कशी होती शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची पूर्वतयारी ?

शिवराज्याभिषेक सोहळा. महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकणारी घटना. एका छत्रपतीचा राज्याभिषेक रायगडावर घडला. या राज्याभिषेकाने कितीतरी स्थित्यंतरे घडवली. अवघ्या भारतभरातून शिवरायांना भेटण्यासाठी रांगा लागल्या.

‘जहागीरदार पुत्र ते स्वतंत्र राज्याचा अभिषिक्त सम्राट’ एवढा प्रचंड मोठा प्रवास करणारे शिवराय एकमेव व्यक्तिमत्त्व. या राज्यभिषेकाची पूर्वतयारी नेमकी कशी सुरू होती? साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर काय लगबग उडाली होती?

रायगड हा बलाढ्य, मजबूत किल्ला शिवरायांनी मे 1656 साली स्वराज्यात सामील करून घेतला होता. राज्याभिषेकासाठी आणि स्वराज्याची नवीन राजधानी म्हणून रायगडाची निवड करण्यात आली. गडावर अनेक महत्वाच्या इमारती उभारण्यात आल्या. त्यामध्ये अठरा कारखान्यांचा सुद्धा समावेश होता. शिवरायांनी ‘रामाजी दत्तो’ ला रत्नशाळेचा प्रमुख म्हणून नेमले होते.

इसवी सन 1673 पासून म्हणजे राज्यभिषेकाच्या एक वर्षाआधीपासूनच सुवर्ण सिंहासन तयार करण्याची प्रक्रिया रामाजीकडून सुरू होती. त्यासाठी रत्नशाळेत असणाऱ्या सर्व मौल्यवान रत्नांचा वापर रामाजीने केला. डच वखारीतून ‘अब्राहम ले फेबर’ याने डच गव्हर्नरला राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे पत्र लिहिले होते. त्या पत्रात शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे नाव ‘शिवराज’ असल्याचे त्या डच व्यक्तीने लिहून ठेवले आहे.

राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी, मार्च 1674 मध्ये शिवरायांनी कोकणचा दौरा केला.

मराठ्यांची मोठी फौज चिपळूणला ठानेबंद होती. त्याची संपूर्ण लष्करी व्यवस्था पाहून शिवाजी महाराज 19 मे च्या दरम्यान रायगडावर आले. म्हणजे राज्याभिषेकाच्या अवघ्या काही दिवसाआधीपर्यंत स्वराज्याचा हा छत्रपती रयतेच्या सेवेत रममाण होता. म्हणूनच शिवरायांना दिलेलं ‘श्रीमंत योगी’ हे विशेषण अगदी योग्य वाटते.

याचदरम्यान शिवरायांनी हंबीरराव मोहित्यांना मराठ्यांच्या फौजेचे सेनापती म्हणून नियुक्त केले. सेनापती प्रतापराव गुजरांना वीरमरण आल्यामुळे ती महत्वाची लष्करी जागा रिकामी होती. साल्हेरच्या रणांगणावर प्रचंड मोठा पराक्रम गाजवल्यामुळे ही महत्त्वाची जबाबदारी शिवरायांनी हंबीररावांना देऊ केली.

19 मे रोजी शिवराय रायगडाहून प्रतापगडाला गेले. प्रतापगडाच्या भवानीला महाराजांनी तीन मण सोन्याचे छत्र अर्पण केले आणि 21 तारखेला ते परत रायगडास आले.

रायगडावर मोठी तयारी सुरू होती. पूजेसाठी उपस्थित असलेले ब्राम्हण मंडळी, सैनिक, स्वराज्याचे अधिकारी, व्यापारी, परकीय व्यक्ती, राजकीय प्रतिनिधी आणि सोहळा पाहण्यासाठी जमलेली रयत असे 11 हजारांपेक्षा जास्त लोक रायगडावर जमा झाले होते. 29 मे रोजी महाराजांची समंत्रक मुंज झाली. इतर सर्व सोपस्कार पार पडले.. या मुंज विधी नंतर शिवरायांनी 17 हजार होनांचे दान दिले.

आणि दिवस उजडला शिवरायांच्या तुलेचा..

एखादा राजा ‘अभिषिक्त सम्राट’ होत असताना त्याला अनेक विधींची पूर्तता करावी लागते. शिवरायांची तुलादान विधी अतिश्रीमंत पद्धतीने संपन्न झाली. सर्वप्रथम शिवरायांची सुवर्णतुला करण्यात आली. त्यात महाराजांचे वजन ‘16,000 होन’ इतके भरले. या सोन्याच्या नाण्यांसोबतच तांबे, जस्त, चांदी, कथिल, शिसे, लोखंड, ताग, कापूर, मीठ, खिळे, जायफळ, लोणी, मसाले, साखर, सर्वप्रकारच्या फळांनीसुद्धा शिवरायांची तुला करण्यात आली होती.

या सर्व वस्तूंसोबतच शिवरायांनी 1600 होन दानस्वरूपात वाटले होते.

30 मे रोजी शिवरायांचा सोयराबाई राणीसरकार सोबत समंत्रक विवाहसोहळा संपन्न झाला. सोयराबाई स्वराज्याच्या पट्टराणी झाल्या. स्वराज्याचे युवराज म्हणून संभाजीमहाराजांच्या नावाची द्वाही फिरली. पुढील दोन-तीन दिवस शिवरायांच्या मंगलविधींची पूर्तता करण्यातच गेले. तोवर रायगडावर हेन्री ओक्झेंडन येऊन पोहोचला होता. हेन्री हा सगळा सोहळा कौतुकाने पाहत होता.. आपल्या डायरीत लिहून ठेवत होता. पाच तारखेच्या सायंकाळी त्याला निराजीपंतांनी निरोप पोहोचवला,

‘उद्या शिवाजीराजेंचे सिंहासनारोहन होणार आहे. मोठा दरबार भरणार आहे. त्यावेळी शिवाजीराजेंना मुजरा करण्यास व नजराणा अर्पण करण्यास यावे..’

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.