लोकांना शिवशाही बसची भीती वाटते.

एस टी बस म्हणजे सर्वांच्या जिंव्हाळ्याचा विषय.ज्या गावात लाईट पोहोचली नाही त्या गावात एस टी सेवा देते. काळानुसार एस टी महामंडळ ने बसेस मध्ये बदल केले. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी च्या स्वरूपात पहिली वातानुकूलित बस सेवा सुरू झाली. पण ही सेवा फक्त महानगरी शहरांना भेटत होती. ग्रामीण भागातील प्रवाशांना पण आपल्याकडे वातानुकुलीत बससेवा असावी असं वाटू लागलं.

मोठा गाजावाजा करत 2 वर्षांपूर्वी एस टी च्या ताफ्यात शिवशाही वातानुकुलीत बसेस आल्या आणि प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या. कमी तिकिटात ए सी गाडीचा प्रवास, सीटजवळ चार्जिंग ची सोय, LED स्क्रीन यामुळे गाडी भारी वाटायला लागली. पण थोड्याच काळात ‘एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास’ या ब्रीदवाक्याला शिवशाही ने तडा दिला. शिवशाही बसच्या वेळेचा कुणीच भरवसा देऊ शकत नाही. ती बस कधी बसस्थानकातून बाहेर निघेल? कधी मुक्कामी पोचेल याची काही खात्री नाही. अपघाताचं प्रमाण थोड्या दिवसात भरपूर. त्यात गाडी चालक बेभान असल्याचे अनेक किस्से.

हे सगळं का झालं?

शिवशाही नावाने सुरु केलेली ही सेवा मुळात एस टी महामंडळ चालवत नाही. हे हळू हळू एसटीच्या खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेलं पाउल आहे. थेट कर्मचारी कपात करता येत नाही. नवीन भरती टाळायची आहे. आणि मुख्य म्हणजे खाजगीकरण करून स्वार्थ साधायचा आहे. त्यामुळे भाडे तत्वावर गाड्या घेणे, कर्मचारी तात्पुरते नेमणे असे प्रकार सुरु आहेत. शिवशाही बस वरचे ड्रायव्हर हे खाजगी कंपनी ने पुरवले आहेत, फक्त कंडक्टर हा महामंडळाचा असतो. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचा ताळमेळ त्यामुळे कधीच बसत नाही. खुपदा ड्रायव्हर आणी कंडक्टर यांचे वाद चालू असलेले दिसतात. मुळात कंत्राटी कामगाराला आपल्या कंपनीच्या नावलौकिकाची काही पडलेली नसते. तसा हा प्रकार आहे.

बरं हे सगळं वैयक्तिक अनुभवातून सांगतोय.

मी नेहमी एसटीने प्रवास करतो. खूप लोक खाजगी बस नसली की एसटीने प्रवास करतात. पण माझ्यासारखे खूप लोक आहेत जे एसटी नसली तरच खाजगी बसने जातात. एसटीचा प्रवास थोडा दगदगीचा वाटतो. पण भन्नाट माणसं भेटतात. खूप आपुलकीने गप्पा होतात. ड्रायव्हर कंडक्टर चांगली वागणूक देतात. नेहमीच नाही. पण खुपदा. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एसटी नेहमी सेफ वाटते. जुने लोक सांगतात की गावात एसटी आली होती तेंव्हा त्यांच्यापैकी कितीतरी लोक आनंदाने रडले होते. एसटीची पूजा केली होती. एसटीला नोटांचा हार घातला होता. त्याकाळी बरेच लोक कितीतरी दिवस जायचं यायचं नसलं तरी केवळ एसटी बघायला म्हणून एसटी गावात यायच्या वेळी गोळा व्हायचे. एसटीला मुलं लांब पळत जाऊन टाटा करायचे. 

एसटीचं महत्व ग्रामीण भारतासाठी तर खूप आहे. काही गावात उशिराची एसटी रात्री मुक्कामी असायची. कंडक्टर ड्रायव्हर व्हीआयपी असल्यासारखा त्यांचा थाट असायचा. पार्सल असो, भाजी पाल्याचे माळवे असो किंवा दूध दही असो. सगळा व्यापार एसटी वर अवलंबून होता. म्हणून एसटी बद्दल कायम जिव्हाळा मनात असतो. एसटीचा प्रवास चुकत नाही.

नवीन नवीन म्हणून केज ते पुणे असा शिवशाही ने प्रवास केला. जागा नव्हती म्हणून केबिन मध्ये बसून प्रवास केला.गाडीत बसल्यावर मला ट्रक मध्ये बसून प्रवास करतोय अस वाटत होतं.ड्रायव्हर सोबत गप्पा मारल्यावर कळलं की हा ड्रायव्हर आधी पुण्यात कामाला होता आणि आता शिवशाही वर आहे. तो म्हणाला आम्हाला पगार एस टी नाही तर खाजगी  कंपनी देते. आजवर बरेचदा एस टी च्या केबिन मध्ये बसून प्रवास केला पण शिवशाही मध्ये एकदाच केला आणि बेक्कार अनुभव आला.

केबिन मध्ये मोठ्याने गाणी लावलेली, रस्त्याने ओव्हरटेक करताना अर्वाच्य शिव्या द्यायचा. पहाटे पुण्यात गाडी आली शिवाजीनगर जवळ स्कुटी वर 2 मुली बस च्या पूढे जात होत्या त्यांना पाहून ड्रायव्हर ने जे कमेंट केली ती अशी चारचौघात सांगता पण नाही येणार. आज लोक शिवशाही मधून प्रवास करायला घाबरतात. लालपरी मध्ये त्रास झाला तरी चालेल पण लोकांचा एस टी च्या ड्रायव्हर वर विश्वास आहे तसा शिवशाही च्या ड्रायव्हर वर अजिबात नाही.एस टी बस जरी भाडेतत्त्वावर घेतल्या तरी ड्रायव्हर हे एस टी चेच पाहिजेत. यातले काही खाजगी ड्रायव्हर निष्काळजी आहेत. यातल्या काही ड्रायव्हर लोकांनी गाड्याची अवस्था पण बेक्कार करून टाकली. काहीजण ट्रक चालवल्या सारख्या बस चालवतात. तस पाहायला गेलं तर एस टी कडे शिवनेरी, अश्वमेध या पण गाड्या आहेत. पण यावर असलेले ड्रायव्हर हे एस टी ने प्रशिक्षण दिलेले आहेत.  या गाड्यांच्या कधी जास्त तक्रारी येत नाहीत आणि अपघात च प्रमाण तर नगण्य आहे.एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास हे ब्रीद जर जपायचं असेल तर शिवशाही चे ड्रायव्हर एक तर महामंडळाचे असावेत नाही तर प्रशिक्षण दिलेले असावेत.

  •  भिडू श्रीकांत जाधव.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. भाऊ भोर says

    बरोबर आहे

Leave A Reply

Your email address will not be published.