शिवसैनिकाला हाताशी धरत फडणवीस महाविकास आघाडीचा पुन्हा करेक्ट कार्यक्रम करणार?

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. साबणे यांनी यापूर्वी याच मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

देगलूर विधानसभेसाठी ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. साबणे यांनी नुकतेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ते भाजपचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं होतं.

मात्र यामुळे प्रश्न पडतो कि,

आता आणखी एका शिवसैनिकाला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचा दुसऱ्यांदा करेक्ट कार्यक्रम करणार का ?

कारण यापूर्वी एप्रिल-मे महिन्यामध्ये पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने कधीकाळी शिवसैनिक असलेल्या समाधान आवताडे यांना उमेदवारी देत तिथं विजय मिळवला होता. त्यावेळी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर इथं निवडणूक जाहीर झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालकेंचा मुलगा भगीरथ भालके यांना रिंगणात उतरवलं होतं, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

यात समाधान आवताडेंचा विजय झाला होता. यामागे देवेंद्र फडणवीस यांचा ब्रेन आणि त्यांची रणनीती यशस्वी ठरली असल्याचं बोललं गेलं होतं.

पोट निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय :

सर्वसामान्यपणे भाजपकडून मृत्यू झाल्यानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जात नव्हती. यात काही उदाहरण बघायची म्हंटलं तर २०१५ आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावमध्ये भाजपनं उमदेवार दिला नव्हता. तिथून सुमनताई पाटील बिनविरोध निवडून आल्या होत्या.

त्यानंतर २०१८ मध्ये पलूस कडेगावमध्ये काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पोट निवडणूक जाहीर झाली होती. तिथं देखील भाजपनं आधी उमेदवार दिला आणि शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे ती पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती.

मात्र २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंढरपूरमध्ये भाजपनं उमेदवार दिला, आणि मुख्य म्हणजे पूर्ण ताकदीनं प्रचार करून ती प्रतिष्ठेची बनवली आणि जिंकली देखील होती. आता परत एकदा भाजपने देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे.

सुभाष साबणे कोण आहेत?

सुभाष साबणे यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते आधी मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं होते.

मात्र आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले, आणि ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. साधारण मे महिन्यामध्येच साबणे यांनी इथल्या पोटनिवडणुकीत तिकीट देण्याची पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली होती. अन्यथा भाजपचा झेंडा हातात घेण्याचा इशारा देखील दिला होता. 

मात्र हि जागा काँग्रेसकडे आहे. आता महाविकास आघाडीकडून ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर भाजपने सुद्धा शिवसैनिकाला तिकीट देऊन या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी असल्याचा इशारा दिला आहे. मात्र यामुळे आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत बसणार का? कि महाविकास आघाडी जागा राखणार हे बघणं महत्वाचं आहे.

अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला…

नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे अंतापूरकर काँग्रेसचे आमदार असल्यानं जागा कायम राखण हे चव्हाण यांच्यापुढे एक मोठे आव्हान असणार आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?

राज्यातील मतदारसंघाच्या पुनर्रचनेवेळी २००९ मध्ये देगलूर बिलोली हा मतदारसंघ राखीव झाला आणि पहिल्याच निवडणुकीत २००९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष साबणे विजयी झाले. तर दोन वर्षापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले. अंतापूरकर यांनी २००९ आणि २०१९ मध्ये साबणे यांचा पराभव केला तर साबणे यांनी २०१४ मध्ये अंतापूरकर यांचा पराभव केला होता.

सध्याच्या घडीला काॅंग्रेसकडून दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला उमेदवारी दिला जाणार अशी जोरदार चर्चा आहे. तर साबणे ३ वेळा आमदार असल्यामुळे त्यांची ताकद मोठी असणार हे नक्की. मात्र यामुळे आणखी एक गोष्ट इथं समोर येत आहे ती म्हणजे महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढत राहिले तर तिन्ही पक्षातील नाराजांना न्याय कसा देणार?

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.