युती आज झाली असली तरी, ठाकरे-आंबेडकर संबंधांची ही तिसरी पिढी आहे…
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच नवीन समीकरणं पाहायला मिळतात. म्हणजे पहाटेचा शपथविधी असेल, महाविकास आघाडीचा प्रयोग असेल किंवा मग आता शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग असेल… ही सगळी समीकरणं तयार होऊ शकतात असा विचारही शक्यतो कुणी केला नसेल.
पण ठाकरे आणि आंबेडकर हे समीकरण काही नवीन नाही आहे…
१९२६ साली प्रबोधनकार ठाकरे पुण्याहून मुंबईला वास्तव्यास आले होते. दादरमधील वास्तव्यादरम्यान त्यांनी तेथील गणेशोत्सवात भाग घेतला. मात्र त्यावेळी गणेशोत्सवातील एक गोष्ट प्रबोधनकारांना खटकली. झालं असं कि तेथील दलित तरुणांनी आम्हाला गणपतीची पूजा करू द्यावी अशी मागणी केली जी कि, मान्य केली जात नव्हती. साहजिकच त्यावरून तणाव निर्माण झाला.
त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते,
“जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क देण्याचा शहाणपणा गणेशोत्सव कमिटीने दाखविला नाही, तर इथली ही गणपतीची मूर्ती मी स्वतः फोडून टाकीन.”
वातावरण तणावग्रस्त झालं आणि अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं गेलं आणि यावर मार्ग काढण्यात आला. यानुसार गणपतीची शास्त्रोक्त पूजा ब्राम्हण पुजाऱ्याच्या हस्ते झाली आणि एक जेष्ठ दलित कार्यकर्ते मडके बुवा यांनी सर्वांच्या समक्ष लाल गुलाबाचा एक गुच्छ पुजाऱ्याच्या हाती दिला नि त्या पुजाऱ्याने तो टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला.
हे सगळं यथासांग पार पडले मात्र प्रबोधनकार या घटनेमुळे खुश नव्हते. त्यांना ब्राह्मणेतरांना पूजेचा हक्क मिळवून द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी सण निवडला नवरात्रौउत्सवाचा.
पेशवाईच्या अन् त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे, तो उत्सव मागे पडला व लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरुज्जीवनच केले असे प्रबोधनकार ठाकरेंचं मत होते. घटस्थापनेचा मान देखील एका गरीब दलित दाम्पत्याला देण्यात आला. देवीच्या विसर्जनाची मिरवणूकही जोशात आयोजित करण्यात आली. या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सामील झाले आणि त्यांनी तेथे भाषण देखील केलेलं.
प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ बाबासाहेब आंबडेकर यांची याआधी दलितांच्या मुद्यांवर काम करताना संबंध तर होतेच मात्र या प्रसंगामुळे ते अधिकच घट्ट झाल्याचं सांगण्यात येतं. याच संबंधांचा दाखला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी.
गेल्या १५ ऑक्टोबर रोजी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे कुटुंब आणि आंबेडकर कुटुंब यांच्यात तीन पिढ्यांपासून संबंध असल्याचं म्हंटलं होतं. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक उपक्रमांमधे सहभागी झाले होते ,प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा मनस्मृतीचा निषेध केला होता, बाळासाहेबांपासून आत्तापर्यंत शिवसेनेने मनस्मृतीचे समर्थन केलं नसल्याचा उल्लेखही प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्याचबरोबर शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही, त्यामुळं शिवसेनेचं हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचं देखील आंबेडकर म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जवळ येण्याचे संकेत दिले होते.
हे झाले ठाकरे-आंबेडकरांचे संबंध, पण आताच्या राजकारणात शिवशक्ती-भीमशक्तीचं समीकरण परफेक्ट कसं काय बसतंय ते बघुया.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे शिवसेनचं हिंदुत्व प्रबोधनकारांच्या सुधारणावादी हिंदुत्वाच्या दिशेने पिऊनही नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आंबेडकरी चळवळीतुन आलेल्या सुषमा अंधारेंच शिवसेनेत आक्रमकपणे पुढं येणं, त्यानंतर प्रबोधनकार यात्रेचं नेतृत्व अंधारेंकडे देणं यामध्ये प्रकाश आंबेडकरांशी युती परफेक्ट बसते.
त्याबरोबरच शिवसेनेला भाजपच्या हिंदुत्वाशी देखील स्पर्धा करायची आहे.
भाजपच्या हिंदुत्वावर नेहमीच सवर्णाचं हिंदुत्व असा आरोप होत असतो. मात्र शिवसेनवर असा आरोप झालेला नाही. ‘मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपापल्या जातिसमूहांविरुद्ध केलेलं बंड म्हणजेच शिवसेना.’ असं ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेंनी शिवसेनचं वर्णन केलं होतं. त्यामुळे मधल्या काळातल्या नामांतर, रिडल्स प्रकरणातील बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका जरी दलित समाज विरोधी मानल्या गेल्या त्या भूमिका सोडता. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या एकत्र येण्याला तसा कोणता मोठा वैचारिक अडथळा नव्हता.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं महाविकास आघाडीबरोबर असणं.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकासाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष होता. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्यांच्या पडत्या काळात होते. त्यामुळे शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद देखील मान्य करण्यात आलं होतं. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंकडे असलेल्या शिवसेनेत आता फक्त १६ आमदार राहिलेत, आमदारांची संख्या घातल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे उद्या महाविकासा आघाडीच्या बॅनरखाली एकत्र निवडणूक लढवायचं म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या १६ जांगांवरूनच ट्रीट केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मग अशावेळी उद्धव ठाकरे यांच्यापुढे २ ऑप्शन उरतात एक म्हणजे महाविकास आघाडीमध्येच आपली बार्गेनिंग पॉवर वाढवणे आणि दुसरा म्हणजे महाविकास आघाडीमधून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडणे. या दोन्ही ऑप्शनमध्ये प्रकाश आंबेडकरांशी युती सेनेला फायद्याची ठरते.
प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेतल्यानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढण्याबरोबरच वंचितबरोबर युती करून उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यात एक नवीन ऑप्शन म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपबरोबर न जाताही निवडणूक लढवू शकते.
यामागचं कारण म्हणजे, वंचित बहुजन आघाडीची ताकद. २०१८ मध्ये पंढरपूरला झालेल्या धनगर बांधवांच्या मेळाव्याचे अध्यक्षपद स्वीकारून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाया घातला. दलित व ओबीसी या दोन्ही जातिसमूहांना एकत्र आणून सत्तेतील वाटा मिळवण्याचा हा प्रयोग होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत MIM बरोबर आघाडी करून हा प्रयोग तुफान चालला. पहिल्याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४१ लाख मतं मिळवली होती. तब्बल ११ जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने लाखापेक्षा जास्त मतदान घेतलं होतं. पुढे विधानसभा निवडणुकीत जरी वंचित बहुजन आघाडीला हे यश राखता आलं नसलं तरीही वंचितनं २४ लाख मतदान घेतलं होतं. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात जिथं जवळपास ६० जागांवर दलित-ओबेसी मतदान निर्णायक आहे त्यातील २९ मतदारसंघ शेड्युल कास्टसाठी राखीव असतात.
शिवाय, महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सगळ्यात जास्त मदतीची गरज आहे तिथंच म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात प्रकाश आंबेडकरांची ताकद आहे.
अजून एक म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना देखील त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला २०१९ सारखं यश मिळवायला मोठ्या पार्टनरची गरज असणार आहे. २०१९ ला एमआयएमशी वंचित बहुजन आघाडीने युती केली होती. आता मात्र ही युती राहिलेली नाहीये. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी बहुजन वंचित आघाडीवर उघडपणे टीका करण्यास सुरवात केली आहे.
त्यामुळे आता वंचित-MIM ची युती होण्याची शक्यताही मावळल्यात जमा आहे. त्यातच MIMशी युती करून फायदा होत नसल्याचा सूरही वंचितकडून येत होता. त्यामुळे त्यांना एका मोठ्या मित्रपक्षाची गरज असल्याचं लक्षात येतं.
याचवेळी वैचारिक मतभेदांमुळे भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं प्रकाश आंबेडकर यांना शक्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे प्रकाश आंबेडकर मोठे टीकाकार राहिले आहेत. त्यातच या पक्षांकडे गेल्यास छोटे छोटे पक्ष संपतात किंवा कायम तेवढेच राहतात हा इतिहास आहे. अशावेळी उद्धव ठाकरे हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणून समोर येऊ शकतो . कारण उद्धव ठाकरे यांना देखील मित्र पक्षाची तितकीच गरज असणार आहे.
एकंदरीतच, ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांची आणि प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंची तितकीच गरज आहे आणि येत्या काळात राजकारणात हे दोघेही एकमेकांना पूरकही ठरू शकतात. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
हे ही वाच भिडू:
- त्या निवडणुकीत सोमय्या यांच्या काराकिर्दीला ब्रेक लागला आणि ते कट्टर शिवसेना विरोधक बनले
- मुंबईतून शिवसेना कधीच संपत नाही त्यामागं आहे मुंबईतली शिवसेनेची शाखा सिस्टिम
- कम्युनिस्ट शिखरावर असताना जन्मलेली शिवसेना मुंबईत कम्युनिस्टांचा बाजार उठवूनच मोठी झाली