गेल्या ३४ वर्षांपासून शिवसेनेला औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणं जमलं नाहीये
शिवसेनेची कोणतीही सभा असू द्या की सामनाचे अग्रलेख औरंगाबादचा उल्लेख शिवसेना संभाजी नगर असाच करते. मात्र ऑफिशियली अजूनही आपल्याला औरंगाबादचं नामांतर झालेलं दिसत नाही. ३४ वर्षे शिवसेनेनं नामांतराचा मुद्दा पुढे आणतेय मात्र त्यानं त्यात यश आलेलं नाहीये.
हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे भगवी शाल पांघरलेल्या राज ठाकरेंच्या निशाण्यावर देखील भविष्यात हा मुद्दा असेल हे सांगण्यात येत आहे. १ मेच्या औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या सभेचा मनसेने टिझर रिलीज केला होता त्यातही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. तर औरंगाबादेतील सभेत राज ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर म्हणत शहराचा इतिहासच वाचून दाखवला. येणाऱ्या काळात राज ठाकरे हा ही मुद्दा शिवसेनेकडून काढून घेतील असं मत जाणकार व्यक्त करतात.
त्यामुळं ३ वेळा राज्यात सत्तेत बसूनही शिवसेनेला औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण का जमलं नाही याचा एक आढावा घेऊ.
सुरवात करू औरंगाबाद हे नाव शहराला कसं मिळालं इथपासून.
तर औरंगाबादचं सर्वात पाहिलं नाव इतिहासात सापडतं ते म्हणजे राजतडक.
मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता त्यात औरंगाबादचं नाव ‘राजतडक’ असल्याचं आढळून आले आहे.
त्यानंतर शहराचं लोकपरीचित नाव होतं खडकी.
बेसाल्ट खडकांवर बसलेलं हे गाव आणि तिथं असलेलं अगदी प्राचिन असं खडकेश्वर महादेवाचं मंदिर यामुळंच या गावाचं नाव खडकी पडलं असावं असा तर्क सांगितला जातो.
त्यानंतर या खडकी गावाला शहराचा दर्जा मलिक अंबर याच्या काळात मिळाल्याचं सांगण्यात येतं. त्यानं शहरात ‘नहरे ए अंबरी’ सारख्या पाणीपुरवठ्याची सुविधा आणि इतर आधुनिक वास्तू उभारल्या मात्र त्याच्या काळातही शहराचं नाव खडकीच होतं.
कालांतरानं १६३३ मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव ‘फतेहनगर’ असं ठेवलं.
१६५३ मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला.
औरंगजेबानं पुन्हा या शहराचं बदलत फतेहनगरवरुन ‘खुजिस्ता बुनियाद’ असं नाव ठेवलं.
कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आलं आणि त्यानंतर या शहराला सध्या आहे ते औरंगाबाद हे नाव मिळालं.
यानंतर औरंगाबाद ते संभाजीनगर हे नामांतर करण्याची भूमिका घेतली शिवसेननं. याची सुरवात झाली होती १९८८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेतलेल्या विजयी सभेपासून.
१९८८ ला औरंगाबादेत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले आणि हाच विजय साजरा करण्यासाठी बाळासाहेबांनी हा मेळावा घेतला होता.
याच १९९८च्या औरंगाबादेतील सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती.
त्यानंतर जून १९९५ ला औरंगाबाद महानगरपालिकेत औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा ठराव पास करण्यात आला आणि तो राज्यसरकारकडे पाठवण्यात आला.
१९९५ला राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचंच सरकार होतं. राज्यमंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतराचा मार्ग मोकळा झाला.
महसूल, वन व नगरविकास विभागाने ९ नोव्हेंबर १९९५ रोजी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची अधिसूचना जारी केली होती.
मात्र त्याचवेळी या निर्णयाविरोधात औरंगाबादचे तत्कालीन काँग्रेस नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवले.
नगरसेवक मुश्ताक अहमद यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मात्र त्यानंतर जेव्हा हा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा १७ जानेवारी १९९६ ला सुप्रीम कोर्टाने औरंगाबादचं नाव जैसे थे ठेवण्यास सांगितलं.
न्यायमूर्ती जे.एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने औरंगाबादचे नाव बदलण्याचा निर्णय “पॉप्युलीस्ट ” असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.
“कोणीही इतिहासाच्या पुस्तकांची पाने फाडू शकत नाही किंवा इतिहासाचे पुनर्लेखन करू शकत नाही. जर एखाद्याला इतिहास घडवायचा असेल तर तो योग्य मार्गाने झाला पाहिजे”
असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं होतं.
मग २००१ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वखालील काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा राज्यात होतं तेव्हा ता मुद्द्याला पुन्हा कलाटणी मिळाली.
२६ जून २००१ रोजी राज्य मंत्रिमंडळाने १९९५ ची औरंगाबादची जी नाव बदलण्याची अधिसूचना होती ती रद्द केली.
महसूल वन विभागांनी ६ सप्टेंबर २००१ रोजी आणि नगरविकास विभागाने १० ऑक्टोबर २००१ रोजी ही अधिसूचना रद्द केली होती.
त्यानंतर महानगरपालिका ते विधानसभा प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा येतंच राहिला. मार्च २०२१ मध्ये भाजप आमदार योगेश सागर यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी शहरांची नावे बदलण्याची बाब केंद्राच्या अखत्यारीत आहे, राज्य सरकारला त्यात काहीही निर्णय घेता येत नाही असं म्हटलं होतं.
तसेच ४ मार्च २०२० ला विभागीय आयुक्तांकडून औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव राज्यसरकारकडे आल्याचं सांगितलं होतं आणि राज्यसरकार कायदेशीर सल्ले घेऊन हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवेल असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागानं एक GR काढला होता त्यात औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर- औरंगाबाद असा करण्यात आला होता. त्यावेळीही शहराच्या नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला होता.
आता राज ठाकरे यांची औरंगाबादेतील सभेनंतर या मुद्याला पुन्हा हवा मिळू शकते आणि त्याचबरोबर ३४ वर्षात शिवसेनेला औरंगाबादचे नामांतर करता आले नाही हा मुद्दा देखील तेवढाच चर्चिला जाईल.
हे ही वाच भिडू :
- गोपीनाथ मुंडेंचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः पतंगराव कदम हेलिकॉप्टरने औरंगाबादला आले
- निवडणूक जिंकल्यावर औरंगाबादच्या गणपतीला शिवसेनाप्रमुखांनी सोन्याचा मुकुट चढवला.
- अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं….