अस्तित्व टिकवायला उद्धव ठाकरेंसमोरचा पर्याय ‘शाखा सिस्टीम’

एक महिला होती तिच्या खोलीवर युपीच्या भाडेकरू भैय्याने कब्जा केला. भैय्या तथाकथित डॉन होता. महिलेला कुठं जावं कळत नव्हतं. ही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली. सिवील केस असल्याने पोलीसांनी हात वर केले. कायद्याची बंधने होती. मग ही महिला दूसऱ्या ठिकाणी गेली. दूसऱ्या दिवशी काही तरुण आले आणि त्या भैय्याचं सामान रस्त्यावर फेकून खोली मोकळी करून दिली.

असाच एक दूसरा किस्सा. एक तरुण होता. त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली. काय करावं आणि काय नाही. चाळीतले लोकं गोळा झाले. जो तो प्रयत्न करू लागला पण पोराकडे बापाला हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्याचे देखील पैसे नव्हते. अशाच एक ॲम्ब्युलन्स आली. बापाला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पीटलला नेण्यात आलं. उपचारात मदत करण्यात आली. इथही काही तरूण मदतीला होते..

गेल्या तीन पिढ्यांचे असे हजारो किस्से, हजारो कहाण्या आणि एक शाखा..

शाखा शिवसेनेच्या.. ज्यामुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही, ठाकरे संपत नाहीत.. आणि मराठी माणूस संपत नाही..

पण आता अशी परिस्थिती आहे का ? उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष निसटल्यात जमा आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना सगळेच पर्याय तपासून पाहणं गरजेचं आहे.

अशावेळी एक पर्याय उद्धव ठाकरेंसमोर उभा राहतो तो म्हणजे, शाखा.

या शाखांचं महत्त्व काय ? त्या उभ्या कशा राहिल्या ? तेच पाहुयात.

सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शाखा कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्या.

मराठीतले जेष्ठ लेखक भाऊ पाध्ये यांचं वासूनाका पुस्तक वाचलं तर तुम्हाला शाखांची पार्श्वभूमी आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अंदाज येतो. त्या काळात मुंबईतला मराठी माणूस म्हणजे चाळीत राहणारा होता. गिरणी कामगार, माथाडी कामगार अशी कष्टाची कामं करणारा आणि गावाकडून मुंबईत स्थलांतरित झालेला. या कामगारांचे जसे प्रश्न होते तसेच किंवा त्याहून अधिक त्यांच्या वयात आलेल्या मुलांचे प्रश्न अधिक गंभीर होते.

ही मुलं दिवसभर नाक्यावर वेळ घालवत. अपुऱ्या जागेमुळे दिवसभर घरात जाण्याची सोय नसे. रात्री आल्यानंतर वडिलांच बोलणं ऐकूण घ्यायला लागत असे. पण दूसरीकडे तरुण पोरांच्यात रग होती. काहीतरी करायचं होतं. गणपतीचे दहा दिवस झाले की ही पोरं रिकामी असायची…

या रिकामेपणाला तत्कालीन मुंबईत कोणकोणत्या जागा होत्या. कामगारांचे कम्युनिस्ट अड्डे होते, राष्ट्र सेवा दलाच्या शाखा होत्या सोबतच संघाच्या देखील शाखा होत्या. 

मात्र या तरुण पोरांच्या मनातील रग या तिन्ही संघटनांना हेरता आली नाही. वडिल गिरणी कामगार. प्रत्येक पिढीचा आपल्या बापाबरोबर संघर्ष असतोच. त्यामुळे कम्युनिस्ट अड्डे वजा झाले. राष्ट्र सेवा दलांच्या शाखा चांगलंचुंगल असण्याच्या नादात वजा होत गेल्या तर संघाच्या शाखांना ही रग ओळखता आली नाही.

बाळासाहेबांनी सुरवातीच्या काळात 80 टक्के समाजकारणाचा नारा दिला तो याच कारणाने. शिवसेनेची स्थापना झाली त्याच काळात हे कट्टे जमू लागले. नाक्यावर, चाळीच्या जिन्याखाली, कोपऱ्यावर तरुण मुलं गोळा होत. या तरुणांनी शाखांना प्राथमिक स्वरूप दिलं. मार्मिक मधून आलेला कृतीकार्यक्रम प्रत्यक्ष राबवण्याचं कसब या तरुणांमध्ये होतं.

आजचे भुजबळ असोत की राणे अगदी जोशी असोत की देसाई हे सर्व नेते महाराष्ट्राला या शाखांच्या सिस्टिमने दिले.

मात्र शाखा सुरू कधी झाल्या आणि हि सिस्टीम कोणी वर्कआऊट केली याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो..

पण याचं उत्तर शाखांना बाळासाहेबांची व बाळासाहेबांना शाखांची गरज होती यातूनच हा प्रश्न निकाली लागतो. वरतून खाली किंवा खालतून वरती जाणीवपुर्वक उभारलेली सिस्टीम म्हणजे शिवसेनेच्या शाखा अस कधीच नव्हतं.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये सेनेचे तब्बल ४२ नगरसेवक निवडून आले होते. या यशानंतर उभारत गेलेली सिस्टीम म्हणजे शाखा अस म्हणता येईल.

चाळीतली भांडण, नळाचं पाणी, तुंबलेली गटार, बाप आणि पोराचा वाद, मागे लागलेला दवाखाना या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक सिस्टिम आवश्यक होती. शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या विजयानंतर ठिकठिकाणी असणाऱ्या नाक्यांवर छोटीमोठी बांधकामे करुन शाखा सुरू करण्यात आल्या. अनेक नेत्यांनी आपल्या दुकानाच्या समोर, घराच्या पुढे बाकडं टाकून ही सिस्टीम उभा केली.

मात्र त्यानंतर उपनगरांमध्ये विखुरलेल्या मराठी माणसाला आपल्या इकडेही अशा समस्या ऐकून घेणाऱ्या व मार्ग काढणाऱ्या शाखा असाव्यात अस वाटू लागलं. दूसरीकडे सेनेचे निवडून आलेले नगरसेवक शाखांवर बसू लागले. तर जे प्रयत्नात होते ते शाखांवर येवून तिथल्या सत्ताधारी नगरसेवकांला पर्याय देवू लागले. त्यामुळे पुढच्या काही काळातच प्रभागवार शिवसेनेच्या शाखांची सुरवात होत गेली.

शाखांनी मराठी माणसांना कोणता कृती कार्यक्रम दिला. तर शाखांनी समस्या सोडवल्याचं पण मर्द म्हणून तरुणांची फौज उभारली. ही फौज विभागल्या दहावीत नंबर आलेल्या मुलांच कौतुक सोहळा देखील आयोजित करे आणि साम, दाम, दंड, भेद वापरून एखाद्याचा कार्यक्रम देखील करे. यातून आपल्या मागे आपली भावकी आहे हे गाव सोडलेल्या मराठी माणसाला आधार देत गेलं.

शिवसेनेत शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख अशी सिस्टीम वर्कआऊट झाली नाही. ती शाखांमुळे उलटक्रमाने विस्तारत गेली. शाखाप्रमुख तयार झाले आणि त्यानंतर उपविभागप्रमुख- विभागप्रमुख, विभागिय नेते, शिवसेना नेते आणि शिवसेनाप्रमुख अशी वरच्या क्रमाने सिस्टीम वर्कआऊट झाली.

जुने जाणते शिवसैनिक प्रमोद नवलकरांची गिरगावातील पहिली शाखा अस सांगतात पण ती काही पहिली शाखा नव्हती. गिरगावात नवलकर होते तसे करेलवाडीत खांडेकर, माझगाव डोंगरीत भुजबळ, घाटकोपरला पा.रा.कदम, भांडूपला रामचंद्र पडवळ, जोगेश्वरीला राजेश्वर रागिनवार अशा अनेक नेत्यांनी शिवसेनेचे नाके अर्थात शाखा सुरू केल्या होत्या आणि या शाखांसोबत थेट संपर्क होता तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा..

अगदी पहिल्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे शाखाप्रमुखांच्या बैठका घेतं. सुरवातीच्या काळात सुधीर जोशी यांच्या बंगल्याच्या गच्चीवर या बैठका होत असत. महिन्यातून एकदा होणाऱ्या या बैठकींना सर्व शाखाप्रमुख उपस्थित असत. त्यानंतर या बैठका १९७४ पासून सेना भवनच्या नव्या वास्तूत होवू लागल्या.

अधल्या-मधल्या बडव्यांना टाळून होणाऱ्या या बैठकांमुळे कोणता सेना नेता चुकतोय, कोण काय करतोय याचा थेट रिपोर्ट शिवसेनाप्रमुखांना मिळत असे.

त्यामुळेच शाखांचा प्रभाव कायम राहिला, यासाठी अगदी मनोहर जोशींच उदाहरण पाहता येईल. मनोहर जोशींना दादरच्या कबूतर खान्याजवळची शाखा सुरू केली. पुढे जोशी सर महापौर झाले, आमदार झाले. कामाचा व्याप वाढला पण याकाळात आठवड्यातून तीन वेळा रोज सकाळी दहा वाजता ते शाखेत उपस्थित असत.

इतकच नव्हे तर जेव्हा मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील ते दादरच्या प्रत्येक शाखेवर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत. 

या शाखांमध्ये तीन पिढ्या तयार झाल्या. पहिली पिढी बाळासाहेबांच्या समकालीन होती. जी त्यांच्या पश्चात तरुण म्हणता येईल अशी होती. भुजबळांपासून राणेंपर्यन्त आणि शिंदेपासून ते देसाईपर्यन्तचे अनेक नेते यात येतात. कम्युनिस्ट कामगार वडिलांच्या विरोधातली बंडखोरी ते बच्चनची ही पिढी. प्रस्थापितांविरोधात आवाज उभारण्याची धमक या पिढीत होती.

सेनेची प्रत्यक्ष सत्ता जरी 1995 साली आली तरीही 1990 पासूनच शिवसेना सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत आली होती. याचा फटका 90 उत्तरच्या राजकारणात बसू लागला. बाळासाहेबांच वलय वाढलं आणि शाखाप्रमुख हे विभागप्रमुखापुरते उत्तरादायी ठरत गेले.

मात्र 1997 साली मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकीत निर्माण झालेलं हे अंतर पुन्हा भरून काढता येवू शकतं हे दिसून आलं. 1997 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका होत्या. याच काळात राज ठाकरेंच्या भोवती किणी प्रकरणाच वादळ उठलं होतं. सेना सत्तेत असल्याने विरोधाची भूमिका, चळवळ, आंदोलन, मोर्चे थंड पडले होते आणि पर्यायाने शाखांचा दबाब देखील कमी झाला होता. मात्र 1997 साली पुन्हा शाखाप्रमुखांना साद घालण्यात आली. पुन्हा पुढची पिढी शाखेत येवू लागली आणि सेना पुन्हा एकदा सत्तेत आली.

मात्र आज शाखांची अवस्था काय आहे? 

तर एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यावर आणि व्हायच्या आधीही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शाखाप्रमुख यांच्यात अंतर पडल आहे हे निर्विवाद मान्य करावं लागतं.  या शाखांसोबत आजच्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांचं, त्याच्या वडिलांचं, त्यांच्या आजोबांचं भावनिक नातं आहे. हे नातं वर्कआऊट करणं महत्वाच आहे. ते घडलं तर उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूचा मराठी टक्का पुन्हा उभारता येऊ शकतो.

आजही मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी अनेक नागरिक पुढे आले आहेत, जोपर्यन्त मुंबईतून उद्धव ठाकरेंचं वर्चस्व हद्दपार होत नाही तोपर्यन्त त्यांचं राजकारण संपत नसतं आणि त्यांच्या राजकारणाचा प्राण हा त्यांच्या शाखांमध्ये आहे हे नाकारून चालत नाही.

फक्त निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं शाखाप्रमुख काय भूमिका घेतात ? आणि उद्धव ठाकरे पुन्हा शाखा सिस्टीमच्या माध्यमातून राजकारण उभं करणार का ? यावर त्यांचं अस्तित्व टिकणं अवलंबून असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.