तन्मय फडणवीस यांच्या आज्जी केबल टीव्ही पाहतात म्हणून अडचणीत आल्या होत्या..

सध्या सगळीकडे तन्मय फडणवीस हे नाव ट्रेंडिंगला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा २३ वर्षांचा पुतण्या कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन आलाय याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आला. अजूनही ४५ वर्षांखालील व्यक्तींना कोरोना लस घेण्याची परवानगी नसताना तन्मय फडणवीस याला लस कशी मिळाली या प्रश्नाने विरोधकांनी फडणवीस यांना कॉर्नर केले.

तन्मय फडणवीस ४५ वर्षांच्या वरचे नाहीत, ते कोरोना फ्रंटलाईन वर्कर नाहीत, ते आरोग्य कर्मचारी नाहीत मग त्याला कोरोना लस कशी मिळाली यावरून काँग्रेसने जोरदार आवाज उठवला आहे.

“चाचा विधायक है हमारे” असे कॅप्शन देऊन घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उत्तर दिल कि ,

”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”.

आता देवेंद्रजी तन्मयला दूरचा नातेवाईक म्हणत असल्यामुळे जनतेने प्रश्न विचारला कि हा तन्मय फडणवीस आहे तरी कोण?

तन्मय हा देवेंद्र फडणवीस यांची काकी शोभाताई फडणवीस यांचा नातू आहे. त्याचे वडील अभिजित फडणवीस हे देवेंद्र यांचे चुलत बंधू लागतात. तन्मय फडणवीसच्या सोशल मीडियातील प्रोफाइलनुसार तो एक अभिनेता आणि नागपूर मधील पब्लिक फिगर आहे.

त्याच्या आज्जी शोभाताई फडणवीस या एके काळी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार आणि मंत्री होत्या.

शोभाताई फडणवीस या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावच्या. अनेक पिढ्यांपासून जनसंघ आणि भाजप या पक्षांशी त्यांचं कुटूंब कार्यरत होते. त्यांचे दीर गंगाधरपंत फडणवीस हे नागपूर येथे अनेक वर्ष विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्या स्वतः चंद्रपूर इथल्या साओली मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचे पुतणे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पण त्यांच्या पूर्वी फडणवीस घराण्याच्या राजकारणाची सूत्रे आणि गंगाधरपंतांचा वारसा शोभाताईंकडे चालत आला होता. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या राज्यमंत्र्याला पाडण्याचा पराक्रम केला होता.

१९९५ साली जेव्हा युतीचे सरकार आले तेव्हा शोभाताई यांना मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरीपुरवठामंत्री बनवण्यात आलं होतं.

मात्र पुढे १९९७ साली त्यांच्यावर रेशनमधील तूर डाळीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे भ्रष्टाचार प्रकरणे गाजत होती. विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. पार्टी विथ डिफरन्स म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का होता. 

कितीही मोठा नेता असो भ्रष्टाचार मुळात खपवून घेतला जाणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर तसा दबाव आणला. अखेर डाळ घोटाळ्यामुळे शोभा ताईंना अन्न व पुरवठा खाते सोडायला लागले.

१९९९ साली शिवसेना भाजप युतीला सत्ता सोडावी लागली. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडी सरकार अस्तित्वात आलं. अनेक दिग्गज भाजप नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता मात्र भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही शोभाताई फडणवीस सावली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या बहुमताने निवडून आल्या.

विधानसभेत आघाडी सरकारला घेरणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाई.  सरकारला विविध प्रश्न विचारून जेरीस आणण्यात त्या पुढे असायच्या.

अशातच एक दिवस विधानसभेत त्यांनी केबल टीव्हीच्या प्रश्नांला वाचा फोडली. 

नव्वदच्या दशकात सुरु झालेल्या जागतिकीकरणानंतर टीव्हीवर देखील शेकडो चॅनल्सच आगमन झालं होतं. त्यात दाखवल्या जाणाऱ्या टीव्ही सिरियल्स, सासू सुनांची भांडणे, रियालिटी शो यात दाखवला जाणारा उथळपणा या बद्दल शोभा ताई फडणवीस यांनी प्रश्न उभा केले. जुन्या गाण्यांचे रिमिक्स करून  त्यावर बिभित्स नाच करणाऱ्या आणि ते टीव्हीवर दाखवण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

जेव्हा शोभा ताई फडणवीस यांनी हा प्रश्न ठरावाद्वारे विधानसभेसमोर मांडला तेव्हा ४५ मिनिटांची चर्चा जवळपास अडीच तास रंगली. फडणवीस यांनी अगदी सिरियलची उदाहरणे त्यांच्या कथेसकट विधानसभेत मांडली. सर्व पक्षाच्या आमदारांनी यात भाग घेतला.

दुसऱ्या दिवशी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये न्यायमूर्ती चन्द्रशेखर धर्माधिकारी यांनी शोभाताई फडणवीस यांच्यावर लेख देखील लिहिला.

कित्येकांनी त्यांच्यावर टीका देखील केली की,

“या आमदार महोदया आपल्या मतदार संघातील लोकांचे प्रश्न सोडवतात की दिवस भर केबल टीव्ही बघत बसतात ? “

सत्ताधाऱ्यांबरोबर जनतेमधून देखील टीका होऊ लागली. शोभाताईंचे भाजपमधील विरोधक या निमित्ताने आक्रमक झाले. संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण निराळ्याच कारणामुळे चर्चेत आले होते. वरिष्ठांकडून कारणे विचारण्यात आली. पण शोभाताई यांनी तत्काळ या टीकेला स्पष्टीकरण दिले, त्या म्हणाल्या,

“टीव्ही पाहण्यापेक्षा जनतेचे विचार ऐकूनच चॅनलचे वर्णन मी सभागृहात केले होते जे कि प्रत्यक्षात सत्य होते.”

त्या दिवशी शोभाताईंनी टीव्ही किती पाहावा यावरून सुरु झालेलं वादळ अखेर या स्पष्टीकरणानंतर शांत झालं.

आज राजकारणापासून दूर झाल्यानंतर इतक्या अनेक वर्षांनी शोभाताई आपल्या नातवाच्या कोरोना लसीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. एरव्ही प्रत्येक प्रकरणा बद्दल स्टड स्पष्टीकरण देणारे देवेन्द्रजी फडणवीस आणि शोभा ताई फडणवीस यावेळी तन्मय फडणवीस याच्या कोरोना लसीमुळे बॅकफूटला गेलेले दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.