असाही एक शिवसैनिक आहे जो पर्यावरणासाठी राडा करू शकतो…

माणसांना वेगवेगळे नाद असतात. यातला एक नाद असतो समाजासाठी काहीतरी करण्याचा. आत्ता बरेच लोक अशा नादाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायचा उद्योग म्हणून हिणवतात. पण मॅटर असाय की जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा अशाच माणसांनाच फोन केला जातो.

स्वत:च्या घरादाराचा, कुटूंबाचा विचार न करता अहोरात्र एकाच गोष्टींनी झपाटलेली माणसं ही भारी असतात.

असाच एक माणूस म्हणजे अनंत घरत…

अनंत घरत कोण आहेत, ते नेमकं काय करतात, त्यांच काम कसं चालतं यापूर्वी एक किस्सा सांगतो.

ते साल होतं २०१७ चं.

तेव्हा पुण्यातल्या विद्यापीठ चौकात वाहतुकीला अडथळा ठरत आहेत अस सांगून झाडांच्या फांद्या व रस्त्यावर येणारी झाडे तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पण वहातुकीचं कारण पुढे करत प्रत्यक्षात १०० वर्ष जूनी वडं, पिंपळ अशी ११ झाडे रातोरात तोडण्यात आली.

झाडांची ही कत्तल पाहून अनेकांनी आक्षेप घेतला. वर्तमानपत्र वाचकांच्या पत्रव्यवहारांनी भरून गेली. तुरळक ठिकाणी हातात बॅनर घेवून पर्यावरणवाद्यांनी निषेध करण्यास चालू केलं. अर्ज, विनंत्या देण्याचे सोपस्कार पार पाडले जावू लागले. प्रशासनाला देखील हे सवयीचं झालं होतं. कोणतही झाड तोडा, दोन चार निषेध येतील, एक दोन पत्र येतील. झालं त्याहून अधिक काही घडत नाही हे माहित असल्याने प्रशासन देखील निवांत होतं…

पण यावेळी एक वेगळी गोष्ट घडली.

अनंत घरत यांनी थेट तोडलेल्या वृक्षांची अंत्ययात्रा काढली. विद्यापीठ चौकापासून ही यात्रा सुरू झाली. तुटलेल्या फांद्या, झाडे यांना घेवून अंत्ययात्रा पुणे महानगरपालिकेच्या दिशेने निघाली. बघता बघता गर्दी जमा होत गेली. रस्त्यावरून जाणारा साधा माणूस देखील अशा प्रकारची अंत्ययात्रा पाहून त्यात सामील झाला.

यावेळी प्रशासन हादरल. वृक्षतोडीचा निषेध असाही असू शकतो हे त्यांना समजून चुकलं. एकट्या अनंत घरत यांच्या डोकेबाज कल्पनेतून वृक्षांची अंत्ययात्रा समोर आली.

अनंत घरत हे हाडाचे शिवसैनिक.

त्यामुळे वृक्षतोडीच्या, पर्यावरण वाचवण्याच्या कोणत्याही कल्पनेत शिवसेना स्टाईल डोकावते. गेल्या ७ वर्षांपासून अनंत घरत पर्यावरण रक्षणासाठी झटत आहेत. एखाद्या गोष्टीचा नाद पकडून ती गोष्ट लावून धरणं, लोकांच्या गळी उतरवणं खरेच अवघड गोष्ट असते. तरिही लोकांना एकत्रित करुन ते हे लढाई लढत असतात.

एकीकडे पर्यावरणासंबंधित प्रबोधन करणे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे ही कामे तर दूसरीकडे थेट भिडणे ही त्यांची स्टाईल आहे. आजवर पर्यावरणाच्या विषयाबाबत फक्त अर्ज, विनंत्या आणि मागण्या होत असत पण थेट प्रकरण लावून रस्त्यावर उतरणारे घरत कामाचे पर्यावरणवादी आहेत.

आत्ता परवाचाच विषय घेवू.

पुण्याच्या आंबिल ओढ्याचा परिसरात प्रशासनाने कारवाई केली. कोरोनाच्या काळात भर पावसात लोकांना उघड्यावर यावं लागलं. पण हा वाद आजचा नाही,

२०१९ आणि २०२० मध्ये आंबील ओढ्याला आलेल्या पुरानं तेथील रहिवाशांचं भरपूर नुकसान झालं होतं. पूर येण्यासाठी अतिरिक्त पाऊस हे कारण असलं तरी ओढ्याचं न झालेलं खोलीकरण, अस्वच्छता तसेच ओढ्याभोवती सीमाभिंत नसणे याचा फटका नागरिकांना बसला होता.

गेली २ वर्षे झालं घरत यांनी पुणे आयुक्त, संबंधित खात्यातील अधिकारी यांना सातत्याने पाठपुरावा करून त्यांनीसीमा भिंतीचे, ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण करून घेतले.

त्यानंतर देखील घरत आणि पर्यावरण प्रेमी तसेच आंबील ओढा परिसरातील नागरिकांचा आंबील ओढा वाचवण्याचा लढा अजून चालूच आहे. त्यांचा आरोप आहे विकासाच्या नावाखाली आंबील ओढा वळविण्याचा डाव हा बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे काल आंबील ओढ्यावर कारवाई सुरु झाल्यानंतर घरत तेथील नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून या कारवाईच्या विरोधात उभे राहिले. शेवटी नागरिकांच्या या एकत्रित विरोधासमोर प्रशासनाला झुकावे लागले आणि हि कारवाई थांबवण्याचा आदेश देण्यात आला.

अनंत घरत यांनी आजपर्यन्त पुणे शहरातील ४०० हून अधिक वृक्ष वाचवले आहेत.

कुठे गाड्यांच्या पार्किंगचे कारण तर कुठे वाहतूकीचे कारण पुढे करून अशी झाडे तोडण्यात येतात. बऱ्याचदा ही झाडे १०० वर्षाहून अधिक जूनी असतात. अशी झाडे तोडण्यासाठी बऱ्याचदा बिल्डिंगचा फ्रॅन्ट जातो, अधिकची खाजगी जागा वापरायला मिळून शकते अशी असतात. अशा वेळी झाड तोडण्याची कारवाई करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम अनंत घरत करत असतात.

दत्तवाडी, लोकमान्य नगर भागात वाहन वळविता येत नाही म्हणून ५० वर्षांपेक्षा जास्त जुने वृक्ष कापण्यात येत होते. अनंत घरत यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी थेट महानगरपालिकेच्या उद्यान, क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलून झाडांची कत्तल रोखली.

आत्ता हे झालं झाडांबद्दल, अनंत घरत यांच काम इतक्यावरच थांबत नाही. त्यांच्या पर्यावरणाशी संबंधित अनेक वेगवेगळ्या कल्पनांमुळे ते सातत्याने चर्चेत असतात.

त्यांचे काही कल्पक उपक्रम पाहिले तर त्यांच्या कामाचा अंदाज येईल.

यातलाच एक उपक्रम म्हणजे,

कचऱ्याचा फॅशन शो.

प्लॅस्टिकच्या पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रिकाम्या पाण्याच्या बॉटल अशा वेगवेगळ्या टाकावू वस्तू वापरून त्यांनी मॉडेल्सना फॅशन रॅम्पवर उतरवलं होतं. त्याबद्दल बोलताना घरत यांनी सांगितलं होतं की, लोकांच्या डोक्यातला कचरा काढून टाकण्यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला. हा उपक्रम राबवल्यानंतर लोकांना कचऱ्याचं देखील महत्व कळू लागलं. भारतात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील अनंत घरत यांच्या या उपक्रमाचं तोंडभरून कौतुक केलं होतं…

अशीच दूसरी गोष्ट म्हणजे,

१ किलो प्लॅस्टिक कचरा द्या, कापडी पिशवी घ्या…

सिंगल युज प्लॅस्टिकसाठी देशभरात आत्ता कुठे वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. पण अनंत घरत यांनी ५ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. एकदाच वापरात येणारे प्लॅस्टिक ते लोकांकडून घेतात आणि त्यांना कापडी पिशवी देतात. वास्तविक सिंगल यूज प्लॅस्टिक लोकांकडून घेणं यामध्ये त्यांना कोणताही आर्थिक लाभ होत नाही. पण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पदरचे पैसे घालवून हा उपक्रम ते राबवत असतात.

अडीच हजार विद्यार्थांना पर्यावरण रक्षणांची शपथ

मुळा मुठा नदीला प्रदुषणापासून वाचवण्यासाठी अनंत घरत यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून अडीच हजार शालेय मुलांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली होती. नदीचे आपल्या संस्कृतीत असणारे स्थान व भावनिक नातं निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता.

त्याच सोबत पुण्यातील २०० मंडळाच्या माध्यमातून निर्माल्य टाकण्यासाठी आरोग्यउत्सवस, निर्माल्यातून कंपोस्टखत हा उपक्रम राबवला होता. त्यातून साडेतीन टन कंपोस्ट खत तयार झाले होते. सोबत एक लाख देशी झाडांच्या बियांचे वाटव वगैरे सारखे उपक्रम देखील ते राबवत आहेत. यामुळेच आज पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाचा प्रदुषण नियंत्रण विभाग आपले वेगवेगळे उपक्रम अनंत घरात यांच्या सहकार्यानेच उभारत असतो.

थोडक्यात काय तर एखादं झाडं वाचवायचं असो की संपूर्ण परिसंस्था टिकवून ठेवायची असो त्यासाठी लोकांच प्रबोधन करण्यापासून प्रत्यक्ष रस्त्यावरच्या लढाईसाठी अनंत घरत काय पुढे असतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.