सर्व ब्राम्हणांना प्रत्येकी 100 होनांचे दान दिले.

मुख्य पुरोहित असलेल्या प्रभाकर भटास 5,000 होन व 2,000 होनांचे वर्षासन लावून दिले आणि महाराज ‘सिंहासनारूढ’ होण्याच्या तयारीस लागले.

पहाटे 5 वाजता शिवाजी महाराजांनी राजदरबारी प्रवेश केला. सर्व विधींनी युक्त झालेले शिवराय सिंहासनावर आरूढ झाले. शिवरायांच्या डोक्यावर गागाभट्टांनी छत्र धरले आणि शिवराय ‘छत्रपति’ झाले.

यानंतर लगेच मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी शिवरायांना लवून मुजरा करत आठ हजार होनांनी शिवरायांच्या शिरावर अभिषेक केला. त्यांनतर मुख्य हिशेबनिस निळो पंडित याने सात हजार होनांनी अभिषेक केला. त्यानंतर इतर प्रधानांनी प्रत्येकी पाच हजार होनांनी अभिषेक केला.

या प्रसंगाचे वर्णन करताना सभासद म्हणतो,

“तख्त सुवर्णांचे बत्तीस मणांचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशांत होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली. सप्त महानदियांची उदके व थोर थोर नदीयांची उदके, तिर्थोदके आणली. सुवर्णांचे कलश केले. सुवर्णांचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राजियांस अभिषेक करावा, असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला.”

या एका घटनेने शिवरायांचा, मराठ्यांच्या स्वराज्याचा, महाराष्ट्राचा आणि पर्यायाने भारताचा इतिहास बदलला. या राज्यभिषेक सोहळ्याला साक्षी ठेवुन महाराजांनी ‘शिवशक’ सुरू केला. आपल्या स्वतःच्या नावाने नवीन कालगणना सुरू करण्याचा पराक्रम शिवरायांनी करून दाखवला.

या राज्याभिषेकानंतर तब्बल दीडशे वर्ष हा शिवशक संपूर्ण महाराष्ट्रात वापरल्या जात होता. इथल्या सर्वसामान्य जनतेपासून शासनदरबारी सुद्धा ‘शिवशक’ मध्येच कालगणना होत होती. शिवराय ‘शकनिर्माते’ झाले.. शककर्ते झाले.

राज्याभिषेकाच्या समयी शिवरायांनी ‘क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराज छत्रपती’ ही बिरुदावली धारण केली तर ‘राजा शिवछत्रपती’ हे नवीन नाव स्वीकारले. याआधी शिवरायांचा उल्लेख कागदपत्रांमधून ‘राजश्री शिवबाराजे किंवा सिवबा राजे’ असा केलेला आढळतो. पण राज्याभिषेकानंतर महाराजांना ‘राजा शिवछत्रपती’ या नावाने संबोधित करण्यात येऊ लागले. त्यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने स्वराज्याची नवीन नाणी पाडण्यात आली आणि त्यावर सुद्धा ‘श्री राजा शिवछत्रपती’ ही अक्षरे कोरण्यात आली.

आणि म्हणूनच, या घटनेचे वर्णन करताना भारावून जाऊन सभासद बखर म्हणतो,

“या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह.. मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही..”

परकीय सत्तांनी शेकडो वर्षे केलेल्या गुलामगिरीच्या, अत्याचारांच्या छाताडावर उभा राहून सह्याद्री गर्जत होता,

“प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती की जय..”

शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो..

  •  भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.