आपल्या फॅमिली डॉक्टरला बाळासाहेबांनी मुंबईचा महापौर बनवलं होतं…

१९६६ मध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी बेरोजगार तरुणांना एकत्र करून मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत वाढलेल्या कम्युनिस्ट कामगार चळवळीवर वचक राहावा यासाठी शिवसेना वाढेल याकडेच त्यांचे प्रयत्न असायचे. त्यामुळे सुरवातीपासून बाळासाहेबांनी उजव्या विचारसरणीचा थेट पुरस्कार केला होता. यातून आक्रमक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित झाला.

त्यानंतर शिवसेनेने थेट निवडणुकांच्या मैदानात उतरायचा निर्णय घेतला. मात्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अशी ओळख असलेल्या शिवसेनेची खरी राजकीय एन्ट्री ही १९६७ साली झाली. १९६७ मध्ये ठाणे नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने लढवली आणि शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष झाला. 

त्यानंतर शिवसेनेला मिळालेले पहिले महत्त्वाचे राजकीय पद म्हणजे मुंबईचे महापौरपद. १९७१ साली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. हेमचंद्र गुप्ते महापौरपदी निवडून आले होते. हेमचंद्र गुप्ते यांची प्रमुख ओळख सांगायची तर ते एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचे फॅमिली डॉक्टर होते.

मात्र हेच हेमचंद्र गुप्ते हे त्यावेळी अपक्ष निवडून आले होते, तरी देखील ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले होते.

डॉ. हेमचंद्र गुप्ते हे नाव त्याकाळी ना शिवसैनिकांना नवीन होते. ना दादर भागाला. डॉ. गुप्ते यांचा तेव्हा दादरच्या सुप्रसिद्ध खांडके बिल्डिंगमध्ये दवाखाना होता आणि प्रदीर्घ काळापासून ते ठाकरे कुटुंबीयांचे ‘फॅमिली डॉक्टर’ होते. स्वतः गुप्ते यांनी याबाबत आठवण सांगितली आहे. यादरम्यान त्यांनी अगदी प्रबोधनकरांच्यावर देखील उपचार केले होते.

सोबतच श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे शाळकरी विद्यार्थी असल्यापासून आपल्या दवाखान्यात येऊन औषध घेऊन जायचे. अगदी ही दोन्ही भावंडं मोठी झाल्यानंतर देखील डॉ. गुप्ते यांचं बाळासाहेबांकडे येणं-जाणं असायचे.

या दरम्यान १९६७ साली ठाण्याचा किल्ला सर केल्यानंतर १९६८ साली मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा झाली.

त्यावेळी शिवसेनेत दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी तसेच प्रमोद नवलकर यांच्या रूपाने, वक्त्यांची दमदार फळी जोमाने उभी ठाकली होती. सोबतच डॉ. गुप्ते देखील पक्षात सक्रिय झाले होते. एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे ज्या काही मोजक्या नेत्यांच्या बोलण्या-वागण्याचा थोडा फार आदर करत असतील त्या नेत्यांच्या यादीत डॉ. गुप्ते यांचं नाव अग्रक्रमावर होते.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या प्रजा समाजवादी पक्षाची युती झाली होती. मधू दंडवते आणि ना.ग. गोरे हे त्या पक्षाचे नेते होते. 

मात्र त्या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या डॉ. गुप्ते यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी डॉ. गुप्ते यांचा दादरमधील अनेक सामाजिक तसंच सांस्कृतिक संस्थांशी संबंध होता आणि दादर- माहीम परिसरातील जनता त्यांच्याकडे आदरानं बघत असे.

डॉ. गुप्ते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्यावर, ठाकरे स्वत: त्यांच्या घरी आले आणि सेना-प्रसोपा युतीचे उमेदवार व्हा, अशी त्यांना विनंती केली; पण डॉ. गुप्ते यांनी त्यांना नकार दिला.

मात्र अखेर डॉ. गुप्ते अपक्ष म्हणून मुंबई महापालिकेवर निवडून आले.

सोबतच दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी तसेच प्रमोद नवलकर हे बाळासाहेबांचे प्रमुख चार शिलेदार देखील तेव्हा मुंबई महापालिकेवर निवडून आले. त्यावेळी शिवसेनेने ४२ जागा जिंकल्या होत्या. मात्र यानंतर देखील बाळासाहेब ठाकरे यांना डॉ. गुप्ते यांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे प्रा. सदानंद वर्दे यांना घेऊन डॉ. गुप्ते यांच्या घरी गेले आणि अखेर डॉ. गुप्ते शिवसेनेत दाखल झाले.

त्यावेळी मुंबई महापालिकेतील शिवसेना गटाचं अधिकृत नेतृत्व हे त्यांच्याकडे नसलं, तरी शिवसेना प्रजा समाजवादी पक्ष युतीचे सर्वच नगरसेवक त्यांच्या मताचा आदरानं विचार करत असायचे. पुढे सेनेनं महापौर पदाची निवडणूक पहिल्यांदा लढवायची ठरवली. तेव्हाही डॉ. गुप्ते यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ बाळासाहेबांनी घातली आणि डॉ. गुप्ते हे सेनेचे पहिले महापौर झाले.

मात्र पुढे १९७७ मध्ये महापौरपदासाठीच सोहनसिंग कोहली या समाजवादी कार्यकर्त्यास पाठिंबा देण्याचा शब्द ठाकरे यांनी अचानक फिरवला असा दावा डॉ. गुप्ते यांनी केला. त्यावेळी काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्या पाठीशी शिवसेना उभी करण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. त्याच क्षणी डॉ. गुप्ते यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. पुढे याच गुप्ते यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर विधानसभेला मनोहर जोशी यांचा पराभव केला होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.