सत्यजित तांबेंना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कोणता प्लॅन केलाय?

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूका होणार आहेत. आता या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी संपलाय. हा कालावधी संपता संपता मात्र राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं.

खासकरून नाशिक पदवीधर मतदारसंघातली लढत जास्त चर्चेत आहे.

त्यामागचं कारणही तसंच आहे. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे आमदार होते. यंदाही पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी अर्ज भरला असता तर, ही निवडणूक पार पडली असती आणि इतकी चर्चेतही आली नसती. त्यात व्यत्यय असा आला की, सुधीर तांबे यांचे सुपूत्र सत्यजीत तांबे हे २०११ पासुन युवक काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.

इतकी वर्ष पक्षात काम केल्यामुळे सहाजिकच आमदार बनण्याची त्यांची महत्वकांक्षा होती. असं असुनही पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे, डॉक्टर सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही तर, सत्यजीत तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज भरला. असं केल्यामुळे त्यांनी एकप्रकारे काँग्रेसविरूद्ध बंडच पुकारलंय.

हे सगळं काही फडणवीसांच्या प्लानिंगनुसार झालं आणि हा फडणवीसांचाच मास्टर स्ट्रोक होता असं ही बोललं जातंय.

त्यानंतर काँग्रेस सत्यजीत यांना पाठिंबा देणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जाहीर केलं. तर, दुसरीकडे भाजपकडून सत्यजीत यांना पाठिंबा मिळणार असं चित्र तयार झालंय. तर, काँग्रेसकडून कुणीच फॉर्म भरलेला नाही.

ही सगळी परिस्थिती बघुन तांबे यांचा या मतदार संघातून सहज विजय होईल अशा चर्चा सुरू होत्या. पण, इथंच खरी गोष्ट सुरू झाली. या सगळ्या रणधुमाळीत आणखी एक नाव समोर आलं, ‘शुभांगी पाटील’.

या शुभांगी पाटील कोण आहेत ते बघुया.

तर, शुभांगी पाटील या मुळात महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून काम करत होत्या. असं असताना २०२२ मध्ये २२ सप्टेंबर रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता या मतदार संघातून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती.

असं असताना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत मात्र, भाजपकडून कुणालाच उमेदवारी देण्यात आली नव्हती, भाजपचे नेते त्या ठिकाणी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन आलेले मात्र त्यांनी फॉर्म कुणालाही दिला नाही. त्यामुळे मग शुभांगी पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा अर्ज भरल्यानंतर भाजपकडून समर्थन मागू असा त्यांचा विचार होता. झालं मात्र उलटंच. भाजपच्या समर्थनाचं माप सत्यजीत तांबे यांच्या बाजुला झुकताना दिसताच त्यांनी दुसरा प्लॅन बाहेर काढला.

शुभांगी पाटील यांनी समर्थन मागण्यासाठी थेट मातोश्रीवर संपर्क केला.

शुभांगी पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा मागितला आणि ठाकरेंच्या शिवसेनेनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सध्याचं असलेलं वैर लक्षात घेतलं तर, भाजपने एका उमेदवाराला पाठिंबा दिलाय म्हटल्यावर शिवसेना भाजपला आव्हान देण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार अशी चर्चा आधीपासूनच होती. विशेष म्हणजे मतदार संघातील सगळ्या उमेदवारांंध्ये शुभांगी पाटील या एकमेव महिला उमेदवार आहेत.

शुभांगी पाटील यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी घराणेशाहीला टार्गेट केलं. त्या म्हणाल्या,

“राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा”

शुभांगी पाटलांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत अजून स्पष्टता नाही.

शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला असला तरी, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा आहे की नाही याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. असं असलं तरी, सकाळपासूनच तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत आणि सुरू असलेल्या चर्चांनुसार महाविकास आघाडी लवकरच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करेल.

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर हे पाच जिल्हे आणि ५४ तालुके या मतदार संघात येतात. आताच्या घडीला या मतदार संघातूम २२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.