पहिल्यांदा युती नेत्यांनी नाही तर कार्यकर्त्यांनी घडवून आणली होती..

शिवसेना आणि भाजप. खरे तर समविचारी पक्ष. जवळपास पंचवीस वर्षे त्यांची युती गाजली. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या युतीचा शेवट २०१९ साली झाला. एवढी वर्षे चाललेली त्यांची भावकी मुख्यमंत्रीपदावरून तुटली आणि आता एकदम कडक भाऊबंदकी सुरु झालीय.

ऐंशीच्या दशकात जरी या युतीची अधिकृत सुरवात झाली असली तरी एक निवडसून अशी झाली होती जेव्हा संघाचे स्वयंसेवक आणि शिवसैनिक यांच्या पातळीवरच अनधिकृत युती होऊन काँग्रेसला पाडण्यासाठी कार्यकर्ते एकमेकांच्या खडण्याला खांदा लावून लढले होते.

साधारण १९६६ मध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी बेरोजगार तरुणांना एकत्र करून मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. खर तर या पक्षाला काँग्रेसच्या काही नेत्यांचा आतून पाठिंबा होता. मुंबईत वाढलेल्या कम्युनिस्ट कामगार चळवळीवर वचक राहावा यासाठी शिवसेना वाढेल याकडेच त्यांचे प्रयत्न असायचे.

मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे आणि बाळासाहेबांचे संबंध इतके चांगले होते की काही विरोधक शिवसेनेला कुत्सितपणे वसंतसेना देखील म्हणायचे.

मात्र सुरवातीपासून बाळासाहेबांनी उजव्या विचारसरणीचा थेट पुरस्कार केला होता. हिंदुत्व त्यांच्यासाठी तेव्हा अग्रक्रमाचा विषय नव्हता पण शिवरायांनी स्थापन केलेली हिंदूपदपातशाही आपण परत आणणार याचा पुनरुच्चार ते आपल्या भाषणातून करायचे. डाव्या संघटनाशी थेट भिडायचा आदेश त्यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला होता. यानिमित्ताने उजव्या विचारसरणीच्या जनसंघ, हिंदू महासभा यांची शिवसेनेप्रती आपुलकी दिसून येऊ लागली.

युती या शब्दाचा पहिला उल्लेख बाळासाहेबांनी जून १९७० साली दैनिक मराठाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला.

झालं असं होत की संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी एके ठिकाणी वक्तव्य केलं होतं की,

” बाळासाहेब ठाकरे हे जनसंघ व शिवसेना एकत्र यावी यासाठी मला भेटले होते.”

याच संदर्भाला धरून एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनाप्रमुख म्हणाले,

“गोळवलकर गुरुजी यांनी दिलेल्या मुलाखतीत तथ्य नाही. गुरुजी मुंबईत आले असताना त्यांनी प्रबोधनकारांची त्यांच्या आजारपणात भेट घेतली होती. मी दोन वर्षापूर्वी नागपूर येथे गेलो तेव्हा त्यांची सहज भेट घेतली होती. या भेटीत राजकीय “युती” चा उल्लेख नव्हता. आम्हा दोघांची सर्वसाधारण राजकीय परिस्थिती वर बोलणी झाली होती. युती व्हायची ती जाहीरपणे होईल. त्यात घाबरण्याचे कारण काय?”

इथून पहिल्यांदा युतीची चर्चा सुरु झाली. या मुलाखतीमध्ये सुद्धा कळेल की अगदी पहिल्यापासून बाळासाहेबांनी जनसंघावर(पूर्वाश्रमीचा भाजप) वजन ठेवूनच बोलणी चालू ठेवली होती. वामनराव महाडिकांच्या विजयात जनसंघाने मदत देखील केली पण पुढे युती काय प्रत्यक्षात आली नाही.

इतकेच काय तर काँग्रेसला मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या धोरणामुळे जनसंघ आणि त्यांचे नेते शिवसेनेपासून फटकून राहू लागले.

१९७२ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या.

नुकताच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली होती. त्यांची लोकप्रियता गगनाला जाऊन पोहचली होती. इतर पक्ष जाऊद्या काँग्रेसमधल्या विरोधकांना चारी मुंड्या चित करून देशातील एकमेव आणि सर्वव्यापी नेतृत्व म्हणून त्या समोर आल्या. पक्षातल्या जुन्या व बड्या धेंडांना त्यांनी पद्धतशीरपणे बाजूला केलं होतं.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत देखील त्यांचाच बोलबाला होता. आमदारकीचं तिकीट देताना तरुणांना आणि महिलांना संधी द्या असे आदेश त्यांनी सोडले होते. इंदिरा गांधींच्या नावावर दगड जरी उभा राहिला तरी तो निवडून येणार अशी खात्री दिली जात होती.

मुंबईत गिरगावमध्ये काँग्रेसने यमुनाबाई खाडिलकरांना तिकीट दिलं. काँग्रेसच तिकीट म्हणजे विजय पक्का असा समज असल्यामुळे विरोधकांची विशेष अशी काही तयारी नव्हती. फक्त फॉरमॅलिटी म्हणून उमेदवार दिले जायचे. गिरगावात शिवसेनेने प्रमोद नवलकरांना तिकीट दिल होतं.

नवलकर तरुण होते. आमदारकी जिंकावी असं विशेष मोठं प्रस्थ नव्हतं. पण नवलकर मोठ्या जिद्दीने उतरले. नव्याने तळपणाऱ्या शिवसैनिकांची ताकद त्यांच्या पाठीशी होती. बाळासाहेबांची भाषणं गाजू लागली. प्रमोद नवलकर देखील कोपऱ्यावरच्या सभा देखील रंगवू लागले होते.

महाराष्ट्रात इतर उमेदवार काँग्रेस विरुद्ध डिपॉजिट कशी वाचवायची याची चिंता करत असताना गिरगाव मध्ये मात्र नवलकर यमुनाबाईंना जोरदार टक्कर देत होते.

एक दिवस अचानक संध्याकाळी त्यांच्या घरी जनसंघाचे रामभाऊ नाईक यांचं आगमन झालं. नवलकरांना आश्चर्य वाटलं. कारण शिवसैनिक आणि जनसंघाचे अकार्यकर्ते यांच्यातून विस्तव देखील जात नव्हता. नाक्यानाक्यावर त्यांची भांडणं फेमस झाली होती. असे असूनही चक्क राम नाईक निवडणुकीच्या तोंडावर आपल्या भेटीसाठी का आले असावेत हा प्रश्न नवलकरांना पडला.

त्या रात्री राम नाईक नवलकरांना म्हणाले,

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही आला पाहिजे. भले आपले कितीही मतभेद असले तरी आम्ही तुम्हाला सक्रिय पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे.

प्रमोद नवलकरांनी  डोलावली पण त्यांना हे काही खरंच घडेल यावर विश्वास नव्हता. दोन कट्टर शत्रू एकत्र येण्याची शक्यता नव्हती आणि वरून तसे आदेश आले नसल्यामुळे हा चमत्कार घडण्याची सूत्रं शक्यता नव्हती.

पण दुसऱ्याच दिवशी तो चमत्कार खरोखर घडला. राम नाईक आपल्या कार्यकत्यांसह झाडून प्रचाराला उतरले. जनसंघाचे लोक शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते. गिरगाव मध्ये हे अनोखं दृश्य पहिल्यांदा पाहायला मिळत होतं.

नवलकर म्हणतात,

“रामभाऊंनी स्वतःहून आयत्यावेळी माझे मनोधैर्य वाढवले. शिवसैनिकांनी अफाट मेहनत तर घेतलीच होती पण रुक्मिणीच्या तुळशीपत्राप्रमाणे जनसंघाचा पाठिंबा मला फार उपयोगी पडला. “

निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या. काटे कि तटकरे म्हणून गिरगाव विधानसभेला पाहिलं गेलं. इंदिरा गांधी स्वतः मुंबईत प्रचाराला येऊन गेल्या. संपूर्ण देशात त्यांची हवा होती. पण मुंबईत गोरेगाव आणि गिरगाव येथे काँग्रेसचे दोन उमेदवार पडले.

प्रमोद नवलकरांनी यमुनाबाई खाडिलकर यांना अवघ्या आठशे मतांनी पाडलं. जनसंघ आणि शिवसेना यांच्या या कार्यकर्ता पातळीवरच्या युतीचा हा चमत्कार होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.