विराटला बोलबच्चन टाकणाऱ्या अख्तरच्या लग्नाची गोष्ट लय वाढीव आहे…

भारतानं साऊथ आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली, आणि भारतीय संघावर चहू बाजूंनी टीका होऊ लागली. सध्या संघाचा कर्णधार नसला तरी विराट कोहली कायम टीकेच्या भक्ष्यस्थानी असतो. आता त्याच्यावर टीका केलीये पाकिस्तानचा माजी पेस बॉलर शोएब अख्तरनं.

बरं टीका करण्याचं कारण विराट कोहलीचा फॉर्म हे असलं, तरी अख्तर त्याला बोलला ते त्याच्या लग्नावरुन. म्हणजे अख्तरचं असं म्हणणं आहे की, ‘विराट कोहलीनं लग्नाची घाईच केली. त्यानं आपल्याला भारतासाठी दीर्घ काळ खेळायचं आहे हे डोक्यात ठेवून, जरा आणखी १०-१२ वर्ष थांबायला हवं होतं. कुटुंबाची जबाबदारी आली की, क्रिकेटमधलं लक्ष जरा कमी होतं. त्यामुळे विराटनं लग्न करायची घाई केली.’

आता पार बाऊंड्री लाईनपासून दात, ओठ, स्नायू असे जे काही खाण्यायोग्य अवयव आहेत ते सगळे खात अख्तर बॉलिंगला यायचा. त्यातही जर पेटलेला असेल, तर एखादा डोक्यावरुन जाणारा बाऊन्सर तर हजार टक्के टाकणार. बॉल फलंदाज सोडा, किपरच्याही डोक्यावरुन थेट बाऊंड्री पार जातो, हे चित्र तर अख्तरनं आपल्याला कितीतरी वेळा दाखवलंय. त्यानं विराटला दिलेले बोलबच्चन स्वतःच पुन्हा एकदा ऐकले, तर स्वतःचंच बोलणं त्याला बाऊन्सर जाईल हे नक्की.

याचं कारण फार सिम्पल आहे भिडू. लग्न झालं म्हणून काय फॉर्म गंडत नसतोय. तसं असतं, तर सचिन तेंडुलकर कधी यशस्वी ठरला नसता, महेंद्रसिंह धोनीच्या ताफ्यात एवढ्या ट्रॉफीजही नसत्या. कुठलाही खेळाडू आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो, यापेक्षा जास्त महत्त्वाचं तो मैदानावर कशी कामगिरी करतो हे आहे. पण अख्तरला हे कळेल तर शपथ, भावाच्या मते विराटनं आणखी काही वर्ष तर लग्न करायलाच नको होतं आणि त्याच्या खराब फॉर्मचं कारण त्याचं लग्नच आहे.

पण हे सगळं झालं, विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या लग्नानंतरचं. त्यानंतरही विराट कोहलीनं कित्येक वेळा जबरदस्त बॅटिंग केलीच की. त्यामुळे अख्तरचे बोलबच्चन फोल ठरतायत.

पण मग यावरुन एक प्रश्न पडला की, स्वतःचं लग्न झाल्यावर अख्तरचा फॉर्म कसा होता?

मग शोधाशोध केल्यावर सापडलं, की जो सल्ला अख्तर विराटला देतोय, तो त्यानं स्वतःच्या आयुष्यात पाळलाय. भल्या भल्या बॅटर्सच्या मनात धडकी भरवणाऱ्या अख्तरनं २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याचं नाव, बातम्यांमधून काहीसं गायब झालं आणि तीन वर्षांनंतर बातमी आली ती त्याच्या लग्नाचीच.

भावानं १९९७ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो २०११ पर्यंत क्रिकेट खेळला, त्यानंतर २०१४ मध्ये ३८ व्या वर्षी भावाला वाटलं की आपण लग्न करावं. त्यानुसार त्यानं रुबाब खान नावाच्या वीस वर्षीय मुलीशी लग्न केलं. ज्या वयात लोकं आपल्या पोरांना शाळेत पाठवतात, तेव्हा अख्तर शेठ लग्न करत होते. एक मात्र आहे, भावानं करिअर संपायची वाट पाहिली आणि मग लग्न केलं… लई वाट पाहून आणि तेही १८ वर्ष लहान मुलीशी.

आता कोहलीनं लव्ह मॅरेज केलं, अख्तरला आधीच पोरगी पटली असती… तर कदाचित त्यानंही लग्न केलं असतंच. नाय का?

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.