चित्रपटसेना, कामगार सेना, युवा सेना अशा सेनेसोबत या ७ संघटनांची फुट देखील अटळ आहे

शिवसेना कोणाची यावरून एक वेगळाच राडा आत्ता समोर उभा राहणार आहे. पण हा राडा फक्त विधीमंडळापुरता मर्यादित राहिल असही बोललं जातय. पण नक्की विधीमंडळापुरताच हा राडा मर्यादित राहिल का? तर याचं उत्तर देखील संमीश्र असच आहे..

कारण काय तर अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख हे कोणत्या ना कोणत्या नेत्याने निवडलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत फुट अटळ आहे. फक्त ही फुट कुठपर्यन्त जाईल यांचे अंदाजच बांधले जातायत.

त्यातलाच एक अंदाज म्हणजे संघटनांमध्ये पडणारी फूट, कारण शिवसेना फक्त एक पक्ष नाही तर त्याच्यासोबत सेनेच्या चित्रपट संघटना, कामगार संघटना, वहातूक संघटना अशा अनेक संघटना आहेत. व त्यामध्ये कशी फूट पडेल आणि किती संघटना आहेत हे पाहणं महत्वाचं ठरतं. क्रमवार पद्धतीने आपण याच संघटना किती आहेत व यावर कोणत्या नेत्याचा प्रभाव आहे हे पाहणार आहोत..

युवासेना: 

युवसेना ही महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींच्या हक्कांसाठी काम करणारी शिवसेनेचीच एक उपशाखा आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आहेत. याची स्थापना २०११ साली केली गेली. पूर्वीपासून जशा शिवसेनेच्या गावा गावात शाखा असायच्या तशाच काही प्रमाणात आता युवा सेनेच्या सुद्धा शाखा गावोगावी उभ्या राहताना दिसतात. 

तरुण तरुणींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्यात नोकरी महोत्सव, मैदानी खेळांच्या स्पर्धा, वृक्ष लागवड असे विविधांगी उपक्रम युवसेना राबवत असते. 

तसेच महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ याबद्दल केंद्रसरकार विरोधात युवासेनेकडून बरीच आंदोलनं करण्यात आली आहेत.

शिवसेना महिला आघाडी : 

सुरूवातीला मर्दांची संघटना  म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिवसेनेत महिला नव्हत्या, परंतु 1993 च्या दंगली  नंतर बाळासाहेबांना महिलांची ताकद काय असते ते कळून आले. आणि त्यांनी शिवसेना महिला आघाडीची स्थापना केली. महिला आघाडीच नेतृत्व मीनाताई ठाकरे करायच्या. आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मि ठाकरे या महिला आघाडीचं नेतृत्व करतात. 

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला आघाडीच्या महिला उतरु लागल्या. शिवसेनेची कितीतरी आंदोलनं महिलांनी यशस्वी केली. आजही शिवसेनेवर जेव्हा कधी संकट येतं किंवा कुठलही आंदोलन करायचं असतं त्यावेळी त्यात महिलांचाच पुढाकार असतो. 

मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर या सुद्धा शिवसेना महिला आघाडीच्याच कार्यकर्त्या आहेत.

भारतीय चित्रपट सेना:

भारतीय चित्रपटसेना ही शिवसेनेची एक अधिकृत संघटना आहे जी भारतीय चित्रपतसृष्टीत काम करणार्‍या कामगारांच्या समस्यांवर काम करते. ही स्वतंत्र संघटना स्थापन होण्याच्या आधी देखील शिवसेनेत चित्रपटसृष्टी संबंधित कामे होत असायची. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय चित्रपट सेनेची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली. आदेश बांदेकर हे सध्याचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.

भारतीय चित्रपट सेना ही चित्रपट, नाट्य, टेलिव्हीजन आणि केबल्स संदर्भात काम करणार्‍या सर्व कामगारांच्या प्रश्नांसाठी निर्माण करण्यात आली होती. त्यांनी वेळोवेळी या क्षेत्रातील कामगारांवर होणार्‍या अन्यायाल वाचा फोडण्यासाठी काम केले. 

चित्रपट सेनेच्या पाठपुराव्याने उशिरा सुटणार्‍या कामगारांसाठी पहाटे 2 ला बस सुरु करण्यात आल्या होत्या 

मनोरंजन नगरीचे सर्वात मोठे काम मुंबईतून चालते. सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्र, पहाट शूटिंगसाठी कोणतीच फिक्स वेळ नसते. या वेळांशी जुळवून काम करताना तंत्रज्ञ आणि कामगार वर्गाची तारांबळ होते. पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांना कामाची विशिष्ट वेळ नसते . त्यांना अनेक रात्री सेटवर पडून काढाव्या लागतात. पडद्यामागच्या कलावंतांची ओढाताण संपविण्यासाठी शिवसेना चित्रपट सेनेने पुढाकार घेतला होता.

या कामगारांसाठी शिवसेना चित्रपट सेनेच्या प्रयत्नांमुळे गोरेगावची दादासाहेब फाळके चित्रनगरी तसेच मढहून दररोज पहाटे अडीच वाजता बेस्टच्या बसेस सुटू लागल्या सी-१ आणि सी-२ या क्रमांकाच्या या दोन बस वडाळा आगारापर्यंत धावतात. 

लता मंगेशकर यांच्या अपमानामुळे सोनी चॅनेलला दिला होता आंदोलनाचा ईशारा:

2011 साली सोनी चॅनेलवरील कॉमेडी शो कार्यक्रमात कृष्णा आणि सुदेश या कलाकारांनी भारतरत्न लता मंगेशकर यांची खिल्ली उडविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेच्या वतीने मालाड येथील चॅनेलच्या ऑफिसवर धडक मारण्यात आली.

लतादीदींची कार्यक्रमातील नक्कल न थांबविल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चित्रपटसेनेने दिला. त्यावेळी झालेल्या चर्चेत चॅनेलने हा प्रकार त्वरित थांबविण्याचे मान्य केले.

शिव वाहतूक सेना:

शिव वाहतूक सेना ही शिवसेनेची एक अधिकृत संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात काम करणारे चालक, कर्मचारी यांच्या समस्यांवर काम करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. यात मुख्यत: रिक्षाचालक टॅक्सीचालक यांच्या समस्यांवर काम केले जाते. 

भारतीय कामगार सेना : 

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांच्या हक्कासाठी भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली होती. मजुरीचे दर, कामाचे तास, कामाची पद्धत इत्यादि गोष्टींमध्ये कामगारांची पिळवणूक होऊ नये यासाठी संघटनेतील कामगार एकत्र येऊन त्याविरोधात लढा देतात. 

शिवसेनेचे उपनेते खासदार अरविंद सावंत हे सध्या कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. 

भारतीय विद्यार्थी सेना :

भारतीय विद्यार्थी सेना ही शिवसेनेची अधिकृत विद्यार्थी विंग आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यावर काम करणारी ही संघटना आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचं काम आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालतं.महाविद्यालय आणि  विद्यापीठातील वेगवेगळ्या आंदोलनात ही संघटना सहभाग घेत असते. 

महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना :  

महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना ही शिवसेनेचीच एक विंग माथाडी कामगार यांच्या काळ्यांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. या संघटनेचे अध्यक्ष निलेश भोसले आहेत.

वेगवेगळ्या कंपन्या, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ इत्यादि ठिकाणी माथाडी काम करणार्‍या कामगारांच शोषण होऊ नये त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवा म्हणून ही संघटना काम करते. 

अशाप्रकारे या संघटनांनी आणि सामान्य शिवसैनिकांनी ही शिवसेना जीवंत ठेवलीये. सध्या शिवसेनेवर आलेलं हे मळभ लवकरच दूर होईल आणि पुन्हा एकदा या संघटनांच्या बळावर शिवसेना उंच भरारी घेईल, असं बोललं जातंय.

हेही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.