प्रीमियर शो काही मिनिटांवर असताना शोलेच्या प्रिंट्स एयरपोर्टवर अडवण्यात आल्या होत्या…

सिनेमा हा प्रचंड बेभरवशाचा असा जुगार आहे. इथे रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला फार वेळ लागत नाही. सिनेमा का हिट होतो आणि का फ्लॉप होतो? याचे उत्तर ब्रह्मदेवाला देखील सांगता येणार नाही. बऱ्याचदा सिनेमा हळूहळू जोर पकडू लागतो.

सिनेमाचा  इतिहास असे सांगतो या प्रकारचे  किती तरी सिनेमे हळूहळू पण सातत्याने वेग पकडतात आणि नंतर ते सिनेमे सुपर, बंपर हिट ठरतात. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय चित्रपट ‘शोले’ हा याच कॅटेगरीमध्ये मोडला जातो.

‘शोले’ या चित्रपटाबद्दल आजवर इतकं काही लिहून आलेला आहे की आता नवीन काय सांगायचे? असा प्रश्न पडतो पण काळाच्या उदरात अनेक गोष्टी दडलेल्या असतात, ज्या अनटोल्ड असतात. त्या नव्याने सापडतात.

असाच एक इंटरेस्टिंग  किस्सा आहे शोलेच्या प्रीमियरच्या वेळचा.

‘शोले’ चित्रपट तयार झाल्यानंतर त्याची ७० एम एम ची प्रिंट प्रोसेसिंगसाठी लंडनला पाठवण्यात आली. रमेश सिप्पी यांनी हा चित्रपट ३५ एम एम आणि ७० एम एम दोन्हीवर शूट केला होता. कारण त्यांना ठाऊक होतं भारतात सर्वच ठिकाणी ७० एम एमचा पडदा उपलब्ध होणार नाही.

या सिनेमाच्या रिलीझची तारीख १५ ऑगस्ट १९७५ होती. तो काळ मोठा विचित्र होता. देशात आणीबाणी लागली होती, त्याला दीड महिनाच झाला होता. सिनेमातील हिंसेबाबत सिप्पी सेन्सॉर बोर्डाबाबत साशंक होते, पण सिनेमा पास झाला. 

या सिनेमाचा प्रीमिअर मिनर्वा या थिएटरमध्ये करायचे ठरवले होते. मिनर्व्हा थिएटरला सजवले गेले ७० एम एम स्क्रीनची सोय केली गेली. या सिनेमाच्या सुरुवातीला फक्त चारच प्रिंट ७० एम एम बनवल्या गेल्या.

त्यातील एक दिल्लीसाठी, एक उत्तर प्रदेशसाठी, तर दोन प्रिंट मुंबईसाठी असे नियोजन झाले होते. प्रीमियरच्या दिवशीच प्रिंट लंडनहून मुंबईत पोहोचणार होत्या.

मुंबईत सर्वत्र मोठी जाहिरात केली गेली. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. ७० एम एम च्या प्रिंट्स प्रोसेसिंग होऊन लंडनहून मुंबईच्या विमानतळावर आल्या आणि तिथे कस्टम्सने त्या अडवल्या!

याचे कारण असे होते त्या काळात परदेशात कुठलीही वस्तू पाठवायची आणि परत आणायची असेल कस्टमच्या बऱ्याचशा परवानग्या आवश्यक असायच्या. त्यातील काही परवानग्या कदाचित रमेश सिप्पी यांनी घेतल्या नसाव्यात म्हणून या प्रिंट्स मुंबई एअरपोर्टवर कस्टम डिपार्टमेंटने आपल्याकडे ठेवून घेतल्या!

तिकडे त्याच दिवशी संध्याकाळी प्रीमियरचे आयोजन केले होते. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. काय करायचे? सिप्पी यांचे वकील रजनी पटेल यांच्याशी तातडीने संपर्क साधला. रजनी पटेल हे काँग्रेसचे मोठे पदाधिकारी होते. पंतप्रधान कार्यालयाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी ताबडतोब प्रधानमंत्री कार्यालय आणि सूचना आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्याशी संपर्क साधला. सर्व परिस्थिती सांगितली. सगळीकडे फोनाफोनी झाली.

कस्टम डिपार्टमेंटला फोन करून “तुम्ही प्रिंट्स मोकळ्या करून द्या. जो काही दंड वगैरे असेल तो आम्ही नंतर भरतो,” असे सांगितले गेले. प्रधानमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर कस्टम्स डिपार्टमेंटमध्ये हालचाल सुरू झाली आणि सिप्पी यांच्या हातात ७० एम एमच्या प्रिंट्स पडल्या.

परंतु तोवर तिकडे प्रीमियरची वेळ झाली होती.

रमेश सिप्पी यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि ३५ एम एमच्या प्रिंटवर त्यांनी प्रीमियर चालू केला. या छोट्या पडद्यावर प्रीमियरची काहीच मजा आली नाही. सर्वजण आपापसात कुजबुजत निघून गेले. हा सिनेमा काही चालणार नाही असा सगळ्यांचा अभिप्राय होता.

रात्री प्रिंट हातात आल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्या सर्व टेक्निशियन आणि कुटुंबीयांसोबत ‘शोले’ बघितला. आता देखील लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या.

अमिताभ बच्चन यांचा सिनेमातील मृत्यू त्यांना नको वाटला. त्याला जर जिवंत ठेवले आणि हॅपी एंडिंग केलं तर कदाचित प्रेक्षक या सिनेमाचे स्वागत करतील अशा देखील सूचना आल्या. पण चित्रपटाचे पटकथाकार आणि संवाद लेखक सलीम-जावेद यांनी या बदलाला विरोध केला आणि हा सिनेमा आहे तसाच प्रेक्षकांसाठी रिलीझ करा असे सांगितले.

रमेश सिप्पी यांनी अर्थातच हा सल्ला ऐकला आणि हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी मुंबईच्या मिनर्व्हा मध्ये प्रदर्शित केला. 

प्रेक्षकांच्या सुरुवातीला फारशा काही चांगल्या प्रतिक्रिया नव्हत्या. पत्रकारांनी देखील त्यांच्या समीक्षणात चित्रपटाला फार काही चांगले म्हटले नाही. आज देखील त्याकाळी आलेल्या चित्रपट या समीक्षणाला आपण गुगल पाहू शकतो. 

पहिल्या आठवड्यानंतर सिनेमा फ्लॉप अशा चर्चा रंगू लागल्या. पण दोन आठवड्यानंतर मात्र हळूहळू माऊथ पब्लिसिटी ने चित्रपटाची लोकप्रियता वाढत गेली. त्यातील गब्बर सिंगचे डायलॉग गल्लीगल्लीत ऐकायला मिळू लागले. हळूहळू प्रेक्षकांनी या सिनेमाकडे सकारात्मक नजरेने पाहायला सुरुवात केली आणि या सिनेमाची गर्दी वाढत गेली.

एका महिन्यानंतर हा सिनेमा प्रचंड हिट ठरला. मिनर्वा थिएटरची करंट बुकिंगची खिडकी पहिली दोन वर्षे कधी उघडावीच लागली नाही! सर्व तिकिटे ॲडव्हान्स बुकिंग मध्येच संपू लागली, भारतात काही ठिकाणी ७० एम एम तर काही ठिकाणी ३५ एम एम वर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एक कल्ट क्लासिक म्हणून सुपरहिट ठरला.

प्रीमियरच्या दिवशी ज्या पत्रकारांनी या सिनेमाला नावे ठेवली, या सिनेमाबद्दल नकारात्मक समीक्षण केले, त्या सर्वांना एक सणसणीत चपराक या निमित्ताने बसली. शेवटी प्रेक्षक हाच सिनेमाचा राजा असतो…

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.