मुंबई महापालिकेत भाजपला फाईट देण्यासाठी शिवसेनेचं ‘मिशन १५०’

निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली रे झाली की, प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी वेगवेगळे ॲक्शन प्लॅन तयार करतो. असेच काही ऍक्शन प्लॅन मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाची धुरा आदित्य ठाकरे सांभाळणार आहेत. सेनेचा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा मानस आहे त्यासाठी या सेनापतींनी ॲक्शन प्लॅन तयार केलाय.

या ऍक्शन प्लॅनचं नाव आहे ‘मिशन १५०’

आदित्य ठाकरेंनी निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केलीय. कोणत्याही परिस्थितीत भाजपला शह देण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा त्यांचा नवा प्लॅन असल्याचं बोललं जातंय.

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्याची सत्ता हाती घेतल्यानंतर नाराज झालेल्या भाजपने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी कंबर कसली असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार. त्यात उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असल्याने ते राज्याच्या जबाबदारीत बिजी आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून ते या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावणार असले, तरी युवा नेतृत्वाला संधी देत आदित्य यांच्या खांद्यावर निवडणुकीचे व्यवस्थापन, रणनीती, प्रचार आणि प्रामुख्याने उमेदवारांची निवड यासंदर्भातील जबाबदारी सोपवली जाणार आहे.

आदित्य ठाकरे सध्या पर्यावरण व पर्यटनमंत्री तर आहेतच पण ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांनी मुंबईतील बऱ्याच विकासकामांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

यात मिठी नदी प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न, अशी कामे आदित्य ठाकरे जातीने लक्ष घालून करून घेत आहेत. राज्यात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणच्या तयारीत ते पुढाकार घेत आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाचे नगरसेवक, आमदार, विभागप्रमुख यांच्या बरोबर बैठका करताना दिसत आहेत.

ऍक्शन प्लॅन मध्ये नक्की आहे तरी काय ?

सध्या महापालिकेत शिवसेनेचे ९७ नगरसेवक आहेत. या ९७ वॅार्डाच्या व्यतिरिक्त शिवसेना ४० ते ५० वॅार्डावर काम करत आहे. मागच्या निवडणुकीत २३ उमेदवार हे हजार मतांच्या आत पराभूत झाले होते. त्यापैकी १८ उमेदवार हे मुंबई उपनगरातले आहेत. त्यात आणि योगायोग असा की, आदित्य ठाकरेही उपनगरचे पालकमंत्री आहेत. या १८ वॅार्डांत आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम जास्त काम करत आहेत.

मुंबई उपनगरात डीपीडीसी माध्यमातून जास्तीत जास्त नागरी सेवा पुरवणे, वॅार्ड निहाय विकास आराखडे तयार करून ते लवकरात लवकर पुर्णत्वास नेण्यावर सध्या भर दिला गेला आहे. हे झालं फक्त उपनगराबाबतीत पण आदित्य ठाकरें बीएमसीच्या वॅार्ड अधिकाऱ्यांपासून ते आमदार आणि शाखाप्रमुखांच्या माध्यमातून
वॅार्डावॅार्डावर नजर ठेऊन आहेत.

शंभरीचा आकडा पार करून स्वबळावर पालिकेवर भगवा फडकवण्याचं आदित्य ठाकरेचं स्वप्न आहे. या २३ वॅार्डाशिवाय २० वॅार्ड असे आहेत जे मागच्या वेळेस काही कारणांमुळे थोडक्यात गेले होते. बंडखोरी, उमेदवार देण्यात गडबड, वॅार्ड रचना इत्यादी कारणांमुळे शिवसेनेने २० जागा गमावल्या होत्या.

मागच्या वेळेची कसर यंदा भरून काढण्यावर टीम आदित्यचा जोर आहे. जे ९७ वॅार्ड ताब्यात आहेत त्या नगरसेवकांशी डायरेक्ट चर्चा, आमदार आणि खासदारांच्या मार्फत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे. प्रत्येक वॅार्ड निहाय आधी केलेल्या विकासकामांचे उद्धाटन सोहळे, वॅार्ड अधिकाऱ्यांमार्फत विकास कामंचं व्हिजन तसेच ते पूर्ण करून घेण्यावर भर आहे.

महापालिकेच्या विविध वॅार्डांमध्ये नगरसेवकांच्या काय अडचणी आहेत, हे समजून घेत आहेत. याशिवाय विभागप्रमुखांच्या संपर्कात राहून आमदारांच्या अडचणी समजून घेण्यावर भर देतानाच त्यांनी संघटनेच्या मोर्चेबांधणीलाही महत्त्व दिले आहे. निवडणुका आल्या की नाराजी वाढते, हे लक्षात घेऊन आधीपासूनच संपर्क वाढवण्यास सुरुवात केली.

यापूर्वी युवासेनेचे प्रमुख म्हणून आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विद्यापीठ व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढवल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी शिवसेनेने दमदार कामगिरी केली. आदित्य यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत अनेक युवा चेहरे सक्रिय झाले आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत त्याचाही पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने आतापर्यंत तीन ते चार सर्व्हे केले आहेत. त्यामध्ये शिवसेना १०० च्या वर जाते असं चित्र आहे. पण आदित्य ठाकरेंचं सुरुवातीपासून महापालिकेसाठी मिशन १५० राहिलं आहे. तेव्हा आदित्य ठाकरेंचा ॲक्शन प्लॅन यशस्वी होणार का? हे लवकरच कळेल.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.