१९६० च्या दशकात पहिली देशीवादी हाक ‘जय महाराष्ट्र’ शिवसेनेने फेमस केली.

श्री. भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी आली १९६३ मध्ये. शिवसेना स्थापन झाली १९ जून १९६६ रोजी, म्हणजे अंदाजे ३ वर्षे काळ मध्ये लोटल्या नंतर.

म्हणजे कोसला शिवसेनेला तीन वर्षे थोरली आहे.

कोसला व नेमाडेंचे मराठी साहित्य विश्वावर पसरलेले गारुड आजही कायम आहे. तर मराठी माणसाच्या अस्मितेवर उभी राहिलेली शिवसेनाही आज मराठी माणसाच्या डीएनए मध्ये जाऊन बसली आहे.

किंबहुना, मराठी माणसाचा आज जो काही मनोव्यापार सुरू आहे, त्यात भाषिक अस्मितेची दिशा आणि ऊर्जा ही शिवसेनाच राहिली आहे.

आज शिवसेनेचा वर्धापनदिन, त्यानिमित्ताने हा घेतलेला आढावा.

देशीवाद हा विचार जसजसे जागतिकीकरण पसरेल तितका मोठ्या प्रमाणावर रुजणार, स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापित करत त्यांना आत्मभान देणार आहे, त्यांना नवे प्रयोग करायला लावणार आहे. मराठी माणूस आणि भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर उभी राहिलेली शिवसेना ही अमर आहे.

प्रस्थापित काँग्रेसी घराणेशाही, कम्युनिस्ट विरोधी भूमिका, मराठी भाषिक अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पार्श्वभूमी, मुंबईतली वाघाची डरकाळी, जातीपलीकडचे शिवसेनेचे ओबीसी जाळे, थेट हुकुमशाहीचा आदेश म्हंजे आदेश म्हणत केलेला पुरस्कार वा संघटनेचा एकचालकानुवर्ती स्वभाव, उजव्या भूमिकांना असलेली राडा संस्कृतीची जोड यामुळे येत्या काळात सेना बहरणार आहे, ती स्थितप्रज्ञ होऊन वाहत जाणार आहे.

आज मोदी शहा जोडी काहीही म्हणोत, शिवसेना उंदीर आहे की वाघ आहे…

तिच्या डुप्लीकेट आवृत्या काढण्याचे प्रयत्न झाले, पण निखळ यश मिळवणे नक्कल बहद्दरांना जमले नाही. त्याला कारण होते, इरसाल विद्वान प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे तितकेच जहाल आणि कडवे मराठी पुत्र बाळासाहेब ठाकरे!

कोंकणातला असो की घाटावरचा, मराठी माणूस मुंबईत तेंव्हाही नागवला जात होता, आजही तो नागवला जातो आहे. कारण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मराठी भाषेचे दुय्यम स्थान आणि मराठी माणसाची मर्यादा. त्यावर मात करण्याचे तगडे आव्हान आजच्या शिवसेनेसमोर आहे.

भारतीय लोकशाहीमध्ये ५० वर्षे पूर्ण केलेल्या कुठल्याही संस्था, संघटनेला मिळाले नसेल इतके ग्लॅमर जागतिक पातळीवर शिवसेनेने मिळवले असल्याचे दिसते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच आक्रमक भूमिका आणि प्रश्नला थेट भिडण्याची, त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी मनाशी केलेल्या शिवसैनिकांची मोट बांधली ती जहाल वक्तृत्व आणि झुंजार नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. मूळचे व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांना राजकीय, सामाजिक व्यंग स्पष्टपणे दिसत होते, त्यावर उपाय शोधण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला व तो लढा आजही सर्व पातळीवर सूरु असलेला दिसतो.

नेमाडे यांनी जसे देशीवादी भूमिकेतून चांगदेव चतुष्टक उभे केले…हिंदू या महाकाय कादंबरीची रचना केली, अगदी तशीच नव्हे पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आदी मंडळींनी शिवसेना रुजवली, वाढवली आणि करारी बाणा घेऊन महाराष्ट्रभर पसरवली आहे.

त्यासाठी कधी मुस्लिम लीग तर कधी जनसंघ, भाजपा यांच्याशी हातमिळवणी केली, पण लढाई सुरूच ठेवली.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या नावाला ब्रँड बनवले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे सहकार्य शिवसेनेला राहिले हे जरी खरे असले, तरीही शिवसेनेने आपल्या रोखठोक भूमिका आणि रस्त्यावरील लढाईची नेहमीच घेतलेली खंबीर भूमिका यामुळे शिवसेनेने समाजात व मराठी मनांत आपले अधळस्थान प्रस्थापित केले आहे. त्यामुळेच शाखाप्रमुख, उपमंत्री या बिरुदाना दमदार वजन प्राप्त झाले. सामान्य शिवसैनिक असणे हासुद्धा सन्मान समजला जाऊ लागला, यात या संघटनेच्या यशाचे गमक आहे.

स्वतंत्र भारतात शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे पहिले राजकारण करणारी शिवसेना ही संघटना वडापाव संस्कॄती सारखी शहरे, खेड्यांतील निम्नवर्गीय जीवन जगणाऱ्या मानसात ती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांनी, कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खुनाने, मुंबईतील पीड़ित दलित तरुणांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाने, मुंबई दंगलीतील सहभागाने, बाबरी मशीद उध्वस्त करण्याच्या प्रयत्नाने, मुस्लिम द्वेषाने आणि गिरणी कामगारांच्या उपासमारीने रुजवली गेली आहे. शिवसेनेच्या दहशतीने दिल्लीला नेहमीच दखल घ्यायला भाग पाडले आहे.

जहाल वक्तव्ये, देशभक्तीची विविध उदाहरणे प्रस्थापित करणे, भाषेचा प्रभावी व मनाचा ठाव घेणारा जहाल वापर यामुळे सामना ते शिवसेना आणि सामान्य शिवसैनिक यांचं दृढ नातं रूढ झालं. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाचा अग्रलेख देशात लक्षणीय ठरू लागला. अनेकांना त्याची आजही भीती वाटते, ही किमया बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी उभारलेल्या शब्द सामर्थ्याची आहे.

अशी जहाल संघटना होणे नाही. पक्ष म्हणून आज व्हाइट कॉलर, कॉर्पोरेट झालेली शिवसेना हे स्वच्छ रूपडे आपले नाही, हे सामान्य शिवसैनिकाला नीट माहिती आहे. म्हणूनच आजही आपली ओळख तो बाळासाहेबांचा शिवसैनिक अशीच करून देतो. आज राज्यात शिवसेना प्रमुख मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. त्यामुळे शिवसैनिकांप्रमाणे सामान्य मराठी माणसांना शिवशाहीच्या न्यायनिष्ठ कारभाराची अपेक्षा आहे.

‘आरे’ तील झाडे आजही कत्तलखोरांना काय शिक्षा होणार हा जाब विचारत आहेत. असे असताना शिवसेनेचा वर्धापनदिन नव्या उत्साहाने साजरा होणार आहे. मराठी माणसाचे तारण हेच शिवसेनेच्या जन्माचे कारण हा मंत्र लोकांना आपला वाटत आला आहे. ज्या गावात पिढ्यानपिढ्या काँग्रेसचे उमेदवार आणि मतदार जन्म घेत होते, त्या त्या वाड्या – वस्तीवर शिवसेनेच्या शाखा निघू लागल्या, शिवसेनेचा भगवा झेंडा आणि वाघ सायकली, मोटारसायकलीवर झळकू लागला. ही बांधिलकी राज्यातील काँग्रेसी राजकीय संस्कृतीला नवीन होती.

हे पॉलिटिकल कम्युनिकेशन यशस्वी करण्यात बाळासाहेब ठाकरे यशस्वी ठरले होते. आजही हातात शिवबंधन बांधलेला माणूस तो शिवसैनिक हे कुणीही ओळखू शकतो, ही ती आयडेंटिटी आहे, जी कपाळावर अबीर बुक्का असलेला तो वारकरी संप्रदायाचा व्यक्ती म्हणून लोक ओळखतात.

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेले संस्कार धारण केलेला शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता अन्य पक्षाच्या नगरसेवकाला जनसंपर्क आणि कामे करण्यात फाईट देतो, ते यामुळे. इतर चळवळीतील कार्यकर्त्यांनी कामाच्या बाबत शिवसैनिकाशी तुलना न केलेली बरी. शिवसैनिक नेहमी उजवे राहतील, हे वास्तव आहे. कारण त्यांना शिवरायांचा महाराष्ट्र दृष्टीपथात आहे.

मुंबईतील माथाडी कामगार, भाजीविक्रेते, कामगार, भंडारी, कोळी, आगरी, देसाई, कोकणी माणूस, सीकेपी यांच्या कष्ट, घामाची, कर्तृत्वाची सर दरबारी राजकारण करणाऱ्या मंडळींच्या उठ बशिला येणार नाही. कारण शिवसेना ही कष्टकरी लोकांच्या, पीड़ाग्रस्त लोकांच्या हात पाय हलविण्यामुळे आणि स्वाभिमानामुळे मरणार नाही. ती म्हणून अमर आहे.

आज देशात चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची अहमीका लागली आहे. त्यातून कोण खरा देशभक्त आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न जात होतोय. आज चीनी वस्तूंवर टाकण्यापेक्षा घाटी आणि कोंकणी मालाचे, वस्तूंचे ब्रँडिंग करण्यात व तो माल देशात सर्वोच्च दरही राखून विक्री करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेणे व्यवहार्य आणि काळाची पावले ओळखून वर्तन करणे ठरणार आहे.

“मराठी माणूस” हाच देशातील सर्वात भयंकर आणि धाडसी ब्रँड म्हणून सादर करण्याची धमक आज महाराष्ट्रात केवळ शिवसेनेत आहे.

मराठी अस्मितेचा सृजनशील आविष्कार घडवणे हा नवा देशीवाद रुजणे याकामी हे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी दिल्लीचे तख्त राखण्यापेक्षा देशाचे पोट भरतो महाराष्ट्र माझा, हा देशव्यापी नेतृत्वाचे रणशिंग फुंकणे आवश्यक असणारी आहे. आज राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार, आरोग्यसुविधा, शिक्षण आणि अत्यावश्यक सेवा सहज उपलब्ध करून देणे हे त्यांच्यात देशावर राज्य करण्यासाठी, स्वराज्याची भगवी पताका जगभर मिरवण्याची खुमखुमी निर्माण गरजेची झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य, ते स्वराज्य उभारण्यात २१ व्या शतकातील शिवसेनेने स्वतःला पुन्हा एकदा झोकून दिले पाहिजे.

कोसला आणि नेमाडे यांचा देशीवाद असाच जिवंत राहणार आहे. पिडेचा विजय असो.
जय महाराष्ट्र!”

हर्षल लोहकरे

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.