खरंच शिवसेना सेक्युलर बनत चालली आहे का ?

काल मुंबईमधील शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी ‘अजान पठण’ स्पर्धा आयोजित केली आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर सेक्युलर झाल्याचे विरोधकांनी म्हणायला सुरुवात केली.

तसे तर शिवसेनेवर मागील वर्षभरापासून हिंदुत्ववादी बाणा सोडल्याच्या टिका अनेकदा भाजपकडून केली गेली. त्यामुळे कालची देखील टीका करण्याची संधी सोडलीच नाही.

भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर टिका करताना म्हणाले,

“शिवसेना नेत्यांचे ‘अजान’ पठण स्पर्धेबाबत वक्तव्य म्हणजे सत्तेनंतर बदललेले शिवसेनेचे स्वरूप स्पष्ट करणारे आहे.”

देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेने हिंदूत्व सोडल्याची टिका केली. त्याचसोबतच भाजपकडून विविध नेते अनेकदा अशा टिका करत असल्याचे दिसून येते.

पण त्याआधी विरोधक आणि भाजप म्हणते तसे खरचं शिवसेना बदलली आहे का ? बाळासाहेबांच्या काळात शिवसेना कशी होती आणि हिंदूत्वाचा पुरस्कार कसा करत होते हे पाहणे गरजेचे आहे.

सुरुवातीपासून प्रवास…

शिवसेनेची स्थापना झाली ती मुळात मराठी माणूस आणि भुमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात या मुद्द्यावर. त्यानंतर बाळासाहेबांनी गुजराती, तमिळ लोकांना मिळणाऱ्या नोकऱ्यांविरोधात आंदोलन सुरु केले.

त्यावेळी पक्षामध्ये हिंदूत्वाचा कोणताही मुद्दा नव्हता. किंवा तत्कालीन जनसंघ, हिंदू महासभा या हिंदुत्ववादी पक्षांमध्ये कोणताही नेता नव्हता. याउलट त्यावेळी शिवसेनेची ओळख कॉंग्रेसचे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची ‘वसंत सेना’ अशी होती.

पण त्यानंतरच्या १० -१२ वर्षांमध्ये पक्षाचे स्वरुप हळू हळू बदलू लागले होते. ८० च्या दशकातील हवा हिंदूत्वच्या बाजून वाहू लागली होती. याचे कारण होते विश्व हिंदू परिषदेने हाती घेतलेले राम मंदिराचे आंदोलन.

बाळासाहेब ठाकरेंनी देखील हे हवेचे बदलेले स्वरुप ओळखले आणि १९८५ च्या दरम्यान हिंदूत्वाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. याची पहिली झलक होती औरंगाबादच्या कत्तल खाण्याचा प्रश्न उपस्थित करुन दाखवली होती.

‘ती’ पोटनिवडणूक हिंदूत्वावरची पहिली निवडणूक होती.

१९८७ साली विलेपार्लेत विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती. कॉंग्रेसचे उमेदवार होते प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेकडून होते रमेश प्रभू. भाजप विरोधात होता. शिवसेनेच्या प्रचारावेळी व्यासपीठावर उपस्थित होते, बाळासाहेब ठाकरे, शंभू महाराज, आणि पाठिमागे श्रीकृष्ण अर्जूनाला भगवदगीता सांगत आहेत, असे चित्र होते.

मुंबईच्या सर्व भागातुन पार्ल्यात शिवसैनिक एकवटले होते, आणि बाळासाहेब ठाकरेंनी भाषणा दरम्यान घोषणा दिली,

‘गर्व से कहो हम हिंदू है’ !!!

हिच निवडणूक शिवसेनेने पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन लढवली आणि जिंकली सुद्धा. यानंतरच बाळासाहेबांनी अधिकृतपणे हिंदुत्ववाद स्विकारले. भगवा कुर्ता, भगवी शॉल आणि हातात रुद्राक्षांची माळ असा रुप धारण केले. आणि देशात हिंदुच्या राजकारणाला सुरुवात झाली.

याच दरम्यान दोन घटना अशा घडल्या ज्यामुळे शिवसेनेला हिंदूत्ववादी पक्ष म्हणून ओळख मिळण्यास वाव मिळाला.

पहिली होती ‘सामना’च्या जन्माची. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक’ या विचाराखाली २३ जानेवारीपासून सामना अंकाची सुरुवात झाली. त्यामुळे धर्मावर भाष्य करण्यासाठी बाळासाहेबांना एक हक्काचे कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध झाले. हिंदुत्वासाठी पोषक मैदानच होते जणू.

भाजपने ही नस ओळखली. प्रामुख्याने प्रमोद महाजन यांनी. त्याच वर्षी जून मध्ये पालमपूरच्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात दोन निर्णय घेण्यात आले. एक होता विश्व हिंदु परिषदेच्या रामजन्मभुमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आणि दुसरा होता समविचारी भाजपशी युती करण्याचा. एखाद्या प्रादेशिक पक्षाशी युती करण्याची भाजपची हि पहिलीच वेळ होती.

त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये शिवसेना – भाजपने ४८ पैकी १४ जागा जिंकल्या. तर विधानसभा निवडणूकीत २८८ पैकी ९४ जागा जिंकल्या. त्यातील ५२ जागा शिवसेनेच्या होत्या.

१९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी एक भाषण दिले होते. त्यात म्हंटले,

‘आम्हाला नथुराम गोडसेचा अभिमान आहे, त्यांनी देशाला दुसऱ्या फाळणीपासून वाचवले आहे. सोबतच त्यांनी महात्मा गांधींनी देशाला दिलेल्या धोक्याचा बदला घेतला आहे’.

या भाषणाला सामना मधून कित्येक वेळा प्रकाशित केले गेले. त्यानंतर बाळासाहेबांनी खुलेआम हिटलरची स्तुती करायला चालू केले. एवढ्यावरच न थांबता हिटलरवरील एका पुस्तक देखील प्रकाशित केले. आणि त्याच्या फ्री कॉपी सुद्धा वाटल्या.

बाबरी मस्जिद घटनेनंतर हिंदुत्वाचे शिखर….

यानंतर ६ डिसेंबर रोजी शिवसेनेने हिंदुत्वाचे शिखर गाठले. आडवाणींनी देशात जेव्हा रथ-यात्रा सुरु केली तेव्हा देशात ‘मंदिर वही बनायेंगे’ वाला मुड होता. जेव्हा मस्जिदीचा भाग पाडला गेला तेव्हा स्वतः भाजप हे प्रकरण अंगावर घेण्यात कचरत होती.

तेव्हा बाळासाहेबांनी अभिमानाने पुढे होत ‘मस्जिद पाडणारे शिवसैनिकच होते’ असे जाहिर केले.

यामुळे राम मंदिर आंदोलनाचा देशभरातील सगळा फोकस शिवसेनेकडे झुकला. भाजपचे कार्यकर्ते देखील सुरुवातीच्या काळात कारसेकांविषयी विचारले तर ‘कारसेवक मराठी बोल रहे थे’ असं सांगायचे.शिवसेनेने प्रखर हिंदुत्व स्विकारलं होतं आणि याची झलक त्यांनी दाखवून दिली.

बाबरी पडली आणि त्याच दिवशीपासून मुंबईत दंगल भडकली. लोक रस्त्यावर उतरली होती. परिस्थिती गंभीर झाली. ७ तारखेच्या सकाळपर्यंत स्थिती अशी झाली की, प्रत्येक मिनीटाला एक बॉडी हॉस्पिटलला जात होती.

अशातच ८ डिसेंबर रोजी सकाळच्या सामनामध्ये बाळासाहेबांनी लिहीले,

‘देशद्रोह्यांना चिरडा’.

यादरम्यान मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुंबईतील परिस्थिती आलबेल आहे हे सांगण्यासाठी माझं बाळासाहेब ठाकरेंशी बोलणं झालं आहे असं वक्तव्य प्रसिद्ध केलं. 

मुख्यमंत्र्याच्या या वाक्याला ठाकरे म्हणाले,

सरकार सैन्याच्या मदतीने जनतेला ताब्यात ठेवू इच्छिते. पण हिंदुच्या एकजुटीला आता कोणीही थांबवू शकत नाही.

दंगली दरम्यानच जमावाने दिंडोशीमधील एका मंदिराला आग लावून पुजाऱ्याला मारल्याची घटना घडली. यामुळे शिवसेनेने मुंबईमधील प्रत्येक मंदिरात महाआरती करण्याचा निर्णय घेतला. २६ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान ३३ महाआरती झाल्या.

६ डिसेंबर नंतर पुढील जवळपास महिनाभर मुंबई जळत होती. ठाकरेंनी देखील मान्य केले की, हिंदुत्ववादाची जागा अपराध्यांनी घेतली. पण १० जानेवारीच्या सामन्यात त्यांनी लिहले,

‘हिंदुनी दाखवून दिले, आता ते मरत नाहीत तर मारतात’….

१२ जानेवारीच्या सामना आला तेव्हा तो दंगलीचा शेवटचा दिवस ठरला. त्यात बाळासाहेबांचा आदेश होता,खूप झाले, आता सगळ्यांना जे शिकवायचे होते ते शिकवले.

शिवसैनिकांनी हाच आदेश मानला. आणि दंगली थांबल्या.

बाबरी दंगल, मुंबई बॉम्बस्फोट यामुळे प्रचंड नरसंहार झाला. त्यानंतरच्या निवडणूकीत कॉंग्रेसचे सरकार जावून शिवसेना – भाजपचे सरकार सत्तेवर आले.
मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर पुढे एका टिव्ही मुलाखतीमध्ये हिंदुना संदेश देताना बाळासाहेबांनी कॅमेरासमोर छाती ठोक पणे सांगितले,

आय ॲम ए बॅड बॅड हिंदू.

पुढील १० वर्षातील अनेक मुलाखतींमधून बाळासाहेबांनी हिंदूत्व आणि राजकारण या दोघांना समांतर राहणाऱ्या भुमिका घेतल्या. आणि त्या जाहिरपणे मांडल्या देखील.

मशिदीवरील भोंग्यातून ओरडून देण्यात येणाऱ्या अजानला बाळासाहेब ठाकरेंनी व्यासपिठावरून विरोध केला होता.

इतकेच काय तर बाळासाहेबांच्या भाषणांची सुरुवात देखील ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनीनों आणि मातांनो’ अशीच असायची. अगदी त्यांनी आयुष्यातील अखेर पर्यंत हातातील रुद्राक्षाची माळ आणि भगवी वस्रे अंगावर ठेवली.

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात देखील हिंदुत्ववादी विचार पुढे नेत राहिले. त्यानंतर शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदूत्ववादी विचारांचा जाहिर पुरस्कार अनेकदा केला. तसेच सावरकरांना भारत रत्न देण्याची मागणी देखील अनेकदा केली.

हिंदुत्वावरून आमने-सामने

यानंतर शिवसेनेने २०१९ साली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यानंतर भाजपकडून सातत्याने या आघाडीवर ‘अभद्र युती’ असा आरोप केला जातो.

याचे कारण परस्पर विरोधी विचारधारा. इतकी वर्षे ज्यांचा विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत सरकारमध्ये बसणार यावरून शिवसेनेने सत्तेसाठी आपले हिंदूत्व सोडले असा आरोप त्यावेळी केला गेला. 

ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी एका पत्रकाराने यासंबंधातील एक प्रश्न त्यांना  विचारला.

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,

हिंदूत्व म्हणजे काय? जे राज्यघटनेने दिले आहे तेच ना ? मग हे सरकार राज्यघटनेनुसार चालेल.

मध्यंतरी पालघर येथे साधूंवर हल्ले झाले तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हिंदू संतांचे रक्षण करत नसल्याचा आरोप करून जोरदार टीका  झाली होती. शिवसेनेचे हिंदुत्व आघाडी सरकारमध्ये आल्यापासून बोथट झाले असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला .

यानंतर शिवसेनेवर पुन्हा आरोप झाला कोरोना काळात तब्बल सहा महिने मंदिर बंद ठेवण्यावरुन आणि तो केला थेट राज्याच्या राज्यपालांनी.

कोरोना लॉकडाऊन उठवल्यावरही मंदिरे बंद ठेवण्यात आली होती तेव्हा यावर  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही हिंदुत्व विसरलात का? असा सवाल करत डिवचले होते तर त्यावर “माझ्या हिंदुत्वाला तुमच्या सर्टिफिकिटची गरज नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात उत्तर दिले.

सोशल मीडियावरही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये या विषयावरून जोरदार वाद होत होता. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससोबत आघाडी करून शिवसेनेने आपली विचारधारा सोडली असल्याची टीका केली, तेव्हा ते म्हणाले ,

“आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. शिवसेनेने सोडले आहे”

भाजपमधून होणाऱ्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीमध्ये प्रत्युत्तर दिले,

  “हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? हिंदुत्व आमच्या धमन्यांत आहे.”

गेले अनेक दिवस शिवसेना भाजपचा हिंदुत्वावरून कलगीतुरा सुरूच आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून भटकत आहे अशी टीका चालूच आहे.

अशातच पुन्हा काल अजाण स्पर्धेवरुन शिवसेनेने खरचं हिंदूत्व सोडले आहे का असे प्रश्न विचारले जावू लागलेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले,

“शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित करणे म्हणजे आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखे आहे. मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम बाळासाहेब ठाकरेंनी कधीच केले नाही. कॉंग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतयात.”

या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभुमीवर आगामी काळात शिवसेना या सर्व आरोपांना आणि प्रश्नांना कसे उत्तरे स्वतःला हिंदूत्ववादी सिद्ध करण्यासाठी धडपडणार, की मवाळ भुमिका घेवून स्वतःचे हिंदूत्व सिद्ध करणार की खरचं सेक्युलर झाली हे मान्य करणार हे पहावे लागेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.