शिवसेना नावाच्या वादळाची सुरवात मात्र ‘मार्मिक’ होती.

आज शिवसेनेचा स्थापना दिवस. १९ जून १९६६ साली सुरु झालेले हे वादळ पुढील अनेक दशकं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते. तर भाई लोक मुळात मार्मिक साप्ताहिक बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे बंधूनी १९६० साली सुरु केला. नेमकं पुढे काय होणार आहे याची ठाकरे बांधूनाच काय तर प्रबोधनकार ठाकरेनाही कल्पना नव्हती.

बाळासाहेबांवर प्रबोधनकारांचा जबरदस्त प्रभाव होता. प्रबोधनकारांचे व्यक्तिमत्व हि तितकेच झंझावाती होते. पत्रकारिता, चित्रकला आणि वक्तृत्व या तीनही कला प्रबोधनकारांकडूनच त्यांच्यात आल्या होत्या. प्रबोधनकार हे आपल्या घणाघाती वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते.

त्याकाळी संयुक्त महाराष्ट्राच्या बैठका  प्रबोधनकारांच्या घरी होत. मराठी माणसावर होत असलेला अन्याय,त्यामुळे लोकांमध्ये तयार होणारा संताप हे सर्व बाळासाहेब बघत होते. प्रबोधनकारांच्या सहवासानं अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे संस्कार बाळासाहेबांच्या मनावर झाले .

बाल ठाकरे एक कार्टूनिस्ट के रूप में

बाळासाहेब त्याकाळी फ्री प्रेस मध्ये नोकरीला होते. तेथील वातावरण दक्षिणात्य होते. बाहेर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु होती .त्या सर्व वातावरणात बाळासाहेबांचा ब्रश अनेकांचा  यथोचित समाचार घ्यायचा. अनेकांना ते पटायचे नाही. मालकाचीही व्यंगचित्रांवर करडी नजर असायची. त्यामुळे अनेकदा संपादक आणि बाळासाहेब यांच्यामध्ये खटके उडायचे. ‘अमक्या तमक्या नेत्याची खिल्ली उडवू नका, असं त्यांना सक्त सांगण्यात येई. एकदा हे  भांडण टोकाला गेले आणि बाळासाहेबांनी ‘ फ्री प्रेस’ मध्ये परत न जाण्याचा  निर्णय घेतला .

त्यानंतर दोनच महिन्यात मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाची त्यांनी सुरवात केली. “मार्मिक ” मधून दाक्षिणात्यांच्या विरोधात धुमधडाक्यात प्रचार सुरु केला. मार्मिकनं दक्षिण भारतीयांच्या विरोधात सुरु केलेल्या या मोहिमेतच शिवसेनेच्या स्थापनेची बिजं होती.

श्रमिक मराठी वाचकांचा शीण दूर व्हावा आणि त्याला एक रिलीफ मिळावा या मर्यादित दृष्टीकोनातून मार्मिकची सुरवात केली होती. मी पोट भरण्यासाठी मार्मिक सुरु करतोय!! आसं बाळासाहेबांनी एका लेखात सांगूनच टाकले होते.

मार्मिकच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन  यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अगदी वाजत गाजत झालं. अल्पावधीतच मुंबईतल्या मराठी माणसाच्या हातात मार्मिक दिसू लागलं. मार्मिक वाचून मराठी माणसाला आनंद मिळत होता पण त्यामुळे त्याचे भौतीक पातळीवरील प्रश्न सुटणार नव्हते. मराठी राज्याची  स्थापण झाल्याचा जसा त्याला आनंद होता तसाच मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी आपल्याला रक्त सांडावे लागले याची त्याला जबरदस्त चीड होती. मुंबईतच मराठी माणसाला उपऱ्यासारखं राहावं लागत होतं , या बद्दलची खंत त्याच्या मनात होती .

याचकाळात मार्मिक वर एक आरोपही  झाला होता, त्याचं मूळ यशवंतराव होते. त्यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यामुळे हे साप्ताहिक कॉंग्रेसची तळी उचलणारं तर असणार नाही ना ? याची शंका लोकांना येऊ लागली होती. या शंकेला बाळासाहेबांनी नेहमीच्या मिश्किल, फटकळ  शैलीतून उत्तर दिले. मार्मिकला १ ऑगस्ट १९६१ साली एक वर्ष पूर्ण झालंं. आर.एस.एस च्या “विवेक ” या साप्ताहिकाने “मार्मिक हे अत्यंत गलिच्छ शब्दात टीका करणारे पत्र ” असा म्हंटलं होतं. याचं मात्र उत्तर बाळासाहेबांनी अत्यंत सौम्य शब्दात दिले होते. च लेखातून ठाकरे यांनी आपली एकूण राजनीती तपशीलवार मांडली होती.

“आम्ही जरूर यशवंतरावांचा अनेकदा गौरव केला पण आम्ही वेळोवेळी सरकारवर मर्मभेदी टीकाही केली आहे . याआमचा पक्ष कोणता? तर लोकहीत ही आमची सार्वजनिक नीतीची कसोटी आहे. या कसोटीवर सर्वाच पक्ष आमचे आहेत. प्रजासमाजवादी पक्ष, जनसंघ, कॉंग्रेस, हिंदू महासभा, स्वतंत्र सोशालिस्ट हे सारे आमचेच पक्ष आहेत. ह्या एखाद्या पक्षाकडून लोकघातक कृत्य झाल्यास आम्ही त्यांचा धिक्कार करू. “

मार्मिकचा खप बर्यापेकी वाढला होता. कधी वसंतदादा पाटील तर कधी बाळासाहेब देसाई या काँग्रेसी नेत्यांच्या अध्यक्षतेखाली या साप्ताहिकाचे वर्धापनदिन अगदी धुमधडाक्यात साजरे होत होते. बाळासाहेब आणि वसंतराव नाईक यांचेही संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. मार्मिकने वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर स्तुती सुमने उधळली होती. असं म्हंटला जातं त्याची परतफेड नाईक यांनीही अनेकदा केली .

दरम्यानच्या काळात मुंबईत cosmopolitan शहराच्या नावाखाली परप्रांतीय वाढतच चालले होते. हळूहळू हि लोकं नोकरशाही बरोबरच, व्यापार कारखानदारी हातात घेऊ लागले. त्या दहा वर्षात मुंबईतील मराठी टक्का खूपच घसरला होता आणि ही गोष्ट सामान्य मराठी माणसाला प्रचंड अस्वस्थ करणारी होती. मराठी मनाची ही खदखद  मार्मिकने टिपली.

मार्मिकने याला आपल्या लेखांतून, वाचा फोडली प्रत्येक लेखाच्या शेवटी “वाचा आणि शांत बसा”  असा खोचक टोमणा हि मारण्यात येई .

मराठी तरुणांना अनेक वर्ष दाबून ठेवलेल्या त्यांच्या आवाजाला नवीन स्वर मिळाल्यासारखे वाटू लागले . मार्मिकच्या माध्यमातून सुरु  झालेल्या या मोहिमेस फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. त्यांनी दक्षिणात्यांच्या विरोधात उघडलेली हि आघाडी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेली.

दरम्यान मार्मिकचा पाचवा वर्धापनदिन साजरा झाला त्यात प्रमुख पाहुणे होते कॉंग्रेसचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई. मार्मिकची आक्रमकता इतकी लोकप्रिय होती की लोकं ठाकरे यांच्या लिखाणात आणि वागण्यात असलेल्या विरोधाभासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिकली होती.

ज्या सरकारवर ठाकरे टीका करायचे त्याच नेत्यांना कार्यक्रमांना बोलवायचे याच्या मागे एक कारण होत ते म्हणजे कॉंग्रेसला मुंबईत कामगार वर्गात असलेली कम्युनिस्ट पक्षाची लोकप्रियता मोडीस काढायची होती. ते काम बाळासाहेब लीलया करत सुटले होते. त्यामुळे मुंबईत कॉंग्रेसने बाळासाहेबंना मोकळे रान दिले होते .

shivsena ki satpna

तर बाळासाहेबांची मोहीम खूपच झोकात होती. रोज सभा होत लोक गर्दी करत बाळासाहेब आपल्या भाषणातून लोकांच्या मनाला हात घालत.मराठी माणसाची अस्मिता जागृत झाली होती आणि त्यांच्या  मनामनांतून खदखदणाऱ्या असंतोषाला संघटीत रूप देण्याची वेळ येऊन ठेपली होती.

आणि मग एके दिवशी प्रबोधनकारांनी विचारले,

“बाळ ! व्याख्याने ,भाषणं असं सगळं तुझा सुरु आहे. हे सगळं असच सुरु ठेवणार कि त्याला संघटीत स्वरूप देणार आहेस ? “

हा विद्रोह संघटीत वाहायला हवा याबद्दल बाळासाहेबांचं ही  दुमत नव्हतं. आपण राजकीय पक्षची का स्थापना करू नये ? असं काही लोकांनी सुचवलं बाळासाहेबांनी ती कल्पना झुरळासारखी झटकून टाकली त्या ऐवजी लोकांची संघटना उभी करण्याचा निर्णय घेतला .

मराठी माणसाने, मराठी माणसाच्या हितासाठी  कामकरणारी  संघटना उभी करण्याचा निर्णय होताच, प्रबोधनकारांनी नाव सुचवले ‘शिवसेना !’

आणि मार्मिक मध्ये ५ जून १९६६ च्या अंकात खालील चौकट प्रसिद्ध झाली .

IMG 20190619 182849 1

त्यानंतर प्रबोधनकारांच्या शिवाजी पार्कच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता. घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिथंच नारळ फोडला आणि शिवसेनेची रीतसर स्थापना झाली.

आज त्या संघटनेला ५३ वर्ष पूर्ण झाली. ह्या ५३ वर्षात शिवसेनेने सत्ता बघितली, विरोधी पक्ष म्हाणून आक्रमकपणे काम केले. अनेक शिलेदार ही निघूनही गेले. पण बाळ ठाकरे आणि सेनेसाठी आजही त्यांचे सैनिक बेडरपणे काम करत आहेत. 

तर भिडूंनो हि आहे कहाणी शिवसेनेच्या जन्माची. एक वादळ ज्याची सुरवात मात्र मार्मिक होती .

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.