शिवसेनेच्या वाघाचा हा ऐतिहासिक लोगो हल्लीच्या जाहीर कार्यक्रमात दिसेना झालाय..

भगवे आमुचे रक्त तळपते,
तप्त हिंदवी बाणा…
जात, गोत्र अन धर्म अमुचा
शिवसेना, शिवसेना, शिवसेना

शिवसेना पक्षाला आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या कित्येक जणांनी आपल्या मोबाईल रिंगटोनला हे गाणं ठेवलं होतं. वॉलपेपरही ठरलेला होता, शिवसेनेचा वाघ.

कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेच्या चाहत्यांचं आणि वाघाचं नातं तसं फार जुनं आहे. कित्येकांच्या गाडीवर वाघाचं स्टिकरही असायचं. 

खुर्चीवर कुणीही बसलं तरी रिमोट कंट्रोल माझ्या हातात असला पाहिजे, असं धोरण बाळासाहेब ठाकरेंचं होतं. आपल्या धोरणाप्रमाणं बाळासाहेब वागलेही. काळानुरूप बदल शिवसेनेनं अंगीकारला. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले ठरले. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

इतर सगळ्या राजकीय पक्षांप्रमाणं सेनाही आता हाय-टेक आणि सोशल मीडियावर सक्रिय झालीये. पण जरा बारकाईनं बघितलं, तर मराठी माणसांमध्ये शिवसेनेची ओळख रुजवणारा सेनेचा ‘वाघ’ जाहीर सभांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसणं जवळपास बंदच झालंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

शिवसेनेचा वाघ चितारला कुणी..?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपादन केलेल्या ‘Bal Keshav Thackeray: A Photobiography’ या पुस्तकात बाळासाहेबांनी रेखाटलेलं शिवसेनेचं बोधचिन्ह आहे. त्यात महाराष्ट्राच्या नकाशाच्या आऊटलाईनमध्ये अगदी मधोमध डरकाळी फोडणारा वाघ आहे, बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे. एका कोपऱ्यात ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या ओळी  लिहिलेल्या आहेत. आणि खाली मोठ्या अक्षरात शिव सेना हे शब्द आहेत.

WhatsApp Image 2022 04 25 at 7.17.33 PM

तर ‘प्रबोधनकारांनी शिवसेनेची स्थापना होण्याच्या बराच काळ आधी मुंबईत मराठी पद्धतीचा नवरात्रोत्सव सुरू केला होता. त्यावेळी त्यांनी हातात ब्रश घेऊन एक ‘व्याघ्रमुद्रा’ चित्रित केली होती. तीच प्रतिमा डोळ्यांसमोर ठेऊन स्वतः बाळासाहेबांनीच हा वाघ चित्रित केल्याची माहिती मिळते.’

असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी ‘जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ या पुस्तकात नमूद केलं आहे.

शिवसेनेचा ‘लोगो’ बनलेला हा वाघ लार्जर दॅन लाईफ ठरला. कारण सेनेच्या शाखांमध्ये असलेल्या फळ्यांवर, चौकातल्या फ्लेक्सवर आणि बाळासाहेबांच्या जाहीर सभांमध्ये हा वाघ उठून दिसायचा. हा वाघ म्हणजे शिवसेनेच्या आक्रमकतेचं, कुणालाही भिडण्याच्या हिंमतीचं प्रतीक बनला.

जवळपास प्रत्येक दसरा मेळाव्यात भव्यदिव्य स्टेजवर हा वाघ दिसायचाच.

२०१० च्या दसरा मेळाव्यात जेव्हा आदित्य ठाकरे यांची राजकारणात एंट्री झाली, तेव्हाही पार्श्वभूमीला हा वाघ होताच.

WhatsApp Image 2022 04 25 at 7.40.44 PM

२०१२ ला जेव्हा बाळासाहेब प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नव्हते, त्या दसरा मेळाव्यालाही स्टेजवरच्या फ्लेक्सवर हा वाघाचा लोगो होता. २०१३ मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतरच्या पहिल्या मेळाव्यात स्टेजच्या मागं फक्त बाळासाहेबांचाच फोटो होता.

२०१४ मध्ये वाघाचा लोगो भाषणाच्या पोडियमवर होता. तर २०१५ मध्ये झालेल्या अमृतमहोत्सवी दसऱ्या मेळाव्यात स्टेजवर मागे बाळासाहेबांचाच फोटो होता. २०१८ मधल्या मेळाव्यात वाघाचा लोगो स्टेजवर होता.

तर कोरोनामुळं २०२० मध्ये बंदिस्त सभागृहात झालेल्या मेळाव्यात मात्र सेनेचं बोधचिन्ह असलेला वाघ स्टेजवर दिसला नाही.

सेनेचा २०२० चा दसरा मेळावा

 

तर २०२१ च्या दसऱ्या मेळाव्यातही बॅकग्राऊंडला बाळासाहेब होते

सोशल मीडियाचा विचार करायचा झाला, तर २०१४ च्या आधी सेनेनं अधिकृत फेसबुक पेजचा प्रोफाइल फोटो म्हणून अनेकदा हा वाघ ठेवला होता.

मात्र ऑगस्ट २०१४ पासून सेनेनं धनुष्यबाणाची निशाणी प्रोफाइल फोटो म्हणून वापरली.

शिवसैनिकांच्या मेळाव्यात बाळासाहेबांना चांदीचं सिंहासन भेट देण्यात आलं होतं. त्या सिंहासनाच्या वरतीही वाघाचं चिन्ह होतं.

WhatsApp Image 2022 04 25 at 8.00.35 PM

जाहीरपणे हे चिन्ह दिसणं तुलनेनं कमी झालं असलं, तरी २०१८ मध्ये काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून या वाघाची प्रतिमा असणारी अंगठी शिवसैनिकांमध्येच वाटली होती.

WhatsApp Image 2022 04 25 at 8.04.27 PM

शिवसेनेच्या फ्लेक्सवर, सोशल मीडियावर, जाहीर सभांच्या बॅकग्राऊंडला जरी हा वाघ दिसत नसला, तरी तो सेनेच्या लेटरहेडवर कायम आहे आणि कित्येक शिवसैनिकांच्या मनातही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.