एकमेव खेळाडू ज्याला बघून क्रिकेट न कळणाऱ्या आयाबहिणी देखील बोटं मोडायच्या.

तो बॉलिंगला आला की बॅटसमनचे पाय लटपटायचे. त्याचा तो पन्नास यार्ड मोठा रन अप आणि त्याची ती अॅक्शन त्याचा तो अवतार टीव्ही वर बघणाऱ्यांना सुद्धा घाम फुटायचा. क्रिकेट न कळणाऱ्या आयामायादेखील त्याच्या नावाने बोटे मोडायच्या. आमच्या काळातला क्रिकेटचा तो सर्वात मोठा व्हिलन होता. त्याचं नाव शोएब अख्तर !!

पाकिस्तानला फास्ट बॉलर्सची खाण म्हटल जातं. द ग्रेट इम्रान खान, स्विंगचा बादशाह वसीम अक्रम , खुंखार  वकार युनुस. जगात एकेकाळी पाक वेगवान गोलंदाजीचं वेगळ घराण मानलं जात होत. याच घराण्याचा हा बंडखोर वंशज.

मूळ गाव मोरगा. हे रावळपिंडी जवळच गाव. तिथे पाकिस्तानी एअर बेस कम्प आहे. अनेक फायटर विमाने तिथे आपला सराव करत असतात. शोएबचे वडील पेट्रोलपंपावर वॉचमन. एका खोलीचं घर आणि पोरं सहा. एवढ्या पोरांना खायला घालणे हेच त्याच्या आईसाठी एक दिव्य असायचं.

शोएब चालायला देखील उशिरा शिकला. जन्मापासून तळपाय सपाट आहेत. म्हणून त्याला लहानपणी उचलून न्यावं लागायचं. स्वतःचा बलन्स देखील सांभाळता यायचा नाही. त्याला श्वसनाचा देखील त्रास होता. त्याला कायम दवाखान्यात न्याव लागायचं. पोरग जगेल की नाही काहीच खात्री नव्हती.

पण जरा मोठ झालं मात्र शोएबच्या अंगातली सगळी एनर्जी बाहेर येऊ लागली. कधी बघेल तेव्हा हे पोरग दणदण धावत असायचं. कोणाशी न कोणाशी मारामारी ठरलेली असायची. शाळेला म्हणून रावळपिंडीला जाव लागायचं. तिकडे जाण्यासाठी एक टेकडी उतरावी लागायची. डोक्यावरून कायम जेट विमाने उडत असायची. शोएब त्यांची नक्कल करत त्या उतारावरून धावायचा. त्याचे सगळे मित्र म्हणायचे शोएबचा स्क्रू ढिला आहे.

अख्ख्या भारतीय उपखंडाला सवय लागली होती तसं त्यालाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. जोरात धावत येऊन बॉल टाकणे हे तर त्याच्यासाठी डाव्या हाताचा मल होता. अगदी लहानपणी देखील दातओठ खाऊन तो बॉल फेकायचा. त्याच्या बॉलिंगचा स्पीड बघून त्याला तिथल्या क्लबमध्ये संधी मिळाली. 

रावळपिंडीचा उन्हाळा खूप जीवघेणा असतो. लोक घरातून बाहेर देखील पडत नाहीत. अशावेळी हा मुलगा भर उन्हात फक्त क्रिकेट खेळायसाठी पिंडीला जायचा. गल्लीतली एखादी मावशी म्हणायची,

“अरे पागल कहा जा रहा है?”

शोएब म्हणायचा इम्रान खान बनणे जा रहा हुं. हे ऐकून ती मावशी हसायची. खिशात बस साठी पैसे नसलेलं पोरग इम्रान खान होणार?

फास्ट बॉलिंग करायची म्हणजे खाना सुद्धा तसाच हवा.  घरात खायला तोंडे भरपूर, शोएबच्या आईला त्याला वेगळा खुराक करून देणे जमायचं नाही. शोएबने त्यातूनही आयडिया केली. त्याच्या क्लबच्याजवळ  एक ऊसाचा रसवाला होता. शोएबने त्याच्याबरोबर मैत्री केली. त्याला सांगितलं,

“भाई मै आगे जाके बहोत बडा बॉलर बनणे वाला हु. तू रोज दो ग्लास गन्ने का ज्यूस फ्री मै दे, मै स्टार बनणे के बाद तुम्हे गन्ने की मशीन दे दुंगा “

तो रसवाला हसू लागला. कुठल आलंय हे येडं? पण शोएबने त्याची पाठ सोडली नाही. अखेर तो तयार झाला. रोज त्याला ऊसाचा रस फ्री मध्ये मिळू लागला. जगात या येड्या मुलावर विश्वास ठेवणारा तो पहिला माणूस असेल.

एक दिवस शोएबला कळाल की लाहोरला पाकिस्तान एयरलाईन्सचा क्रिकेट टीम निवडण्यासाठीचा कम्प आहे माजी क्रिकेटर झहीर अब्बास सिलेक्शन करणार आहेत. शोएबकडे लाहोरला जायचे सुद्धा पैसे नव्हते. नेहमीच्या स्टाईलने कंडक्टरला मस्का मारून तो बिनतिकिटाच लाहोरला येऊन पोहचला.

लाहोरला आला खरा पण तिथ आल्यावर दिसलं की अख्ख्या पाकिस्तानातून जवळपास तीन चार हजार मूले तिथ गोळा झाली आहेत. शोएबला यायला उशीर झाला होता. आता एवढ्या खेळाडुमधून आपला नंबर येणार नाही त्याला ठाऊक होत. काही तरी करून झहीर अब्बासचं आपल्याकडे लक्ष वेधायचं हे त्यानं ठरवलं. 

सिलेक्शन चालू होत ते ग्राउंड खूप मोठ होतं आणि त्याच्या मधोमध नेट लावले होते. झहीर अब्बास तिथे उभे होते. शोएबने त्या ग्राउंड भोवती धावायला सुरवात केली. दुपारचे दोन वाजले होते. शोएबला उन्हात पळायची सवय होती. तो नेहमी पेक्षा जास्त जोरात धावू लागला आणि झहीर अब्बास च्या जवळून जाताना मुद्दाम जोरात ओरडायचा.

जवळपास तीन किमी लांब असलेलं त्या ग्राउंडला उन्हात चकरा मारणार हे येड कोण आहे हा प्रश्न झहीर अब्बासला सुद्धा पडला. त्यांनी त्याला बोलावून घेतलं.

“क्या करते हो?”

शोएबने सांगितलं मी फास्ट बॉल टाकू शकतो. झहीर अब्बासनी विचारलं, कितना फास्ट. शोएब म्हणाला, पाकिस्तान मै सबसे फास्ट. झहीर अब्बास हसले. त्यांनी त्याच्या दिशेने बॉल फेकला आणि म्हणाले दाखव.

शोएबला ठाऊक होत की हा बॉल आपल आयुष्य बदलू शकतो. त्याने तो बॉल घेतला आणि विकेट पासून पन्नास यार्ड दूर गेला. अंगात असली नसलेली सगळी ताकद घेऊन तो धावत आला आणि जोरात बॉल फेकला. समोरच्या बॅट्समनला अपेक्षाच नव्हती. सरळ त्याच्या डोक्यावर बॉल येऊन आदळला. ते बिचार खाली पडलं. त्याने शोएबला शिव्या घातल्या.

झहीर अब्बासला कळाल आपल्याला भूत सापडल आहे. त्याला बाटलीत बंद केलं तर पूर्ण जगावर राज्य करेल

शोएब अख्तरच्या वादळी करीयरला सुरवात झाली. काही वर्षातचं पाकिस्तानच्या हिरव्या जर्सीत तो दिसू लागला. त्याला खरी प्रसिद्धी मिळाली तो १९९९च्या भारत दौऱ्यात.

इडन गार्डन वर मॅच होती. पहिले दोन सामने जबरदस्त अटीतटीचे झाले होते. शोएबला पहिलाच चान्स मिळाला होता. पाकिस्तानने १८५वर ऑल आउट झालेला. भारताची इनिंग सुरु झाली तोवर संध्याकाळ होत आली होती.पहिलीच विकेट शोएबने लक्ष्मणला बोल्ड काढून घेतली. त्यावेळी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या कुंबळेला घेऊन द्रविडने कशीबशी संध्याकाळ निभावून नेली. पण दुसऱ्या दिवशी शोएबच्या जबरदस्त यॉर्करवर द्रविड आउट झाला.

द्रविड आउट झाला आणि तरी लोक आनंदाने ओरडत होते. शोएबला कळेना काय झालं. पुढचा बॅटसमन आला त्याच्यासाठी आरडाओरडा चाललेला. शोएब नेहमीप्रमाणे धावत आला आणि त्याने त्या पुढच्याच बॉलला त्या बॅट्समनला देखील बोल्ड केले.

एक लाख प्रेक्षकांनी भरलेलं अख्खं स्टेडियम एकदम शांत झालं. पाकिस्तानचे सगळे खेळाडूचं फक्त ओरडत होते. शोएबला कळेना की आपण काय केलंय? कप्तान वसीम अक्रम म्हणाला,

“अरे पागल तुने दुनिया के सबसे बडे बॅट्समन को बोल्ड किया है. सचिन तेंडुलकर. वो खुदा है यहां का.”

सचिन द्रविड लक्ष्मण या बेस्ट डिफेन्स असलेल्या ग्रेटेस्ट फलंदाजाना बोल्ड करून शोएब अख्तरने थाटात सुरवात केली होती.

जगातला सर्वात फास्ट बॉलर झाला. तिथनं १० वर्ष गाजवली. अनेक वादात सापडला. आपल्या उचाप्त्यानी, भांडणामुळे चर्चेत राहिला. स्लेजिंग केली, मारामाऱ्या केल्या. क्रिकेटचा व्हिलन म्हणूनच त्याला ओळखलं गेलं. खुद्द पाकिस्तानी त्याला ५ वेळा नमाज पढत नाही म्हणून शिव्या द्यायचे.

पण त्याने कधी कोणाची पर्वा केली नाही आणि बॅड पब्लिसिटी का असेना पण शोएबची पॉप्युलॅरिटी कधी उतरली नाही. आज त्याचा वाढदिवस.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Nitin pawar says

    Great🙏

Leave A Reply

Your email address will not be published.