नोटबंदीनंतर एकाच महिन्यात ठाकरेंनी मान्य केलं,” मनमोहनसिंग ग्रेट आहेत”

शिवसेना आणि काँग्रेस हे कधीकाळचे कट्टर विरोधक. एकमेकांवर टीका करण्यात दोन्ही पक्षांनी कधीच आखडता हात घेतला नाही. विशेषतः शिवसेनेचे नेते काँग्रेसवर आणि काँग्रेस नेत्यांवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात कधीच कचरले नाहीत. आता मात्र हेच दोन पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये एकत्र आहेत.

महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २००९ मध्ये पुण्यातल्या भर सभेत देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अत्यंत खराब टिपण्णी केली होती. ते मनमोहन सिंगांना भरसभेत ‘हिजडा’ म्हणाले होते.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली नोटबंदी म्हणजे अनेकांना धक्कादायक होती. कित्येकांना यावर कस रिऍक्ट व्हायचं हेच कळत नव्हतं. आधी तर लोकांनी भ्रष्टाचार संपणार, ब्लॅकमनी परत येणार, दहशतवाद संपणार म्हणून मोदींच्या या धडाकेबाज निर्णयाचं कौतुक केलं. यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे देखील होते.

पण पुढच्या काही दिवसातच नोटबंदीचे साईड इफेक्टस समोर येऊ लागले. सगळ्यात आधी यावर टीका केली ती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी. अनेक मोदीसमर्थक देखील हळूहळू नोटबंदीच्या निर्णयाला शिव्याशाप देऊ लागले.

भाजपबरोबर युतीत असूनही उद्धव ठाकरे यांनी नोटबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली. मोदींनी एका कार्यक्रमात अश्रू ढाळले याबद्दल देखील त्यांनी टीका केली. तेव्हा बोलताना ठाकरे म्हणाले,

“मनमोहन सिंग यांच्याबद्दल लोक काहीही बोलले तरी… अर्थतज्ञ म्हणून त्यांचे ज्ञान सर्वांना मान्य आहे, त्यांनी काही सांगितले तर ते गांभीर्याने घेतले पाहिजे.

शिवसेना पक्षाध्यक्षांकडून पहिल्यांदाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल कौतुक करण्यात आलं होतं. 

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातूनही अनेकदा मनमोहन सिंग यांना अनेकदा लक्ष्य करण्यात आलं होतं. मात्र याच सामना वृत्तपत्राच्या सप्टेंबर २०१९ मधल्या अग्रलेखातून मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली होती, तेही शिवसेना आणि भाजप युतीत असताना.

नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर टीका करण्याऱ्या अग्रलेखात मनमोहन सिंगांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं होतं.

त्याचा मूळ गाभा होता, मनमोहन सिंगांची हेटाळणी करण्याऐवजी सरकारनं अर्थव्यवस्थेबाबत त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता.

देशात नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर झाली. तेव्हा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं नोटबंदीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र नोटबंदीची अंमलबजावणी कशी होणार याबाबत चिंताही व्यक्त केली होती. काही दिवसांनंतरच ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या केंद्र सरकार विरोधातल्या रॅलीत शिवसेना सहभागी झाली.

अग्रलेखात काय लिहीलं होतं?

‘देशाच्या अर्थव्यवस्थेवर भक्त काहीही बोलोत, सत्य सगळ्या जगासमोर स्पष्ट आहे. विशेष म्हणजे सहसा कमी बोलणाऱ्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत सौम्य शब्दांत हे सत्य मांडलं आहे. गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्था ही पार्टी फंड्स, सत्ता स्थापनेतला घोडेबाजार आणि निवडणुकांच्या संदर्भातच दिसत आहे. यामुळं देशाच्या प्रशासनाला त्रास होत आहे,’ अशी टीका मोदींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारवर करण्यात आली होती.

‘मनमोहन सिंग यांनी जवळपास चार वर्षांपूर्वीच या परिस्थितीबाबत सर्वांना सावध केलं होतं. मात्र त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग रेनकोट घालून अंघोळ करतात अशा शब्दांत त्यांची चेष्टा केली होती. तत्कालीन सरकारनं मनमोहन सिंग यांना अर्थव्यवस्थेबद्दल काहीच कळत नाही अशी प्रतिमा तयार केली.’

‘मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून अंघोळ करु दे किंवा छत्री घेऊन तळ्यात उडी मारू दे, त्यांना अर्थव्यवस्थेबाबत चौफेर ज्ञान आहे यात दुमत नाही. संपूर्ण देशालाही हा विश्वास आहे,’ असंही अग्रलेखात लिहिलं होतं. 

पुढं अग्रलेखात म्हणलं होतं, ‘गेल्या ३५ वर्षांत मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था जवळून पाहिली आहे. त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेत काही दोष आढळला, तर तो दाखवून देण्याचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे. सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलना चीन आणि अमेरिकेशी करत आहेत, ही गोष्ट धक्कादायक आहे.’

या स्तुतीसुमनांमागचं कारण काय होतं?

त्यावेळी महाराष्ट्राच्या निवडणूका जवळ आल्या होत्या. शिवसेना भाजपप्रणित एनडीए सरकारमध्ये समाविष्ट होती. पण त्यांचे संबंध काही प्रमाणात ताणले गेले होते. अशावेळी भाजपच्या प्रत्येक मुद्द्याचं आम्ही समर्थ करत नाही आणि गरज पडली तर आम्ही त्यांच्यावर टीकाही करूच शकतो हे शिवसेना वेळोवेळी दाखवत होती. या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली, मात्र सत्तास्थापनेवेळी दोन्ही पक्ष वेगळे झाले.

आता काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहेत, तर भात आणि शिवसेनेचं नातं चांगलंच बिनसलं आहे. राजकारणात कुणीच कुणाचं कायमस्वरूपी शत्रू नसतं, मात्र जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत.

टीकांचे बाण कदाचित विसरले जातील, पण युतीत असूनही सेनेनं मनमोहन सिंगांचं महत्त्व जाणून केलेलं कौतुक विसरलं जाणार नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.