इंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी ‘शोभा डे’ वर देखील खटला दाखल झाला होता.

३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या राजकारणातला काळाकुट्ट दिवस.

देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या बॉडीगार्डनी गोळ्या घालून हत्या केली होती. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरमधल्या अतिरेक्यांवर ऑपरेशन ब्ल्यू स्टार या लष्करी कारवाईमुळे शीख समाज त्यांच्यावर चिडलेला होता. इंदिराजींच्या सुरक्षा रक्षकांपैकी शीख बॉडी गार्डना हटवण्याची मागणी केली गेली होती, मात्र असे न करण्याबाबत इंदिराजी ठाम राहिल्या.

आणि त्यांच्या विश्वासाचा घात करून त्याच बॉडीगार्डनी त्यांची हत्या केली.

अख्खा देश हादरून गेला. खलिस्तान वादी शीख अतिरेक्यांनी हा कट केला होता हे स्पष्ट होते. सतवंतसिंग आणि केहर सिंग या दोन्ही हत्येखोरांना लगेच घटनास्थळी अटक झाली. सर्वत्र चौकशीची सूत्रे फिरू लागली. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगासाठी ही धक्कादायक घटना होती. शेजारी देशाचा यात कितपत सहभाग आहे याचा तपास सुरु झाला.

हे सगळं घडत होतं तेव्हा जनतेत मात्र प्रचंड आक्रोश होता. इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.त्यांच्या हत्येमुळे शिखांच्या विरोधात दंगल सुरु झाली. हिंसाचाराचा आगडोंब उसळला. यात काँग्रेस नेते आघाडीवर होते.

या दंगलीमुळे शीख तरुणांच्या असंतोषात वाढंच झाली.

त्यांच्या गुप्त अतिरेकी कारवाया थांबण्याऐवजी वाढू लागल्या. मुख्यमंत्र्यापासून ते भारताच्या लष्कर प्रमुखांपर्यंत अनेकांवर हल्ले झाले. कित्येकजण ठार झाले. पंजाब आगीत धुमसत होता.

सुप्रसिद्ध सिनेपत्रकार व लेखिका शोभा डे तेव्हा मुंबईत सेलिब्रिटी नावाचे गॉसिप मॅगझीन चालवत होत्या.

सिनेकलाकारांची लफडी, खमंग मुलाखती, प्रक्षोभक फोटो याचा हमखास यशाचा फॉर्म्युला असलेले हे मॅगझीन मात्र काही केल्या चालत नव्हते. या पूर्वी स्टारडस्ट मासिकात काम करण्याचा त्यांचा अनुभव होता मात्र ते यश या मासिकात मिळाले नव्हते.

प्रचंड कर्ज झाले होते. आहे ते सगळे विकून सेलिब्रिटी मॅगझीन बंद करायची वेळ शोभा डे यांच्यावर आली होती. 

एखादी ब्रेकिंग न्यूज, खळबळजनक मुलाखत प्रसिद्ध झाली तर आपले मासिक वाचेल या प्रयत्नात शोभा डे होत्या. अशीच एक संधी त्यांच्या कडे चालून आली. शोभा डे यांच्या दिल्लीतल्या एका पत्रकार मैत्रिणीने तिची ओळख सिमरणजित सिंग मान यांच्याशी करून दिली.

सिमरणजितसिंग मान हे मोठे पोलीस अधिकारी होते. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि शिखांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध निषेध म्हणून आपल्या आय पी एस या पदाचा राजीनामा दिला होता.

खरं तर शोभा डे चालवत असलेलं सेलिब्रिटी हे मासिक फिल्मी होते. त्याच्या फॉरमॅट मध्ये सिमरनसिंग मान बसत नव्हते तरी शोभा डे यांनी ही मुलाखत घेतली.

मुंबईत एका आर्ट गॅलरीच्या कॉफीशॉप मध्ये बसून दोघांनी गप्पा मारल्या. मुलाखती वेळी बोलण्याच्या ओघात सिमरणजित यांनी शोभा डे यांना काही सायक्लोस्टाईल केलेल्या कागदाचे गठ्ठे दिले. ते कागद म्हणजे भारताच्या राष्ट्र्पतींसकट असंख्य मान्यवर लोकांना पाठवलेल्या पत्रांच्या प्रती होत्या.

शोभा डे या मुलाखती बद्दल म्हणतात,

ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही  अशी अकारण धडपड करणारा एक विचित्र, विक्षिप्त माणूस असा निष्कर्ष काढून मी ही मुलाखत आवर्ती घेतली.

आणखी काही माहिती घेण्याच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी देखील भेटायचं ठरलं. पण ती भेट झालीच नाही. मान यांच्या ऐवजी त्यांची बायको शोभा डे याना भेटली. तिने काही संदर्भाचे कागद व मान यांचा फोटो मासिकात छापण्यासाठी दिला.

पण शोभा डे यांना ठाऊक नव्हतं की सिमरनजित सिंग मान हे इंदिरा गांधींच्या खुनाचा सूत्रधार आहेत असा आरोप झाला होता.

भारत सरकारने मोस्ट वॉन्टेडच्या यादीत त्यांचं नाव जाहीर केलं होतं . शोभा डेने मुलाखत घेतली त्याच्या अवघ्या काही तासात सिमरणजित सिंग मान भूमिगत झाले होते.

ते कायद्याचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर आरोप आहेत याचा काहीही पत्ता नसलेल्या शोभा डे यांनी हि मुलाखत आपल्या सेलिब्रिटी मासिकात छापली. अंक प्रसिद्ध झाला. आधीच कोणी सेलिब्रिटी मासिक वाचत नव्हतं  त्यात हि राजकीय व वाचकांच्या दृष्ट्या अनोळखी असलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याची मुलाखत कोण वाचणार.

शोभा डे यांना देखील माहित होत कि हि मुलाखत आपल्या मासिकामध्ये कोणी वाचणार नाही पण दिल्लीच्या मैत्रिणीचा आग्रह आणि या निमित्ताने एक वादग्रस्त माणसाशी कॉंटँक्ट तयार करता येईल म्हणून त्यांनी हि मुलाखत छापली आणि विसरूनही गेले.

मात्र एक दिवस थेट कोर्टाचं समन्स हाती येऊन पडलं. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कट करण्यात एक नंबर आरोपी सिमरनजीत मान आणि दुसरे नाव शोभा डे यांचे होते.

डे याना धक्का बसला. दोन तगडे गुप्तचर अधिकारी त्यांची आठवडा भर कसून चौकशी करत होते. मान यांच्या मुलाखतीवेळी रेकॉर्ड घेतलेले कॅसेट व त्यांनी दिलेल्या कागद पत्रांची मागणी पोलिसांनी केली. शोभा डे यांनी सांगितलं की,

आमचं  मासिक सध्या कर्जबाजारी असल्यामुळे आम्ही पैसे वाचवण्यासाठी प्रत्येक मुलाखती वेळी एकच कॅसेट वापरतो. मुलाखत छापून झाल्यावर ती कॅसेट खोदून त्यावरच नवीन मुलखात रेकॉर्ड केली जाते.

सिमरनजीत मान यांनी दिलेली कागदपत्रे देखील सेलिब्रिटी मासिकाच्या ऑफिसमध्ये कचऱ्यात फेकून देण्यात आली होती. चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना शोभा डे यांचा खुलासा पटलं नाही. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला.

पुढे काही दिवसांनी सिमरनजीत मान यांना नेपाळमधून पळून जाताना अटक झाली.

त्यांना भागलपूर  येथे तुरुंगात टाकण्यात आले. मुंबई हाय कोर्टात केस चालणार होती  मात्र त्यांना इकडे  आणले तर घातपाती कारवाईची शक्यता आहे म्हणून ते टाळलं गेलं. तरी शोभा डे यांच्याही जीविताला धोका होता.

शोभा डे या त्यावेळी गरोदर होत्या. त्यांना पुढच्या सुनावणीवेळी भागलपूर येथे उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यांच्या वकिलाने सवलत मागायचा प्रयत्न केला पण न्यायाधीशांनी त्यांना खडसावले,

“मुलाखत घेण्यापूर्वी तुमच्या अशिलाने संभाव्य परिणामाचा विचार करायला हवा होता.”

शोभा डे यांच्या पोटात गोळा आला. राजद्रोहाचा आरोप म्हणजे मोठी गोष्ट होती. आता आपले भविष्य काय याचा विचार करून त्यांचे हात पाय कापू लागले. पण सुदैवाने भागलपूरला जाण्याची वेळ आली नाही.

त्याच दरम्यान सरकार बदलले आणि नवे पंतप्रधान बनलेल्या चन्द्रशेखर यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी सर्व राजबंद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. यात सिमरनजित सिंग मान यांचा देखील समावेश होता. ते पंजाब मध्ये एका हिरो प्रमाणे परतले. त्यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत झालं.

त्याच दिवशी शोभा डे यांनी मुंबईच्या बरीच कँडी या रुग्णालयात मुलीला जन्म दिला होता. त्यांच्या बद्दलही  पंजाबमध्ये सहानुभूती होती. सिमरनजीत सिंग यांनी पुढे राजकारणात उडी घेतली, ते भरपूर मताधिक्याने निवडूनही आले.

असं म्हणतात की शोभा डे यांना देखील राजकारणात येण्याची व पंजाब मध्ये निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली. झाला तो मनस्ताप पुरे असं म्हणून त्यांनी ते सेलिब्रिटी मासिक विकून टाकलं व सगळ्या फंद्यातुन आपले हात मोकळे करून घेतले.

संदर्भ – शोभा डे यांनी माझ्या आयुष्याची स्मरण यात्रा या पुस्तकात हा प्रसंग सांगितलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.