काल शोएब अख्तर बॉलिंगला आला आणि सगळं बालपण डोळ्यांसमोरुन गेलं…

लहानपणी ऐकत नाही म्हणून घरच्यांनी लय गोष्टींची भीती दाखवली. बागुलबुवा, चटका, फटके असं लय काय काय. वेळप्रसंगी झाडूनी मार खाल्ला, पण आपण आलम दुनियेत कशाला घाबरलो नाही. पण घरच्यांनी जर चुकून शोएब अख्तरची भीती दाखवली असती, तर बत्त्या डीम झाल्या असत्या. कारण अख्तरची दहशतच तशी होती. पार बाऊंड्री लाईनच्या थोडं अंतरापासून दात, ओठ खाऊन पळत यायचा आणि उघड्या डोळ्यांना पटकन दिसणारच नाही, इतक्या जोरात त्याचा बॉल जायचा. आपल्या सचिननं त्याला लय हाणलं, पण म्हणून काय अख्तरची दहशत कमी झाली नाही.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, अख्तरनं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ. सध्या लेजन्ड्स लीग सुरू आहे, त्यात कैफ, युसूफ-इरफान पठाण असे भारताचे भिडू आहेत. सोबतच लंका, पाकिस्तान मधले भारी कार्यकर्तेही खेळतात. त्यात अख्तरनंही बॉलिंग टाकली…

http://www.facebook.com/watch/?v=1053673978545596

 

 

गड्यानं काल चार ओव्हर्स टाकल्या, २१ रन्स दिले आणि आपल्या स्टुअर्ट बिन्नीची विकेटही घेतली. अख्तर जीव खाऊन बॉलिंग टाकतोय, आपले पठाण ब्रदर्स त्याला हाणतायत… विषय खोल नॉस्टॅल्जीक वातावरण.

अख्तरचं वय झालंय ४६. आता इथं निम्म्या पोरांची पाठ तिशीत गंडते आणि गुडघ्यांचा चाळीशीतच बाजार उठतो. पण अख्तर मात्र ४६ चा झाला, तरी त्याच्यात जोश तेवढाच उरलाय. यामागचं कारणही तसंच आहे… त्या कारणाचीच ही गोष्ट.

अख्तरचं बालपण काय फार झोकात गेलं नाही. त्याच्या घरासमोर एक टेकडी होती, गडी रोज तिकडं सरावाला जायचा. तेव्हा त्याच्याकडं साधा बॉलही नव्हता, तो दगड गोळा करायचा आणि तेच त्या टेकाडावर मारत बॉलिंगची प्रॅक्टिस करायचा. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट पक्की होती, की आपल्याला वकार युनूस, वसीम अक्रमसारखं फास्ट बॉलर व्हायचंय.

दिवसातले कित्येक तास उन्हातान्हात घाम गाळत अख्तरनं आपलं स्वप्न पूर्ण करायला मेहनत घेतली. ज्या दिवशी त्याला पाकिस्तानची जर्सी घालण्याची, पाकिस्तानसाठी फास्ट बॉलिंग टाकण्याची संधी मिळाली… तेव्हापासून सलग तीन दिवस भावानं झोपतानाही पाकिस्तानची जर्सी काढली नाही. रोज गडी क्रिकेटचा ड्रेस घालूनच झोपायचा.

आता फक्त पाकिस्तानच नाही, तर कुठल्याही देशाच्या फास्ट बॉलरला दुखापतींचा त्रास, फार भयानक. तसाच तो अख्तरलाही झाला. कधी पाठीचं, कधी गुडघ्याचं दुखणं त्याला सतावत होतं. त्यात अख्तर फ्लॅट फुटेड होता. त्याच्या तळव्याला खोलगटपणा नव्हता, तरीही भावानं पळण्याची, फास्ट बॉलिंग टाकण्याची जिद्द सोडली नाही. त्यानं महागडे शूज घेतले, पण आपल्या पायाची पुरेपूर काळजी घेतली.

मॅचच्या दिवशी थकलेला अख्तर रांगत, रांगत बाथरुमपर्यंत जायचा. तिथं गरम पाण्याच्या टबात बसायचा. ते झालं की अर्धा तास सायकलिंग करायचा, मग परत बर्फाच्या टबात बसायचा, मसाज करुन घ्यायचा, मग गडी पुन्हा व्यायामाला लागायचा. ज्या लेग डेचं आज भल्याभल्यांना कौतुक असतं, तसला व्यायाम अख्तर रोज करायचा. गडी दिवसाला लेग एक्स्टेन्शन मारायचा, तब्बल ३००. चेष्टा नाय भिडू.

एका मुलाखतीमध्ये अख्तर सांगतो, ‘फास्ट बॉलर व्हायचं असेल, तर तुमच्याकडे वेडेपणा पाहिजे. मला सचिननं पॉईंटवरुन मारला, तसा छकडा खाऊनही पुन्हा बॉल टाकण्याचा आत्मविश्वास पाहिजे. फिटनेसकडे लक्ष देऊन, समोरच्या फलंदाजाच्या छातीत धडकी भरवण्याची शक्ती पाहिजे. हा जुनून असला, तरच तुम्ही भारी फास्ट बॉलर होऊ शकता.’ अगदी वयाच्या ४६ व्या वर्षीही मैदानात उतरु शकणाऱ्या शोएब अख्तर सारखंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.