आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.

दरवर्षी शिवजयंती आली की आसपासच्या मंडळात सकाळीपासून टेपवर शिवपराक्रमाचे पोवाडे वाजायला सुरु होतात. डफावर कडाडणारी थाप आणि तसाच काळजाला भिडणारा ओळखीचा आवाज कानी पडतो.

“ओम नमो श्री जगदंबे नमन तुज अंबे करून प्रारंभे

डफावर थाप तुनतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण

शिवप्रभूचं गातो गुणगान हे जी जी जी “

ऐकणारा प्रत्येकजण थरारून उठतो. हीच ताकद होती शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांची.

गेली तीस चाळीस वर्षे अख्खा महाराष्ट्र शिवजयंतीला आणि इतर वेळी जे पोवाडे ऐकत आला आहे ते सगळे पोवाडे बाबासाहेब देशमुखांनी म्हटलेले आहेत.

त्यांचा जन्म झाला २० फेब्रुवारी १९३९. मूळगाव मल्लेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली. शाहीर आपल्या गावाचा जिल्ह्याचा उल्लेख पोवाड्यामध्ये हमखास करत. साधारण १९७०च्या दशकापासून त्यांनी पोवाडे गायला सुरवात केली. याच काळात टेपरेकॉर्डर व स्पीकर गावोगावी पोहचू लागले होते.

याच टेपरेकॉर्डमुळे शाहिरांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात गेला आणि घुमू लागला.

सांगली जिल्ह्याच्या पठ्ठे बापुरावांपासून सुरु होणारी शाहिरीची परंपरा  ग. द. दीक्षित, र.द. दीक्षित, बापूराव विभूते, रमजान बागणीकर, अण्णाभाऊ साठे, पिराजीराव सरनाईक, अंबुताई बुधगावकर यांच्या पर्यंत पोहचते. याच तळपत्या शाहिरीचा वारसा बाबासाहेबांनी केवळ जोपासलाच नाही तर त्याला आधुनिक रुप व तंत्र देवून पोवाडा वेगळ्या उंचीवर नेला.

आधी नमन महाराष्ट्राला, ज्ञानेश्वरांना, गुरूमाऊलीला, तुकाराम महाराज, गाडगे बाबांच्या गुरू चरणाला !

अशी सुरवात करणाऱ्या बाबासाहेब देशमुखानी सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यापासून विदर्भातील दुष्काळी भागापर्यंत जाऊन आपल्या डफावरील थाप आणि पहाडी वीररसाच्या गळ्याने मंत्रमुग्ध करून अनेक पिढ्यांना शिवइतिहासाची ओळख करून दिली.

डोक्यावर कोल्हापुरी फेटा, अंगात भगवा अंगरखा, गळ्यात कवड्याची माळ अशा मराठेशाहीच्या पोशाखात भारदस्त दिसणारे शाहीर पोवाड्याची ललकार देत आणि सगळा सभागृह थक्क होऊन जाई,

त्यांचा सिंहगडावरील स्वारीचा तानाजीचा पोवाडा तर आजही अनेकांना तोंडपाठ आहे.

हाच पोवाडा शाळकरी अजय-अतुल नी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समोर गायला होता आणि त्यांची शाब्बासकीची थाप मिळवली होती.

या शिवाय बाबासाहेबांनी गायलेले शिवजन्म, स्वराज्याची स्थापना, अफजलखान वध, बाजी प्रभू देशपांडे, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, राज्याभिषेक असे कित्येक पोवाडे सुप्रसिद्ध आहेत. या सोबतच क्रांतिसिंह नाना पाटील, बाबासाहेब आंबेडकर, राजाराम बापू पाटील यांच्यावरही पोवाडे रचले. त्यांच्या पोवाड्यामुळेच बापू बिरू वाटेगाव कराची सगळ्या महाराष्ट्राला ओळख मिळवून दिली.

पोवाड्याला सातासमुद्रापार पोहचवण्यात शाहीर बाबासाहेब देशमुखांचा मोठा वाटा आहे.

रिमिक्सच्या दणदणाटात शाहिरीची परंपरा जपणाऱ्या बाबासाहेब देशमुखांना जनतेने राष्ट्रशाहीर ही पदवी दिली. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. खेड्यापाड्यात लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले. मानसन्मान दिला. मात्र शासन दरबारी त्याच्या वाट्याला उपेक्षाच आली. २९ सप्टेंबर २००३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू.