आणि म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना हा खरा पत्रकारितेतून जन्माला आलेला पक्ष. बाळासाहेब पूर्वी फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकारिता करायचे. त्यांचे वडील एकेकाळी प्रबोधन नावाचे साप्ताहिक चालवायचे. याच प्रबोधनमधून केशव ठाकरेंनी समाजातील अन्यायावर कोरडे ओढले. ब्राम्हणेतर चळवळीचे ते नेतृत्व करायचे. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली.

प्रबोधनकारांचे पत्रकारीतेचे आणि राजकारणाचे संस्कार बाळासाहेबांच्या रक्तात वहात होते.

थेट जवाहरलाल नेहरूंपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत अनेकांना त्यांच्या कुंचल्याचा फटका सहन करावा लागला होता. पण पुढे तिथल्या दाक्षिणात्य मालकांनी बाळासाहेबांच्या कामामध्ये ढवळाढवळ करायला सुरवात केली.

फ्रीप्रेस जर्नलमध्ये आपल्या कामावर होत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीमुळे बाळासाहेबांनी एकदिवस नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिला व आपल्या भावासोबत स्वतःच मार्मिक नावाचं व्यंगचित्रसाप्ताहिक सुरु केलं.

बाळासाहेबांची इच्छा होती की आचार्य अत्रे त्याचे संपादक व्हावेत. आचार्य अत्रेची संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे प्रबोधनकारांशी चांगली मैत्री होती. त्यांच्या नवयुग मध्ये मावळा या टोपणनावाने बाळासाहेबांनी अनेकदा व्यंगचित्रे काढली होती.

पण काही कारणानी अत्रेंना मार्मिकशी जोडता आल नाही. मात्र त्यांच्या वाढदिवसादिवशी बाळासाहेबांनी मार्मिक सुरु केले. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते करण्यात आले. काहीच दिवसात मार्मिकने मराठी माणसावर भुरळ घालायला सुरवात केली. त्यात एक शेर ठळकपणे लिहिलेला असायचा.

“खिंचो न कमान को, न तलवार निकालो

 जब तोफ मुकाबील है, तो अखबार निकालो!!”

मुंबईत दाक्षिणात्य लोक नोकरीच्या बाबतीत मराठी मुलांवर प्रचंड अन्याय करत होते. याविरुद्ध बाळासाहेबांनी मार्मिकमधून वाचा फोडली. मार्मिकमध्ये सुरु झालेल्या या लढ्याच शिवसेना नामक वादळात रुपांतर झालं. 

बाळासाहेब पहिले शिवसेनाप्रमुख झाले. त्यांच्या वक्तृत्वाची मोहनी उभ्या महाराष्ट्राला पडली.

त्यांच्या एका शब्दावर मुंबई बंद पाडायची क्षमता होती. अनेक आंदोलने करून त्यांनी मुंबईत हरवत चाललेला  मराठी माणसाचा स्वाभिमान मिळवून दिला. पण याच बरोबर त्यांच्यावर टीका देखील झाली.

आचार्य अत्रे आपल्या मराठा या वृत्तपत्रातून ठाकरे आणि शिवसेना कॉंग्रेसची हस्तक आहे अशी टीका सुरु केली. बाळासाहेब देखील त्यांना आपल्या मार्मिकमधून प्रत्युत्तर देत. पुढे हा वाद इतका वाढला की त्यांनी सभ्यतेची पातळी ओलांडली.

या दोन मोठ्या मराठी नेत्यांचा वर्तमानपत्रातील वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला, अनुभवला.

पुढे शिवसेनेने सक्रीय राजकारणात प्रवेश केला. निवडणुका लढवल्या काही हरल्या काही जिंकल्या.

एकेकाळी फक्त मुंबईपुरती मर्यादित असणारी शिवसेना ऐंशीच्या दशकात राज्यभर हातपाय पसरू लागली. महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष बनू पहात असलेल्या शिवसेनेवर प्रस्थापित पक्षांकडून टीका देखील भरपूर होत होती. गिरणी आंदोलनावेळी शिवसेनेने कामगार विरोधी व मालकांना धार्जिणी भूमिका घेतली आहे अस काही जणांनाच म्हणण होतं आणीबाणीला ठाकरेंनी दिलेल्या पाठींब्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जायच्या.

कम्युनिस्ट नेत्यांवर शिवसैनिकांनी केलेले हल्ले, कॉंग्रेस सरकारचे त्याकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष यामुळे शिवसेनेविरुद्ध काही संघटना आक्रमक झाल्या. समाजवादी विचारसरणी असणारी दैनिके रोज आपल्या वर्तमानपत्रातून शिवसेनेवर टिकेची झोड उठवत होते. 

एकदा दिनांक या वर्तमानपत्राने शिवसेनेवर विशेष अंक काढला होता. त्यात दंगलीचा वापर करून शिवसेनेने गोळा केलेली लुट याबद्दल सविस्तर लेख छापला होता.

तो लेख शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवडला नाही. त्यांनी त्या पेपरच्या संपादकाला म्हणजेच निखील वागळेनां चोप दिला. बाळासाहेबांच्या विरुद्ध बातमी देणाऱ्या पत्रकारांच्या विरुद्ध शिवसैनिकांनी हल्ले सुरु केले.पण यानंतरही बाळासाहेबांवरची टीका पत्रकारांनी थांबवली नाही.

पुढे निखील वागळे यांनी स्वतःचा आपलं महानगर नावाचे सांयदैनिक सुरु केले. तिथूनही त्यांनी शिवसेनेवर हल्ले सुरूच ठेवले. 

शिवसेनेने तोवर हिंदुत्ववादी विचारसरणीचा स्वीकार केला होता. त्याविरुद्ध देखील अनेकजण चर्चा करत होते. रोज होणारी दैनिकातील टीकेला बाळासाहेब मार्मिकमधून प्रत्युत्तर द्यायचे पण मार्मिक हे साप्ताहिक असल्यामुळे त्याला आठवडाभर वेळ जायचा. यामुळे आपल्या जशास तसे उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असणारी शिवसेना मागे पडते की काय याची भीती बाळासाहेबांना वाटत होती.

अखेर त्यांनी आपले अनेक वर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे ठरवले. एक नवीन सांयदैनिक सुरु करायचे जे शिवसेनेचे मुखपत्रही असेल. त्याचे नाव देण्यात आले ,

“दैनिक सामना”

२३ जानेवारी १९८९ रोजी सामनाची सुरवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन प्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले 

“हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल.”

सामनाचे संपादक स्वतः बाळासाहेब असणार होते तर कार्यकारी संपादक म्हणून  अशोक पडबद्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपली भाषा जहाल असेल त्यात ठाकरी स्टाईल असणारच आहे हे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. रोज घडणाऱ्या घडामोडींवर अग्रलेखातून बाळासाहेब आपली भूमिका प्रखरपणे मांडू लागले.

हिंदीमध्येही दोपहर का सामना नावाच वर्तमानपत्र सुरु करण्यात आल.

 अग्रलेखांमुळे सामना संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले. रामजन्मभूमी आंदोलन असो अथवा बाबरी मशीद पडल्यानंतरची दंगल असो, बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि हिंदी, मराठी सामनामधून सगळ्या जगाला पोहचवली.  मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातही बाळासाहेबांची क्रेझ पोहचण्यामागे सामनाचा हात होता.

मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला मात्र सामनाने सेनेला मोठे केले.

पुढे सामनाचा व्याप वाढला. एकदा लोकप्रभा मध्ये छगन भूजबलांनी शिवसेना कशी सोडली याची डिटेल स्टोरी आली होती. बाळासाहेबांनी चौकशी केली की तिचा लेखक कोण आहे? तर तो लेख क्राईम रिपोर्टर असणाऱ्या एका २९ वर्षाच्या तरुणाने लिहिला होता. त्याच नाव  संजय राऊत.

बाळासाहेबांनी ओळखल हा लंबी रेस का घोडा आहे. त्याच्याकडे बाळासाहेबांच्या ठाकरी स्टाईलमध्ये लिहिण्याची क्षमता होती. सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी त्यांनी अजून तिशीही न ओलांडलेल्या संजय राऊतकडे मोठ्या विश्वासाने दिली. त्यानंतर गेली पंचवीस वर्षे संजय राऊत सामनाला एकहाती सांभाळत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.